Saturday, May 16, 2026

Amruta Fadnavis: इंधन बचतीसाठी अमृता फडणवीस यांचा पुढाकार

Amruta Fadnavis:  इंधन बचतीसाठी अमृता फडणवीस यांचा पुढाकार

 कान्स फिल्म फेस्टिव्हलचा दौरा रद्द; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी फ्रान्समधील 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'चा आपला नियोजित दौरा रद्द केला आहे. "रेड कार्पेटवरील फॅशन आणि संधी पुन्हा मिळू शकते, परंतु देशहित आणि पंतप्रधानांचे आवाहन सर्वोच्च आहे," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

कान्स चित्रपट महोत्सवासारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर महाराष्ट्राची समृद्ध कला, संस्कृती आणि विशेषतः पारंपरिक हातमाग परंपरा जगासमोर मांडण्यासाठी अमृता फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आले होते. यासाठी त्यांनी विशेष तयारीही केली होती. नाशिकमधील येवला येथील स्थानिक कारागिरांनी अत्यंत कौशल्याने आणि अनेक महिन्यांच्या अहोरात्र मेहनतीने त्यांच्यासाठी एक खास पारंपरिक पैठणी साडी विणली होती. महाराष्ट्राच्या या अस्मितेचे जागतिक मंचावर सादरीकरण होणार असल्याने डिझायनर्स आणि कारागिरांमध्ये मोठा उत्साह होता. मात्र, देश पातळीवरील इंधन बचतीच्या मोहिमेला बळ देण्यासाठी त्यांनी य हा दौरा रद्द केला.

रेड कार्पेट थांबू शकतं, देश नाही!

दौरा रद्द करण्याच्या या महत्त्वपूर्ण निर्णयाबाबत बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या, "देशहिताला आणि पंतप्रधानांच्या आवाहनाला प्राधान्य देणे हीच प्रत्येक नागरिकाची खरी जबाबदारी आहे. कान्ससारख्या जागतिक मंचावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे हा नक्कीच अभिमानाचा क्षण होता. मात्र, पंतप्रधानांनी देशातील सद्यस्थिती पाहता इंधन बचत आणि अनावश्यक परदेशी दौरे टाळण्याचे जे आवाहन केले, त्याला प्रतिसाद देणे मी माझे कर्तव्य समजते. रेड कार्पेटची संधी भविष्यात पुन्हा मिळू शकते, पण देशाला प्राधान्य देणे अधिक महत्त्वाचे आहे. रेड कार्पेट थांबू शकतं, देश नाही!", अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >