Tuesday, May 26, 2026

Mantri Nitesh Rane : हर्षवर्धन सपकाळ यांनी लायकीनुसार बोलावे ! मंत्री नितेश राणे

Mantri Nitesh Rane : हर्षवर्धन सपकाळ यांनी लायकीनुसार बोलावे ! मंत्री नितेश राणे

मंत्री नितेश राणे यांचा हल्लाबोल; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीकेला प्रत्युत्तर

मुंबई : कांदा प्रश्नावरील आंदोलनादरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ( Harshvardhan Sapkal ) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी(Prime Minister Narendra Modi ) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार घेताना, राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे (nitesh rane) यांनी काँग्रेस नेतृत्वावर जोरदार हल्लाबोल केला. "देशाच्या पंतप्रधानांविषयी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या लायकीनुसार बोलावे; अन्यथा त्यांची जीभ हातात काढून देण्याची हिंमत भाजप (BJP)  कार्यकर्त्यांमध्ये आहे," असा इशारा नितेश राणे यांनी दिला.

मंत्रालयात माध्यमांशी संवाद साधताना मंत्री राणे म्हणाले की, "मुद्दा कांद्याचा होता, पण 'मी काहीतरी करतोय' हे दाखवण्यासाठी, ज्यांची स्वतः निवडून येण्याची लायकी नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमच्या सर्वोच्च नेत्यांबद्दल एकेरी भाषा वापरत आहेत. देशावर प्रेम करणारा नागरिक आणि भाजपचा कार्यकर्ता म्हणून आम्ही हे कदापि सहन करणार नाही. सपकाळ यांना आता महाराष्ट्रात फिरू द्यायचे की नाही, याचा विचार आम्हाला करावा लागेल. काँग्रेस संस्कृतीच्या मोठमोठ्या गप्पा मारते, मग राहुल गांधींनी तुम्हाला हीच संस्कृती शिकवली आहे का?", असा सवालही राणे यांनी केला.

"स्वतःच्या जिल्ह्यात तुमची लायकी काय आहे, हे आम्हाला चांगले ठाऊक आहे. कांद्याच्या नावाने जर तुमची जीभ जास्तच वळवळली, तर भाजपचे कार्यकर्ते गप्प बसणार नाहीत. या विधानाची आम्ही गंभीर नोंद घेतली असून, हर्षवर्धन सपकाळ यांनी आता महाराष्ट्रात फिरताना आजूबाजूला बघून काळजी घ्यावी," असा सज्जड दमही नितेश राणे यांनी भरला.

काँग्रेसचे नेते पाकिस्तानचे एजंट

नितेश राणे यांनी काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वावरही निशाणा साधला. "पंतप्रधानांबद्दल अशा प्रकारची भाषा वापरणाऱ्या हर्षवर्धन सपकाळ यांची कोणतीही राजकीय औकात नाही. म्हणूनच मी काँग्रेसला (Congress)  'पाकिस्तानचे एजंट '(Pakistan) म्हणतो. राहुल गांधी (Rahul Gandhi) स्वतः पाकिस्तानचे एजंट आहेत आणि हे सर्व त्यांचे चेले आहेत. ज्याप्रमाणे पाकिस्तानला आपल्या पंतप्रधानांना शिव्या देणे आवडते, तसेच हे लोक पाकिस्तानात बसलेल्या आपल्या आकांना खुश करण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांबद्दल इतकी गलिच्छ भाषा वापरतात. मात्र, त्यांनी लक्षात ठेवावे की, सन्मानाने बोलण्याची औकात नसेल, तर त्यांची जीभ काढून हातात देण्याची तयारी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याची आहे," असे राणे म्हणाले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >