कथा : रमेश तांबे
एक होता राजा. तो खूपच लहरी होता. मनाला वाटेल तसे आदेश द्यायचा आणि सैनिकांच्या बळावर जनतेला ते करायला भाग पाडायचा. एके दिवशी त्यांनी विचित्र आदेश काढला. आपल्या राज्यातल्या जनतेने दिवसा झोपायचे आणि रात्री काम करायचे. अगदी लहान मुलांच्या शाळादेखील रात्री सुरू राहतील. या नव्या आदेशाने सगळे लोक अगदी घाबरून गेले. कारण त्यांचं रोजचं वेळापत्रकच कोलमडून पडलं. कारण दिवसा उजेडी कोणाला झोप येईना आणि रात्री कुणाला झोप आवरेना.
पंधरा दिवसांतच राज्यात गोंधळ माजला. जो तो राजाच्या नावाने खडे फोडू लागला. पण राजाला सांगण्याची हिंमत कोण करणार! जो राजा विरुद्ध बोलेल तो लगेच तुरुंगात जाणार ही प्रत्येकालाच खात्री होती. त्यामुळे सर्वजण राजाचा रात्रभर काम करण्याचा आदेश निमूटपणे पाळत होता. खरी गंमत मुलांची यायची. मुलं दिवसभर उनाडक्या करायची आणि शाळेत जाऊन रात्रभर झोपा काढायची. झोपणाऱ्या पोरांना उठवता उठवता शिक्षक मंडळी अगदी त्रासून गेली होती. शेतकरी, कामगार, उद्योजक या सर्वांना चांगलाच मनस्ताप झाला. काम न करावे, तर शिक्षेला तयार व्हावे. त्यामुळे मोठी माणसे झोप कशीबशी आवरत आपापली कामे करत होती.
राजाने आदेश काढला. दिवसा झोप आणि रात्री काम! हा आदेश फक्त राज्यातल्या जनतेसाठीच होता. पण राज्यामधले प्राणी, पक्षी यांचे काय! सूर्योदयाबरोबर पक्ष्यांचा किलबिलाट सुरू व्हायचा. कुत्री, मांजरी, भटकी जनावरे रस्त्यावर येऊन धिंगाणा घालायची. त्यामुळे लोकांच्या झोपेत अडचणी यायला लागल्या. सगळी जनता हवालदील झाली. पण राजाला सांगणार कोण? हाच प्रश्न प्रत्येकाच्या पुढे होता. शेवटी हा प्रश्न एका शाळकरी मुलाने सोडवला.
तो मुलगा प्रधानांच्या घरी गेला आणि म्हणाला, “प्रधानजी या नव्या नियमाचा मुलांना खूप त्रास होतो. दिवसभर झोप येत नाही आणि रात्री झोप आवरत नाही. तेव्हा राजाला सांगून हा नियम रद्द करा.” प्रधानजी म्हणाले, “बाळा मला सारे कळते आहे, पण राजापुढे कोणाचेच काही चालत नाही.” मग मुलाने थोडा वेळ विचार केला अन् पुढे म्हणाला, “महाराजांचे पुरोहित हे काम करू शकतील.” मग प्रधानांनी राजाच्या पुरोहितांना बोलावले. तेव्हा मुलगा त्यांना म्हणाला, “पुरोहित काका नव्या नियमांचा आम्हा मुलांना खूप त्रास होतो. जरा महाराजांना सांगून नवा नियम बदलायला सांगा.” तशी पुरोहित काकांनी मान खाली घातली.
तो मुलगा म्हणाला, “काका मी सांगतो तसं करा” आणि मग मुलाने पुरोहित काकांना सारे समजावले. तेव्हा काकांच्या चेहऱ्यावर हसूच फुटले. दुसऱ्या दिवशी पुरोहित महाराजांपुढे उभे राहिले. अगदी शांत, चिंताग्रस्त! त्यांना पाहून राजा म्हणाला, “बोला पुरोहित, खूप चिंतेत दिसता! पुरोहित म्हणाले, “महाराज आपल्या राज्यावर एक मोठं संकट येणार आहे. दैवाचा कोप होणार आहे.” हे सांगताच महाराज सावध झाले. त्यांनी पुरोहितांना घाबरतच विचारले की, “काय झाले पुरोहित!” पुरोहित म्हणाले, “काही नाही महाराज, आपल्या नव्या नियमामुळे देवांची पूजा यथासांग होत नाही. देवाला रोज शिळं पाणी आणि शिळी फुलं आपण वाहतो आहोत. त्यामुळे देव आपल्यावर रागावू शकतात. त्यांचा आपल्यावर कोप होऊ शकतो.” पुढे पुरोहित म्हणाले, “महाराज फुले सकाळीच फुलतात आणि अशी पहाटेची फुललेली फुलेच देवाला जास्त आवडतात. हे ऐकून राजा भानावर आला. आपण आदेश देऊन हवं तसं वागायला लोकांना भाग पाडू शकतो, पण निसर्गाला नाही. हे समजताच राजाने आपला निर्णय मोठ्या मनाने मागे घेतला.
मग तो मुलगा पुरोहित काकांकडे गेला आणि म्हणाला, “बघितलंत काका, अशा लहरी माणसांना असंच सांगावं लागतं तरच त्यांना कळतं. तुम्हालाही आणि मलाही ठाऊक आहे की पाणी कधी शिळं होत नाही आणि फुले झाडावर असेपर्यंत ताजीच असतात. शिवाय देव कधी कुणावर रागावत नसतो. हे तुम्हाला अन् मला माहीत आहे. पण या लहरी राजाला काय आणि कसं कळणार म्हणा! पुरोहितांना त्या शाळकरी मुलाचे खूपच कौतुक वाटले.






