Tuesday, April 21, 2026

सौर ऊर्जेने उजळतोय दक्षिण महाराष्ट्र

सौर ऊर्जेने उजळतोय दक्षिण महाराष्ट्र

वार्तापत्र : दक्षिण महाराष्ट्र

जागतिक तापमानवाढ आणि पर्यावरणाच्या ऱ्हासाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जग आता शाश्वत ऊर्जेकडे वळत आहे. भारतानेही अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, यामध्ये महाराष्ट्र राज्य अग्रगण्य भूमिका बजावत आहे.

महाराष्ट्रात स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जेच्या दिशेने मोठी झेप घेतली जात असून सौर ऊर्जेच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागात मोठी ऊर्जा क्रांती घडत आहे. राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प, सौर कृषी वाहिनी योजना, तसेच महावितरणच्या विविध उपक्रमांमुळे सांगली, सातारा आणि कोल्हापूर या दक्षिण महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये उल्लेखनीय प्रगती दिसून येत आहे.

राज्यात सौर ऊर्जेची एकूण क्षमता ८,४५० मेगावॅटपर्यंत पोहोचली असून सातारा हा जिल्हा या क्षेत्रात आघाडीवर असल्याचे दिसत. यामुळे केवळ ऊर्जा उत्पादन वाढले नाही, तर पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्वही कमी झाले आहे. या प्रकल्पांच्या अंमलबजावणीत महावितरण या राज्याच्या प्रमुख वितरण कंपनीची महत्त्वाची भूमिका आहे. ही कंपनी राज्यातील हजारो गावांपर्यंत वीज पुरवठा करते. सौर प्रकल्पांना जोडून ऊर्जा वितरण अधिक सक्षम बनवत आहे.

सातारा जिल्हा सौरग्राम संकल्पनेत विशेष अग्रेसर आहे. साताऱ्यातील मान्याचीवाडी हे राज्यातील पहिले "सौरग्राम" ठरले आहे. येथे संपूर्ण गावाची विजेची गरज सौर ऊर्जेद्वारे पूर्ण केली जाते. या संकल्पनेमुळे ग्रामीण भागात २४ तास वीजपुरवठा शक्य झाला असून शाळा, अंगणवाडी, शेती सिंचन आणि घरगुती वापरासाठी हक्काची वीज उपलब्ध झाली आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्येही सौर कृषी वाहिनी योजना आणि रूफटॉप सोलर प्रकल्पांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा)मार्फत शेतकऱ्यांना सौर पंप आणि सिंचनासाठी सौर प्रणाली उपलब्ध करून दिली जात आहे. सौर पंपांमुळे शेतकऱ्यांचा वीज खर्च शून्यावर आला असून, विजेसाठी पावसावर किंवा रात्रीच्या वीज पुरवठ्यावर अवलंबून राहण्याची गरज उरलेली नाही.

सौर ऊर्जेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कार्बन उत्सर्जनात होणारी घट आणि पर्यावरण संरक्षण. ग्रामीण भागातील वीज खंडित होण्याचे प्रकार कमी होऊन सातत्यपूर्ण पुरवठा मिळत आहे. तसेच, 'प्रधानमंत्री सूर्यघर योजना' आणि राज्य शासनाच्या अनुदानामुळे घरांवर सौर पॅनल बसवणे सर्वसामान्यांना परवडणारे झाले आहे. ३ किलोवॅटपर्यंतच्या सोलर प्रणालीवर ४०% पर्यंत अनुदान मिळत असल्याने मध्यमवर्गीय कुटुंबांना याचा मोठा आर्थिक लाभ होत आहे.

दक्षिण महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे स्थानिक रोजगारनिर्मितीलाही चालना मिळाली आहे. सोलर पॅनल बसवणे, देखभाल आणि तांत्रिक सेवा या क्षेत्रांत नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. उद्योग आणि शेती क्षेत्राला स्वस्त वीज उपलब्ध झाल्याने त्यांची उत्पादनक्षमता वाढली आहे. एकूणच, मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प आणि संबंधित योजनांमुळे दक्षिण महाराष्ट्रात सकारात्मक परिवर्तन होत आहे. येत्या काळात या प्रकल्पांचा विस्तार अधिक वेगाने झाल्यास "ऊर्जेत आत्मनिर्भर दक्षिण महाराष्ट्र" ही संकल्पना लवकरच वास्तवात येईल.

Comments
Add Comment