Monday, May 18, 2026

Pratap Sarnaik : 'एसटी'चा प्रवास महागणार?

Pratap Sarnaik : 'एसटी'चा प्रवास महागणार?

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे संकेत; ३१ मेपर्यंत वाट पाहण्याची भूमिका

मुंबई : अमेरिका आणि इराणमधील युद्धाच्या भडक्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढलेल्या कच्च्या तेलाच्या किमती आणि देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात झालेल्या प्रतिलिटर ३ रुपयांच्या वाढीचा थेट फटका आता लालपरीला (एसटी) बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. "महामंडळाचा आर्थिक बोजा वाढल्याने आम्ही ३१ मे पर्यंत वाट पाहणार आहोत. केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिक मदत न मिळाल्यास आमच्यापुढे दरवाढ केल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही," असे संकेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.

एसटी महामंडळाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले, "एसटीच्या ताफ्यासाठी दररोज तब्बल १० लाख ८७ हजार लिटर डिझेल लागते. त्याचा पुरवठा इंडियन ऑईलकडून केला जातो. गेल्या आठवड्यात डिझेलचे दर ३ रुपयांनी वाढल्यामुळे महामंडळाला दररोज ३३ लाख ७० हजार रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागत आहे. या हिशोबाने महामंडळाला वर्षाला तब्बल १२४ कोटी रुपयांचा तोटा होणार आहे. जागतिक पातळीवर युद्धाची परिस्थिती अधिक बिघडल्यास इंधनाचे दर आणखी भडकतील आणि परिस्थिती हाताबाहेर जाईल," अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

भाडेवाढ टाळण्यासाठी राज्य सरकारकडे मदतीची मागणी केली जाणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. "जर केंद्र किंवा राज्य सरकारकडून महामंडळाला विशेष आर्थिक सवलत किंवा सबसिडी मिळाली, तर आम्ही प्रवाशांवर भाडेवाढीचा बोजा टाकणार नाही. मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात अधिकृत पत्र देणार आहे. आम्ही ३१ मे पर्यंत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. पुढील १० ते १२ दिवसांत सरकारने योग्य पावले उचलली तर दरवाढ टळू शकते, अन्यथा भाडेवाढ अटळ आहे. मात्र, भाडेवाढ झाली तरी महिला व ज्येष्ठांना सध्या दिल्या जाणाऱ्या सवलती कायम राहतील," अशी ग्वाही त्यांनी दिली.

कॅब आणि ऑटो बंद करण्याचे निर्देश नाहीत
  • यावेळी बोलताना परिवहन मंत्र्यांनी ओला, उबर आणि रॅपिडो या कंपन्यांच्या ॲप्सवर सायबर विभागाने केलेल्या कारवाईबाबत माहिती दिली. "राज्यात अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीर पेट्रोल बाईक टॅक्सी चालवल्या जात होत्या. या प्रवासादरम्यान महिलांशी गैरवर्तन आणि अपघाताच्या गंभीर घटना घडल्या आहेत. कंपन्यांनी सरकारी नियमांना केराची टोपली दाखवल्यामुळेच मी सायबर पोलिसांना पत्र लिहून कारवाईचे आदेश दिले होते," असे सरनाईक म्हणाले.
  • "१५ मे रोजी सायबर विभागाने गुगल आणि ॲपलला नोटीस पाठवल्यानंतर त्यांनी ओला आणि उबरच्या सेवांवर निर्बंध आणले आहेत. मात्र, आमचे उद्दिष्ट अनधिकृत 'बाईक टॅक्सी' बंद करणे हेच आहे, सर्वसामान्य नागरिकांना उपयुक्त ठरणाऱ्या कॅब (चारचाकी) किंवा ऑटो सेवा बंद करण्याचा सरकारचा कोणताही हेतू नाही. गुगल आणि ॲपलने बेकायदेशीर बाईक टॅक्सींचे ॲप्स ब्लॉक करावेत, अन्यथा त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई केली जाईल," असा इशारा सरनाईक यांनी दिला.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >