तुलूझ : ऑस्ट्रेलियन विमान कंपनी ‘क्वांटास’ने (Qantas) नागरी विमान वाहतूक क्षेत्रात एक नवा इतिहास रचला आहे. एका विशेष रुपांतरित एअरबस ए३५० (Airbus A350) विमानाने हवेत सलग २४ तासांपेक्षा जास्त काळ उड्डाण करत जगातील सर्वात प्रदीर्घ व्यावसायिक चाचणी उड्डाणाचा नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. फ्रान्समधील तुलूझ येथे सुरक्षित उतरण्यापूर्वी या विमानाने ऐतिहासिक पल्ला गाठला. एअरलाइन्सच्या प्रदीर्घ प्रलंबित 'प्रोजेक्ट सनराईज'साठी (Project Sunrise) हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या प्रकल्पांतर्गत २०२७ पासून ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनारपट्टीवरून लंडन आणि न्यू यॉर्कसाठी थेट विनाथांबा विमाने चालवण्याची योजना आहे.
२३ हजार किलोमीटरचा अद्भूत प्रवास
विमान वाहतुकीच्या ट्रॅकिंग डेटा आणि एअरबसच्या माहितीनुसार, या विमानाने २७ जुलै रोजी स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ५:२७ वाजता मेलबर्न येथून उड्डाण केले होते. त्यानंतर तब्बल २४ तास आणि २४ मिनिटांचा यशस्वी प्रवास करून २८ जुलै रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी ९:५२ वाजता हे विमान फ्रान्समधील एअरबसच्या तुलूझ येथील मुख्यालयात उतरले. या प्रवासादरम्यान विमानाने प्रशांत महासागर, अमेरिका, कॅनडा आणि अटलांटिक महासागर ओलांडत एकंदरीत २३,०७५ किलोमीटरचे (१४,३३८ मैल) अथांग अंतर कापले.
राज्यातील बंदर विकासाला गती देण्यासाठी केंद्र सरकारकडे प्राधान्याने मंजुरीची मागणी केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल ...
२००५ मधील जुना विक्रम मोडीत
Touchdown! ✈️
After 24 hours and 23 minutes in the air, the A350-1000ULR has completed the flight from Melbourne to Toulouse. pic.twitter.com/D5gnynjPOh — Flightradar24 (@flightradar24) July 28, 2026
या ऐतिहासिक उड्डाणाने २००५ मध्ये बोईंग ७७७-२००एलआर (Boeing 777-200LR) विमानाने हाँगकाँग ते लंडन चाचणी दरम्यान नोंदवलेला २२ तास ४२ मिनिटांचा जुना विक्रम अखेर मोडीत काढला आहे.
३६ लाखांहून अधिक लोकांनी 'लाईव्ह' पाहिला थरार
'F-WULR' नोंदणीकृत असलेल्या या विमानाने लँडिंग करण्यापूर्वी धावपट्टीवरून एकदा 'गो-अराउंड' मारले. हे दृश्य पाहण्यासाठी Flightradar24 या विमान ट्रॅकिंग प्लॅटफॉर्मवर १ लाख २० हजारांहून अधिक लोक एकाच वेळी लाईव्ह उपस्थित होते. या संपूर्ण २४ तासांच्या प्रवासाला ३६ लाखांहून अधिक लोकांनी ट्रॅक केले. फ्लाइटराडारच्या इतिहासात राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या पार्थिवाला घेऊन जाणाऱ्या विमानानंतर हे जगातील दुसरे सर्वात जास्त ट्रॅक केलेले विमान ठरले आहे.
२० हजार लिटरची अतिरिक्त इंधन टाकी
History made. After a 12,460NM (23,075.92 km) / 24 hours 24 minutes direct flight from Melbourne 🇦🇺, the #A350-1000ULR arrives home in Toulouse 🇫🇷. Watch the journey on @FlightRadar24: https://t.co/tzKbCjsfFM#Ultimate #LongRangeLeader pic.twitter.com/pTjoOuhqpb
— Airbus (@Airbus) July 28, 2026
हे विमान विशेषतः तयार करण्यात आलेले एअरबस A350-1000ULR (अल्ट्रा लाँग रेंज) मॉडेल आहे. यात अति-लांब पल्ल्याचा प्रवास शक्य व्हावा यासाठी २०,००० लिटरची अतिरिक्त इंधन टाकी बसवण्यात आली आहे. दोन महिन्यांच्या प्रमाणपत्राचा (Certification) भाग म्हणून एअरबस जूनपासून या विमानाची सातत्याने चाचणी घेत आहे. या चाचणीच्या अवघ्या एक आठवड्यापूर्वी, याच विमानाने तुलूझ ते मेलबर्न असा हिंदी महासागरावरून १९ तासांचा यशस्वी प्रवास केला होता.
विमानात केवळ १२ जणांचा ताफा
दिवसभराच्या या प्रदीर्घ प्रवासादरम्यान अभियंत्यांनी विमानाच्या सुधारित इंधन प्रणालीची कार्यक्षमता, केबिनमधील आवाजाची पातळी आणि हवेचे अभिसरण (Air Circulation) यांची तांत्रिक पाहणी केली. या ऐतिहासिक उड्डाणात २ क्वांटास पायलट, ८ एअरबस क्रू मेंबर्स आणि २ एअरबस इंजिनिअर्स असे एकूण १२ जण स्वार होते.
काय आहे 'प्रोजेक्ट सनराईज' ?
क्वांटासने 'प्रोजेक्ट सनराईज'साठी अशा १२ विशेष एअरबस विमानांची ऑर्डर दिली आहे. प्रत्येक विमानात २३८ प्रवासी बसू शकतील. हवामानानुसार हे विमान सिडनी ते लंडन किंवा न्यू यॉर्कदरम्यान १९ ते २१ तासांत विनाथांबा प्रवास पूर्ण करेल. या मालिकेतील पहिले विमान एप्रिल २०२७ मध्ये मिळणार असून, ऑक्टोबर २०२७ पासून सिडनी-लंडन ही दररोजची विनाथांबा सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. ऐतिहासिक 'कांगारू रूट'वर पूर्वी लागणारा ५ दिवसांचा प्रवास या प्रकल्पामुळे आता एकाच थेट उड्डाणात पूर्ण होणार आहे.
सध्याचा विक्रम कोणाच्या नावावर?
सध्या जगात सर्वात लांब पल्ल्याच्या व्यावसायिक प्रवासी सेवेचा विक्रम 'सिंगापूर एअरलाइन्स'च्या नावावर आहे. त्यांची सिंगापूर ते न्यू यॉर्क विनाथांबा फ्लाईट १८ तासांत १५,३५० किलोमीटरचा प्रवास करते. मात्र, क्वांटासच्या नव्या प्रकल्पामुळे हा विक्रम लवकरच मागे पडणार आहे.






