Monday, June 1, 2026

Bill Gates : एपस्टीन प्रकरणामुळे बिल गेट्सची प्रतिमा डागाळली, सार्वजनिक कार्यक्रमात 'नो एन्ट्री' ?

Bill Gates : एपस्टीन प्रकरणामुळे बिल गेट्सची प्रतिमा डागाळली, सार्वजनिक कार्यक्रमात 'नो एन्ट्री' ?

Bill Gates Epstein Controversy : बिल गेट्स हे जगातील सर्वात प्रभावशाली तंत्रज्ञान उद्योजकांपैकी एक आहेत. अलीकडेच उघड झालेल्या जेफ्री एपस्टीन प्रकरणात त्यांचे नाव आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे त्यांच्या प्रतिमेला धक्का लागला असून काही महत्त्वाच्या कार्यक्रमांमधून त्यांना दूर ठेवण्यात आल्याची चर्चा आहे.

प्रकरण काय ?

'द वॉल स्ट्रीट जर्नल'च्या एका अहवालानुसार, मायक्रोसॉफ्टच्या वार्षिक CEO समिटमध्ये बिल गेट्स यांची उपस्थिती नसेल. या कार्यक्रमादरम्यान ते नेहमी वॉशिंग्टनमधील त्यांच्या निवासस्थानी प्रमुख उद्योगपतींसाठी खास डिनरचे आयोजन करत असत. मात्र यावर्षी त्यांच्या टीमला असे आयोजन न करण्याचा सल्ला देण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे.

भारतामधील एका महत्त्वाच्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) परिषदेतही गेट्स सहभागी होणार होते. फेब्रुवारीमध्ये नवी दिल्ली येथे होणाऱ्या या परिषदेत ते प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार होते. मात्र एपस्टीन प्रकरणाशी संबंधित माध्यमांमधील चर्चेमुळे कार्यक्रमाच्या मुख्य विषयावर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त करण्यात आल्याचे सांगितले जाते. त्यानंतर गेट्स यांनी अखेरच्या क्षणी परिषदेतून माघार घेतली. या निर्णयाला दोन्ही बाजूंनी परस्पर सहमती होती.

एपस्टीन प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात

एपस्टीन प्रकरणामुळे बिल गेट्स अनेक दिवस चर्चेत होते. या प्रकरणामुळे त्यांच्यावर अनेक टीका देखील झाल्या आहेत. न्याय विभागाच्या कागदपत्रांनुसार, गेट्स यांनी अनेक वेळा एपस्टीनची भेट घेतल्याचे समोर आले आहे. त्या काळात त्यांच्या तत्कालीन पत्नी मेलिंडा फ्रेंच गेट्स यांनी या संबंधांबाबत चिंता व्यक्त केल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

एपस्टीनला गेट्स यांच्या काही वैयक्तिक संबंधांची माहिती होती आणि गेट्स यांच्या जवळच्या सल्लागारांनी २०१९ पर्यंत एपस्टीनसोबत मोठ्या प्रमाणात संवाद साधल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र बिल गेट्स यांनी यापूर्वीच एपस्टीनची भेट घेणे ही चूक होती, असे मान्य केले आहे. त्यांनी कोणत्याही बेकायदेशीर कृत्यात सहभाग असल्याचे स्पष्टपणे नाकारले आहे. तसेच, एपस्टीनशी संबंधित सर्व कागदपत्रे सार्वजनिक व्हावीत आणि चौकशीसाठी आपण पूर्ण सहकार्य करू, अशी भूमिकाही त्यांनी घेतली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >