Wednesday, May 13, 2026

Milk Price : जाणून घ्या अमूल आणि मदर डेअरीचे दूध किती महागले ?

Milk Price : जाणून घ्या अमूल आणि मदर डेअरीचे दूध किती महागले ?

नवी दिल्ली : अमूल आणि मदर डेअरी या दोन कंपन्यांनी त्यांच्या सर्व ब्रँडच्या दुधाचे दर प्रति लिटर दोन रुपयांनी वाढवले आहेत. हा निर्णय गुरुवार १४ मे २०२६ पासून लागू होणार असल्याची माहिती दोन्ही कंपन्यांनी प्रसिद्धीपत्रक काढून दिली आहे. नवे दर देशभर लागू असतील असेही कंपन्यांनी जाहीर केले आहे. याआधी दोन्ही कंपन्यांनी एप्रिल २०२५ मध्ये दरवाढ केली होती. पंजाबच्या वेरका या आघाडीच्या डेअरीनेही त्यांच्या सर्व ब्रँडच्या दुधाचे दर प्रति लिटर दोन रुपयांनी वाढवले आहेत. वेरकाची दरवाढ पण गुरुवार १४ मे २०२६ पासून सर्वत्र लागू होणार आहे. या दरवाढीमुळे लवकरच देशातील इतर डेअऱ्या दूध विक्रीच्या दरात वाढ करण्याची शक्यता आहे.

पश्चिम आशियातील युद्धामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे होणाऱ्या तेल वाहतुकीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. जगभर उर्जेचे संकट निर्माण झाले आहे. अनेक देशांतील कारखान्यांचे कच्च्या मालाच्या पुरवठ्याचे गणित बिघडले आहे. युद्धामुळे मार्च, एप्रिल दरम्यान जगात अनेक ठिकाणी टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. भारताने वेगवेगळे पर्याय शोधून संकटावर तात्पुरती मात करण्याचा प्रयत्न केला. पण आता खत निर्मिती आणि खतांच्या पुरवठ्याचे मोठे आव्हान देशापुढे आहे. यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांसाठी खतांची टंचाई होऊ नये यासाठी मोठा खर्च करावा लागणार आहे. भारताला खते आणि तेलाच्या आयातीवर मागील वर्षीच्या तुलनेत यंदा खूप जास्त खर्च करावा लागेल, अशी भीती व्यकत होत आहे. यामुळेच खर्चाचे नियोजन करण्यासाठी केंद्र सरकारने इतर बाबींवरील खर्चात कपात सुरू केली आहे.

पंतप्रधान मोदींनी नागरिकांना वर्षभर सोने खरेदी टाळण्याचे तसेच पेट्रोल - डिझेल बचतीसाठी सार्वजनिक वाहतुकीच्या पर्यायांचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन केले आहे. मोदींनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्रासह देशातील सर्व भाजपच्या नेतृत्वातील तसेच एनडीएच्या सरकारांनी खर्च कपातीचे नियोजन सुरू केले आहे. स्वतः मोदींनी त्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी आहे. महाराष्ट्रातही मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांच्या संख्येत कपात करण्यात आली आहे. मंत्री आणि अधिकाऱ्यांचे अनेक परदेश दौरे तसेच विमान आणि हेलिकॉप्टरद्वारे होणारे दौरे रद्द करण्यात आले आहेत. जिथे शक्य आहे तिथे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेण्याचे नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाला आणि अधिकाऱ्यांना दिले आहेत. खर्च कपात सुरू झाली असतानाच दूध दरवाढीची बातमी आली आहे. यामुळे इतर कोणकोणत्या वस्तू आणि सेवांची दरवाढ होणार यावरून चर्चेला उधाण आले आहे.

Comments
Add Comment