Friday, May 15, 2026

BMC चे पाणीकपातीनंतर बुस्टर पंपांवर कारवाईचे निर्देश

BMC चे पाणीकपातीनंतर बुस्टर पंपांवर कारवाईचे निर्देश

घोषणा झाल्यापासून झोपलेले महापालिका अतिरिक्त आयुक्त आता झाले जागे

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : पावसाळापूर्व नियोजनाचा भाग म्हणून मुंबईत शुक्रवार दिनांक १५ मे २०२६ पासून १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली असून या कपातीची घोषणा २० ते २५ दिवसांपूर्वी करण्यात आल्यानंतर कोणत्याही प्रकारची सुक्ष्म उपाययोजना न करणाऱ्या प्रशासनाला आता जाग आली. त्यामुळे आता कपातीनंतर अति दाबाने पाणी पुरवठा होण्यासाठी लावण्यात येणारे बुस्टर पंप आदींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. विशेष म्हणजे जलवाहिनीला पंप लावणे हे नियमांचे उल्लंघन करणारे असून महापालिकेचे अतिरिक्त आयुक्तांसह सर्व मुंबईकरांवर कपात लादताना या प्रकारांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होते असे आता स्पष्ट दिसून येत आहे.

मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणीसाठ्यात लक्षणीय घट झाल्याने उपलब्ध पाणीसाठ्याचा अधिक काळ परिणामकारक वापर करता यावा, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून महानगरपालिका प्रशासनामार्फत शुक्रवार, १५ मे २०२६ पासून १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष कार्यस्थळी कार्यरत जल अभियंता विभागातील दुय्यम अभियंता व सहायक अभियंता यांची महत्त्वपूर्ण बैठक गुरुवारी १४ मे २०२६ रोजी महानगरपालिका मुख्यालयात पार पडली. या बैठकीत अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी उपस्थित दुय्यम अभियंता व सहायक अभियंता यांच्याशी संवाद साधला.

पाणीकपातीच्या कालावधीत नियमित वेळेत व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होईल, हे सुनिश्चित करावे. पाणीकपातीमुळे कोणत्या भागांमध्ये तथा परिसरांमध्ये अडचणी उद्भवण्याची शक्यता आहे, याचा आढावा घेऊन त्यावरील उपाययोजनांचे स्वयंस्फूर्तीने क्षेत्रनिहाय तथा प्रभागनिहाय सूक्ष्म स्तरावर नियोजन करावे. त्‍याबाबतचा कृती आराखडा तयार करावा. संबंधित उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. पाणीकपातीच्या काळात वितरण व्यवस्थेवर सातत्याने लक्ष ठेवून नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्‍यावी. नागरिकांना कमीत-कमी असुविधा होईल, झळ पोहोचणार नाही, याबाबत दुय्यम अभियंता व सहायक अभियंता यांनी विशेष दक्षता बाळगावी, असे स्‍पष्‍ट निर्देश अतिरिक्‍त आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांनी दिले.

जलवाहिन्यांवर अथवा थेट नळजोडणीवर अनधिकृतरीत्या विद्युत मोटार (पंप) लावून पाणी उपसा करणाऱ्यांविरोधात महानगरपालिका प्रशासनाकडून कठोर व अधिक तीव्रतेने कारवाई करावी, असे निर्देश देताना अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर म्‍हणाले की, काही भागांत कमी दाबाने पाणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त होतात. महानगरपालिका प्रशासनामार्फत केल्‍या जाणाऱ्या तपासणीदरम्यान काही नागरिकांकडून थेट जलवाहिन्यांवर तथा नळजोडणीवर विद्युत मोटारी लावून जादा पाणी उपसा केला जात असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे इतर भागांतील नागरिकांना पुरेशा दाबाने पाणी मिळण्यात अडचणी निर्माण होतात. पाणी कपातीच्या काळात सर्व नागरिकांना समान प्रमाणात पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

जलवाहिन्यांवर अथवा थेट नळजोडणीवर अनधिकृतरीत्या विद्युत मोटार बसवून पाण्याचा उपसा करणे हा दंडनीय अपराध आहे. अशा प्रकारांमुळे पाणीपुरवठा व्यवस्थेवर अतिरिक्त ताण निर्माण होतो तसेच काही ठिकाणी दूषित पाणी मिसळण्याचा धोकाही वाढतो. याबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यात यावी तसेच अशा प्रकारांपासून परावृत्त करण्यात यावे. अनधिकृत विद्युत मोटार आढळून आल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करून त्या मोटार जप्त करण्यात येईल. वारंवार नियमभंग करणाऱयांचा नळजोडणीद्वारे होणारा पाणीपुरवठा खंडित करण्यात येईल. तसेच, संबंधितांविरुद्ध दंडात्मक कारवाईबरोबरच फौजदारी गुन्हाही दाखल करण्यात येणार असल्याची माहिती नागरिकांना देण्यात यावी, असे निर्देशही बांगर यांनी दिले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >