Friday, July 3, 2026

CM Devendra Fadnavis : क्यूबेकसोबतच्या भागीदारीतून महाराष्ट्रात मोठ्या गुंतवणुकीची शक्यता; मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास

CM Devendra Fadnavis : क्यूबेकसोबतच्या भागीदारीतून महाराष्ट्रात मोठ्या गुंतवणुकीची शक्यता; मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास

कॅनडातील क्यूबेक प्रांतांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसमवेत भेट

मुंबई : महाराष्ट्र आणि कॅनडातील क्यूबेक प्रांत यांच्यात विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण चर्चा झाली आहे. क्यूबेक प्रांताच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( CM Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. या बैठकीत कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम कम्प्युटिंग, सायबर सुरक्षा, खाण संशोधन, शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीच्या संधींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, देशात येणाऱ्या परकीय गुंतवणुकीपैकी मोठा हिस्सा महाराष्ट्रात येतो. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्रात क्यूबेकसोबत भागीदारी वाढवण्यास राज्य सरकार तयार असून या सहकार्यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येण्याची अपेक्षा आहे. (Maharashtra Investment)

बैठकीदरम्यान २०१८ मध्ये मॉन्ट्रियल येथे झालेल्या सामंजस्य करारांची आठवण करून देण्यात आली. माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवीकरणीय ऊर्जा, जैवतंत्रज्ञान आणि आदिवासी विकास या क्षेत्रांतील सहकार्य पुढे नेण्यावर भर देण्यात आला. (Maharashtra News)

मुख्यमंत्र्यांनी नवी मुंबईत उभारण्यात येणाऱ्या एज्युसिटीमध्ये क्यूबेकमधील विद्यापीठांनी विशेषतः मायनिंग इंजिनिअरिंगसारखे अभ्यासक्रम सुरू करण्याचे आवाहन केले. तसेच राज्यात सुरू असलेल्या वाढवण बंदर प्रकल्प, डिफेन्स कॉरिडोर, डेटा सेंटर, बॅटरी स्टोरेज आणि कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील संधींबाबतही माहिती दिली.

क्यूबेकचे आंतरराष्ट्रीय व्यवहार मंत्री क्रिस्टोफर स्किट यांनी महाराष्ट्रासोबत दीर्घकालीन भागीदारी करण्याची इच्छा व्यक्त केली. कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सेंटर, शिक्षण आणि क्रिटिकल मिनरल्स या क्षेत्रांमध्ये क्यूबेककडे मोठा अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच क्यूबेकमधील गुंतवणूक संस्था भारतात मोठी गुंतवणूक करण्यास उत्सुक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या बैठकीमुळे महाराष्ट्र आणि क्यूबेक यांच्यातील आर्थिक व औद्योगिक सहकार्याला नवी दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा