दी लेडी बॉस - अर्चना सोंडे
२००९ साल. स्वित्झर्लंडमधील कडाक्याच्या थंडीत ‘ती’ आपल्या पती आणि मुलासोबत सुट्टीसाठी गेली होती. पण ती थंडी त्यांच्यासाठी बोचरी ठरली. बाहेर फिरण्याऐवजी त्यांना अनेकदा घरातच थांबावे लागत होते. त्याचवेळी एका कॅफेमध्ये बसलेल्या ‘ती’च्या मनात एक विचार चमकून गेला. “असं काही उत्पादन का नसावं, जे विजेशिवाय किंवा गरम पाण्याशिवाय लोकांना ऊबदार ठेवू शकेल?” हीच कल्पना पुढे ‘वॉर्मी’च्या रूपात साकार झाली. ही अनोखी कल्पना प्रत्यक्षात अवतरणारी ‘ती’ म्हणजे वॉर्मी’ (Warmee) या अनोख्या बॉडी वॉर्मर ब्रँडची सह-संस्थापिका भावना व्होरा.
भावनाचे वडील आणि काका चारचाकी वाहनांच्या ॲक्सेसरीजचा व्यवसाय चालवत होते. त्यांची मुंबईभर सुमारे १७ दुकाने होती. मुंबईतील मालाड येथील पी. डी. लायन्स दालमिया कॉलेजमधून वाणिज्य शाखेत पदवी घेतल्यानंतर, भावनाने सुरुवातीला दुचाकी वाहनांचे डीलरशिप दुकान चालवले. या डीलरशिपचा विस्तार तिने मुंबईत पाच मल्टी-ब्रँड दुकानांपर्यंत केला. मात्र, तिने २००५ मध्ये व्यवसाय बंद केला. व्यवसायाची पार्श्वभूमी असल्याने, तिला उद्योजकतेची नेहमीच आवड होती. स्वतंत्र होण्याच्या इच्छेने प्रेरित होऊन तिने लहान वयातच व्यवसाय सुरू केला. सिटीबँक आणि आयसीआयसीआय बँकेसाठी दुचाकींच्या बाबतीत मुंबईतील पहिली महिला डायरेक्ट सेलिंग एजंट म्हणून ती एक अग्रणी होती. वाहन वित्तपुरवठ्यासाठी तिने या बँकांचे प्रतिनिधित्व केले. मुलगा झाल्यावर, त्याला वेळ देण्यासाठी तिला व्यवसाय बंद करावा लागला. व्यवसाय बंद करेपर्यंत तिच्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल सुमारे २ कोटी रुपये होती. डीलरशिप चालवणे थांबवले असले तरी भावनाने आपल्या मुलाचे संगोपन करत असताना स्वतःच्या शेअर गुंतवणुकीचे आणि ट्रेडिंगचे व्यवस्थापन करण्यासाठी आपल्या विश्लेषणात्मक कौशल्यांचा वापर सुरू ठेवला. याच काळात ती कुटुंब सहलीसाठी स्वित्झर्लंडला गेली आणि तिला कल्पना सुचली.
भावनांचे पती केमिकल इंजिनिअर असल्याने त्यांनी या कल्पनेवर प्रयोग सुरू केले. विविध रसायनांवर संशोधन करत अखेर त्यांनी असे काही फॉर्म्युले विकसित केले, जे हवेच्या संपर्कात येताच उष्णता निर्माण करतात. २०१३ मध्ये त्यांनी वॉर्मी या उत्पादनांची अधिकृतपणे बाजारात सुरुवात केली. सुरुवातीला लोकांना ही संकल्पना समजावून सांगणे मोठे आव्हान होते, पण जसजसे लोकांनी याचा अनुभव घेतला, तसतशी त्याची लोकप्रियता वाढू लागली.
‘वॉर्मी’ उत्पादने म्हणजे हँड वॉर्मर्स, बॉडी वॉर्मर्स, फूट वॉर्मर्स आहेत. ही सर्व उत्पादने विजेशिवाय काम करतात. हवेच्या संपर्कात येताच गरम होतात. सुमारे ८ तास उष्णता देतात. सहज बाळगता आणि वापरता येतात. आज ‘वॉर्मी’ केवळ एक उत्पादन नसून, प्रवास करणाऱ्या आणि थंड हवामानात राहणाऱ्या लोकांसाठी एक आवश्यक साधन बनले आहे. भावना आणि तिच्या पतीने पँथियन फार्मकेम’ अंतर्गत हा ब्रँड लाँच केला. वॉर्मी केवळ भारतात विकले जाते, जे थंड प्रदेशात राहणाऱ्या किंवा प्रवास करणाऱ्या लोकांसाठी आहे. त्यांची बहुतेक विक्री मुंबई, बंगळूरु, चेन्नई, कोलकाता, दिल्ली आणि अहमदाबाद यांसारख्या शहरांमधून होते. ज्यांना थंड हवामानाची सवय नाही, पण सुट्टीमध्ये मौज करण्यासाठी, काम किंवा शिक्षणासाठी थंड प्रदेशात ज्यांना प्रवास करावा लागतो. ते ‘वॉर्मी’चे लक्षयित ग्राहक आहेत. सुरुवातीला, या जोडप्याने विविध दुकानांमध्ये आपल्या उत्पादनांचा प्रचार केला. वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात दिली. अनेक ठिकाणी पॉप-अप स्टोअर उभारले.
भारतात ही एक नवीन संकल्पना असल्याने, ही उत्पादने कशी वापरायची हे लोकांना समजावून सांगण्यासाठी त्यांना अनेक प्रात्यक्षिके घ्यावी लागली. सुरुवातीला, त्यांची उत्पादने भारतातील सुमारे ४०० दुकानांमध्ये, प्रामुख्याने हिमाचल प्रदेश आणि हरियाणात उपलब्ध होती. पहिल्याच वर्षात कंपनीने २ कोटी रुपयांची उलाढाल केली. आज हा व्यवसाय सुमारे १५ कोटी रुपयांच्या वार्षिक महसुलापर्यंत पोहोचला आहे. २०२२ मध्ये त्यांनी ब्ल्यूहीट ही नवीन श्रेणी सुरू केली, जी शरीरातील वेदना कमी करण्यासाठी हीट थेरपी पॅचेस प्रदान करते. तसेच त्यांनी स्वतःचे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Nysh.in सुरू करून व्यवसायाला डिजिटल दिशा दिली. दरमहा फक्त १०० ऑर्डर्स मिळायच्या आता त्यात ५०० पट वाढ झाली आहे. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर आपल्या उत्पादनांचा दबदबा निर्माण केला आहे. त्याचसोबत इतरही ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर त्यांची उत्पादने उपलब्ध आहेत. मुंबईतील लोअर परळ येथे वॉर्मीचे कार्यालय आहे, तर त्यांचा उत्पादन कारखाना मुंबईपासून १२० किमी अंतरावर, बोईसर जिल्ह्यातील तारापूर येथे आहे. त्यांच्याकडे १०० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.
कोणतीही कल्पना छोटी नसते. त्या कल्पनेवर विश्वास ठेवून तिला जर कृतीची जोड दिली, तर कोटींचा व्यवसाय देखील उभारता येतो हे भावना व्होरा यांच्या ‘वॉर्मी’ने सिद्ध केले आहे.






