Tuesday, May 26, 2026

मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर मराठीचे धिंडवडे!

मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर मराठीचे धिंडवडे!
मुंबई : राज्यातील परप्रांतीय रिक्षा, टॅक्सी आणि ‘उबर’ चालकांना मराठी लिहिता-वाचता आले पाहिजे, यासाठी आग्रह धरला जात असताना, दुसरीकडे ज्या मंत्रालयातून राज्याचा कारभार चालतो, त्याच मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर मराठी भाषेचे अक्षरशः धिंडवडे निघत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. मंत्रालयाच्या 'गार्डन गेट'वर लावण्यात आलेल्या एका सूचनाफलकावर धड एक वाक्यही व्याकरणदृष्ट्या शुद्ध लिहिता आलेले नाही. त्यामुळे मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांना डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे.मागील अनेक दिवसांपासून हा अर्थहीन आणि अशुद्ध सूचनाफलक मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर दिमाखात झळकत असून, राज्याला दिशा दाखवणाऱ्या मराठी भाषा विभागाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांना रांगेत उभे राहण्यासाठी 'गार्डन गेट'च्या बाहेर एक फलक लावण्यात आला आहे. या फलकावर “मंत्रालय प्रवेश करीता ०२.०० वाजल्यांचे रांग येथुन चालु” असे अत्यंत चुकीचे आणि व्याकरणशून्य वाक्य लिहिण्यात आले आहे.
मराठी भाषेच्या नियमांनुसार हे वाक्य जर शुद्ध स्वरूपात लिहायचे झाले, तर ते ‘मंत्रालयात प्रवेशाकरिता दुपारी २ वाजल्यापासून येथून रांग लावावी’ असे असायला हवे होते. मात्र, या फलकावरील वाक्यात शब्दांची आणि व्याकरणाची अशी काही मोडतोड करण्यात आली आहे की, त्याचा धड अर्थ लावणेही कठीण झाले आहे. मराठी भाषाप्रेमींचे 'सौजन्य' हरवले?  राज्याच्या कानाकोपऱ्यातून दररोज शेकडो नागरिक विविध कामांनिमित्त मंत्रालयात येत असतात. हा फलक वाचून वाक्य चुकीचे असले तरी, नागरिक त्यातून कसातरी स्वतःचा अर्थ काढतात आणि रांगेत उभे राहतात. मात्र, मंत्रालयात ये-जा करणाऱ्या मराठी भाषा विभागातील उच्चपदस्थ अधिकारी, कर्मचारी किंवा स्वतःला 'मराठी भाषाप्रेमी' म्हणवून घेणाऱ्या एकाही कथित नेत्याला हा अशुद्ध फलक बदलण्याचे सौजन्य दाखवावेसे वाटले नाही, हीच मोठी शोकांतिका आहे. मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरच राज्याच्या मातृभाषेची अशी दुरवस्था होत असेल, तर सर्वसामान्यांनी आणि परप्रांतीयांनी मराठीचा आदर कसा करावा, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. हा वादग्रस्त आणि चुकीचा फलक तातडीने बदलून तिथे प्रमाण मराठीतील फलक लावला जाईल का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >