Wednesday, May 27, 2026

वकिली सेवा पुरवणारी ‘रेस्ट द केस’

वकिली सेवा पुरवणारी ‘रेस्ट द केस’

शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी कधी चढू नये, असं म्हटलं जातं. कारण कोर्ट-खटला यामध्ये खूप वेळ जातो. सर्वांत महत्वाचं म्हणजे पक्षाची प्रभावी बाजू मांडणारा योग्य वकील नसेल तर मग पैसा आणि वेळ दोन्ही वाया जातात. आपल्या देशात जिल्हास्तरीय न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत जवळपास साडेपाच कोटी खटले प्रलंबित आहेत, तर नोंदणीकृत वकिलांची संख्या आहे अवघी २० लाख. सुमारे १ लाख लोकसंख्येमागे फक्त १४० वकील अशी ही आकडेवारी आहे. या आकड्यामुळे भारत हा जगातील दुसरा सर्वांत मोठा वकिली व्यवसाय पूरक देश ठरतो. मात्र या आकडेवारीमध्ये योग्य वकील कसा शोधणार, त्यात त्या वकिलाचे मानधन देखील परवडणारे असले पाहिजे. ही भारतीयांची अडचण त्या तरुणीने हेरली. कोर्ट-खटल्यामुळे घाबरलेल्या, गोंधळलेल्या पिचलेल्या सामान्य माणसाला योग्य वकील मिळावा, यासाठी तिने एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुरू केला. ‘रेस्ट द केस’ (आरटीसी) हे त्याचे नाव आणि ते सुरू करणारी तरुणी म्हणजे श्रेया शर्मा. श्रेयाचे बालपण पुण्यात एका उद्योजकीय वातावरणात गेले. तिच्या कुटुंबाचा लेक्सिकॉन इंटरनॅशनल स्कूल (प्रीस्कूलची साखळी), लेक्सिकॉन मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट ऑफ लीडरशिप अँड एक्सलन्स, मल्टी फिट (फिटनेस साखळी) आणि सिट्टा नावाचा लहान मुलांच्या हेल्थ केअर उत्पादनांचा ब्रँड यांसारखे विविध व्यवसाय आहेत. घरात सतत व्यवसाय, नियोजन, मेहनत आणि शिस्त यावर चर्चा होत असे. याच वातावरणाने तिच्यात उद्योजकतेची बीजं रुजवली. पुण्यातील लेक्सिकॉन इंटरनॅशनल स्कूलमधून बारावी पूर्ण केल्यानंतर श्रेया कायद्याच्या शिक्षणासाठी यूकेमधील कार्डिफ विद्यापीठात गेली. तिथे एलएलबी ऑनर्सचे शिक्षण घेत असताना तिच्या मनात स्वतःची लॉ फर्म सुरू करण्याची कल्पना आकार घेऊ लागली. कायद्याचे शिक्षण घेताना श्रेयाला जाणवले की, भारतात सामान्य माणसासाठी योग्य वकील शोधणे अत्यंत कठीण आहे. अनेक लोकांना कायदेशीर प्रक्रिया समजत नाहीत. योग्य मार्गदर्शनाअभावी ते चुकीचे निर्णय घेतात किंवा प्रकरणे लांबतात. यावर उपाय म्हणून तिने जुलै २०२१ मध्ये ‘रेस्ट द केस’ची स्थापना केली. कंपनीचे नावही तिने ‘Rest the Case’ या न्यायालयातील प्रसिद्ध वाक्यापासून प्रेरित होऊन ठेवले. ‘रेस्ट द केस’ची सुरुवात अत्यंत साधी होती. पुण्यातील विमान नगर येथील घरातील एका छोट्याशा खोलीतून श्रेया आणि तिच्यासोबत एक कर्मचारी वकिलांना देण्यासाठी माहितीपत्रके तयार करत असत.

‘रेस्ट द केस’ सुरू करणे जितके सोपे वाटत होते, तितके प्रत्यक्षात नव्हते. श्रेयाला स्वतः वकिलांचे फोन नंबर शोधावे लागत. भेटी ठरवाव्या लागत. त्यांच्या कार्यालयात जाऊन प्लॅटफॉर्म समजावून सांगावा लागत. ती ज्यांना भेटत होती ते सर्व तिच्यापेक्षा खूप अनुभवी होते. काहींना वाटायचं की हा फक्त तिचा छंद आहे. एका महिला वकिलाने तर तिला एखादी नियमित नोकरी शोध असा सल्लाही दिला होता. मात्र, या अनुभवांनी श्रेयाला स्वतःची कल्पना प्रभावीपणे मांडायला शिकवले. सुरुवातीला आरटीसीवर केवळ २०-२५ वकील होते. पण काही महिन्यांतच पुण्यातील शंभराहून अधिक वकील प्लॅटफॉर्मशी जोडले गेले. यानंतर श्रेयाने दिल्ली, मुंबई, बंगळुरू, चेन्नई, कोलकाता यांसारख्या मोठ्या शहरांकडे मोर्चा वळवला. आज ‘रेस्ट द केस’चे नेटवर्क देशातील जवळपास २०० शहरांमध्ये पोहोचले आहे. फक्त ४.५ लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून सुरू झालेली ही कंपनी अवघ्या दोन वर्षांत १.५ कोटी रुपयांच्या उलाढालीपर्यंत पोहोचली आहे. आज आरटीसीकडे देशभरातील सुमारे १,५०० नोंदणीकृत वकिलांचे जाळे आहे. ‘रेस्ट द केस’ केवळ वकील शोधून देत नाही, तर कायदेशीर माहिती सामान्य माणसाला समजेल अशा सोप्या भाषेत उपलब्ध करून देते. या प्लॅटफॉर्मवर घटस्फोट, मालमत्ता वाद, व्यवसाय, मृत्युपत्र, आर्थिक व्यवहार यांसारख्या विषयांवरील मार्गदर्शिका उपलब्ध आहेत. विविध कायदेशीर टेम्प्लेट्स मोफत दिले जातात. लोक ऑडिओ किंवा व्हिडीओ कॉलद्वारे वकिलांशी सल्लामसलत करू शकतात. विशेष म्हणजे, ‘रेस्ट द केस’प्रत्येक वकिलाची बार कौन्सिल क्रमांकाद्वारे पडताळणी करते. त्यामुळे ग्राहकांना विश्वासार्ह सेवा मिळते. कोविड काळात ‘रेस्ट द केस’ कडे सर्वाधिक चौकशी घटस्फोट आणि मालमत्ता वादांबाबत येत होती. घरगुती तणाव, आर्थिक अडचणी आणि लॉकडाऊनमुळे अनेक कौटुंबिक वाद वाढले. या काळात ‘रेस्ट द केस’ अनेकांसाठी आधार बनले. श्रेयाची पहिली ग्राहक एक महिला होती, जिला घटस्फोटासाठी वकील हवा होता. गुगलवर ‘रेस्ट द केस’ सापडल्यानंतर तिने प्लॅटफॉर्मवर विश्वास ठेवला. नंतर त्या महिलेने श्रेयाला सांगितले की, तिच्या कंपनीवर विश्वास ठेवणे ही जोखीम होती, पण ती जोखीम योग्य ठरली. श्रेयासाठी हा क्षण खूप महत्त्वाचा होता. कारण त्यातून तिला जाणवले की, ती केवळ व्यवसाय करत नाही, तर लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवत आहे.

‘रेस्ट द केस’ ने स्वतःचा प्रचार करण्यासाठी आधुनिक डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करत आहे. गुगल जाहिराती, इंस्टाग्राम, फेसबुक, लिंक्डइन, यूट्यूब यांसोबतच त्यांनी ‘Legally Speaking with Rest the Case’ हा पॉडकास्टही सुरू केला आहे. या पॉडकास्टमध्ये सामान्य माणसाला कायदेशीर बाबी सोप्या भाषेत समजावून सांगितल्या जातात. आज ‘रेस्ट द केस’ मध्ये १५ जणांची टीम काम करते. मार्केटिंग, एसईओ, कंटेंट रायटिंग, ग्राहक सेवा, ग्राफिक डिझाइन यांसारख्या विविध विभागांमध्ये ही टीम कार्यरत आहे. कंपनीची उलाढाल १.५ कोटी रुपयांवर पोहोचली असली तरी श्रेयाचे लक्ष्य अजून मोठे आहे. ती भारतातील कायदेशीर सेवा अधिक पारदर्शक, सुलभ आणि तंत्रज्ञानाधारित बनवू इच्छिते. व्यवसायातील धावपळीच्या आयुष्यातही श्रेया तिच्या मोठ्या संयुक्त कुटुंबाशी घट्ट जोडलेली आहे. आई-वडील, आजी-आजोबा, काका-काकू आणि चुलत भावंडांसोबत राहणे तिला मानसिक आधार देते. तिची धाकटी बहीण मायरा शर्मा ही व्यावसायिक गोल्फर आहे. त्यामुळे घरात स्पर्धा, शिस्त आणि मेहनतीचे वातावरण कायम असते. आज अनेक स्टार्टअप्स फक्त नफा आणि गुंतवणुकीभोवती फिरताना दिसतात. पण श्रेया शर्माची कथा वेगळी आहे. तिने कायद्याच्या गुंतागुंतीच्या जगाला सामान्य माणसासाठी सोपे करण्याचा प्रयत्न केला आहे. एका छोट्या खोलीतून सुरू झालेला ‘रेस्ट द केस’ आज हजारो लोकांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी साकव बनला आहे. कदाचित म्हणूनच, श्रेयाचा हा प्रवास केवळ एका स्टार्टअपची कथा राहत नाही. तो नव्या पिढीच्या संवेदनशील उद्योजकतेचा चेहरा बनतो.

_अर्चना सोंडे
Comments
Add Comment