प्रशांत िडंगणकर यांच्या ‘मनबाधा’ या ललितलेख संग्रहाचं प्रकाशन नुकतंच माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते झालं. त्यावेळी शेलार यांनी केलेल्या भाषणाचा हा संपादित अंश...
मनबाधा पुस्तक वाचताना लक्षात येतं की, हा लेखक काहीतरी शोधतो आहे. ती राधा आहे. बरं ती राधा काय? तोही प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने समजायचा विषय आहे. त्यांनी तो मांडला. त्यांनी कुठेही हा दावा केला नाही की, हीच राधा. मी सांगतो, तशीच आहे, त्याच पद्धतीने विचार करा, तुम्हाला सापडेलच. मला सापडली आहे की नाही अनुत्तरित आहे. म्हणून एखाद्याला वाटेल की हा शोध ग्रंथ आहे, तर तो केवळ शोध ग्रंथ नाही, हे ललित लेखन आहे, ललित गंध आहे. पण म्हणून केवळ ललित लेखनाचा हा प्रकार आहे इतकं मी मानायला तयार नाही. हे पूर्ण पुस्तक वाचल्यानंतर त्यात एक कविता आहे. माझ्या मते त्यात काही गझला पण दडलेल्या आहेत. पण मनबाधा हे पुस्तक इथपर्यंत सीमित नाही. मी जे मांडतोय कदाचित ते लेखकाचे मत असेल किंवा नसेल ही. मनबाधा हे पुस्तक एका साधना करणाऱ्या साधकाचा आध्यात्मिक प्रवास आहे. लेखक साधक आहे याच्याबद्दल माझ्या मनात तीळमात्र शंका नाही. तो साधना अनुग्रहाच्या रूपाने काय करतो? हे त्याने जाहीर करण्याची गरज नाही. पण हे पुस्तक मात्र नक्की ती राधा शोधताना त्याच्या अाध्यात्मिक प्रवासातल्या टप्प्यांचं प्रवास वर्णन आहे. हा लेखकाचा प्रवाह आहे की, प्रवास आहे? आणि मग उत्तर मला चटकन सापडलं की हा प्रवास आहे. म्हणूनच त्याचा उल्लेख मी अाध्यात्मिक प्रवास केला. लेखक लिहितोय की, राधा एक शक्ती आहे. राधा ही व्यक्ती नसून ती एक शक्ती असल्यामुळेच तिच्या शोधात तो निघालाय. म्हणून याला मी आध्यात्मिक प्रवास म्हणतो. याचं कारण आपल्याला संतांनी हेच तर सांगितलं आहे की, जे निर्गुण निराकार आहे, ते सगुण साकार होणे म्हणजेच तर देव. इतकं व्यापून टाकलेलं निर्गुण निराकार रूपी ते सगुण साकारामध्ये मूर्तीरूप होणं, त्यात तर देवत्व आम्ही पाहतोय. हे लेखन म्हणजे निर्गुण निराकार ते सगुण साकार शक्तीचा त्या शक्तिरूपी राधेचा शोधण्याचा प्रवास आहे. मला याही गोष्टीचा उल्लेख करायला लागेल तो म्हणजे या पुस्तकाच नाव “मनबाधा” असे ठेवले आहे. “मनदोष” असे ठेवलेलं नाही, बाधा आणि दोष दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. बाधा ही आपल्या देहाशी संबंधित अंतर्गत व्यवस्था आहे. दोष हा पिढ्यान् पिढ्या जन्म जन्मांतर आणि जन्म कर्माने माझ्या आत्म्या बरोबर आलेला असतो. म्हणून “मनबाधा” म्हणताना सुद्धा हा लेखक आजच्या देहिक आणि ऐहिक आयुष्यामध्ये आपल्या आध्यात्मिक प्रवासात काय काय गोष्टी वाढून ठेवल्या आहेत हे प्रश्न मांडणार आहे.
लेखकाने ज्या महत्त्वाच्या गोष्टींना स्पर्श केला त्यामध्ये पंचमहाभूत या तत्त्वांना स्पर्श केला आहे. समुद्र म्हटलं पण पृथ्वी आप, तेज, वायू, प्रकाश या पंचमहाभूत तत्त्वांनी निसर्ग बनलेला आणि म्हणून निर्गुण निराकार कुठे आहे? तर तो शब्दांकित नाही, तो दिसणारा नाही, तो निसर्गात पाहतोय. या पंचमहाभुतांच्या सर्व रस्त्यांना तो शोधतो आहे. तो भाष्य करतोय पृथ्वीवर, आपवर, प्रकाशावर, समुद्रावर, कारण हा सगळा त्या निर्गुण निराकाराचा शोध आहे. ते शोधताना लेखकाला आजच्या देहीहिक अवस्थेत एक साधक म्हणून तर त्याला मर्यादा घालणाऱ्या गोष्टी काय आहेत? तर त्या षडरिपू आहेत. म्हणून त्या षडरिपू असलेल्या लोभ, वासना, माया क्रोध, मोह, मत्सर ज्या गोष्टींवर तो भाष्य करतो. या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल पुस्तक वाचल्यावर तो राधारूपी शक्तीला मानवरूपी भक्तीशी संबंध जोडतानाही तो म्हणतो. “पंचमहाभूत तत्त्वातल्या निसर्गातल्या समुद्राप्रमाणे तू अथांग आहेस.”
मी मानवरूपी असलेला भक्त माझ्या भक्तीला त्याचा शब्द किनारा आहे. म्हणजे मला मर्यादा आहे आणि या प्रवासातल्या स्पष्ट गोष्टींवर उल्लेख करताना तो देहिक बरोबरीने पारलौकिक दोन्ही स्तरावर दोन तत्त्व म्हणून त्यातली उत्तर शोधायचा प्रयत्न करतो आहे. हे पुस्तक वाचल्यावर “वाह मजा आली !” काय आनंद आहे! इथपर्यंतची प्रतिक्रिया कदाचित येणार नाही. ती न येणंच हेच या पुस्तकाचे यश आहे. लेखकाने उंची कुठपर्यंत गाठली, तर या आध्यात्मिक प्रवासात मृत्यूनंतरच जीवन यालाही तो स्पर्श करतो. बरं त्याच जीवनाला स्पर्श करताना त्याने स्वतःला मर्यादा घातल्या नाहीत. वाचकांनाही म्हणतो तुम्ही मर्यादित होऊच नका. पण हे करत असताना मृत्यूनंतरच्या जीवनात आत्मारूपी जाण्याआधी करणाऱ्या षोडोपचार किंवा कर्मकांडातल्या गोष्टींवर मात्र तो बोलतोय. म्हणून पुस्तक लिहिताना त्याला असंख्य रात्री झोप आली नसेल. या पुस्तकाचा विचार मनात घोळताना तो असंख्य वेळा जेवला नसेल किंवा पुस्तक प्रत्यक्ष कागदावर उतरवताना शब्दांशी केलेला व्यवहार...(व्यवहार हा शब्दही त्याच्या पुस्तकात आहे) हा एका वेगळ्या उंचीचा असेल याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. तो देहाबरोबर आलेल्या वलयांची चर्चा करतोय. माझ्यासारखा माणूस मानतो की आपल्या देहात आत्मारूपी जीवनात येणारी वलये ही जन्म, कर्म, जन्म जन्मांतराची असतात. काही ऋणानुबंध असतात. त्या ऋणानुबंधातन मुक्ती मिळण्याचा मार्ग विमोचनाचा असेल, तर त्या आधी वलयं आहेत. ती कळलीच पाहिजे आणि त्या वलयांचा सुद्धा उल्लेख या पुस्तकामध्ये लेखक त्या ठिकाणी करतो आहे. हा ललित लेखांचा संग्रह असला तरी लेखक जी विधाने करतोय, ती एका तत्त्वज्ञानाचा अभ्यासक किंवा तार्किक किंवा तात्त्विक उपदेश असावे इतकी गंभीर विधानं त्यातली करतो. तो मांडतोय... स्वतः स्वतःच्या ‘मनबाधा’त लिहिताना तो म्हणतो की, “मनाच्या गोफाची गुंतता मोकळी करताना जर गुंत्याचे भान नसेल तर सगळं गणित कोलमडतं.” आपल्या मनात असलेल्या गोफ उघडायचंच असेल तर त्याच्यात गुंता काय? याचे भान नसले तर सगळं गणित कोलमडतं. हा लेखक विधान करतोय की, “आपलं जीवन जे आहे ते सर्व भौतिक सुखांनी फेसाळलेले पण तो फेस जेव्हा खाली बसतो तेव्हा जी जाणीव होते ती खऱ्या सुखाची जाणीव!” प्रेताला जेव्हा अग्नी दिला आहे त्यावेळेला चितेच्या भोवती उभा राहणाऱ्या सर्व व्यक्ती संदर्भात हा लेखक म्हणतो की, “भडभडणाऱ्या अग्नी समोर उभी असतात ती माणसे आहेत की नाती आहेत? “प्रश्न चिंता आणि चौकटीमध्ये अडकलेल्यांना जगण्याचा मोकळा श्वास घेता येत नाही !” अशी असंख्य विधाने यात आहेत. या सगळ्या गोष्टीची, तात्त्विक विधानांची मीमांसा सुद्धा तो करतो आहे.
एका अर्थाने पाहिलं तर हा असा लेखक मला वाटतो की जो आपल्याच पुस्तकाच्या माध्यमातून अक्षरांची मांडणी करताना, स्वतःच नवीन व्याख्या निर्माण करतोय. मग त्यामध्ये या पुस्तकात तो सुख, प्रेम, माणूस आणि मत्सर याची अशी चपखल व्याख्या करतोय की ती अन्यथा आपल्या जीवनात डोकावून बघितलं तर आपल्याला त्या ठिकाणी दिसते. मला तर तो काही ठिकाणी प्राणीमित्र सुद्धा दिसतो. त्याचं कारण या पुस्तकामध्ये मधमाशाच्या पंखांना सुद्धा आवाज असतो. नसेल तुम्हाला आणि मला जाणे तो त्याबद्दल बोलतोय. तो पिंड ते ब्रह्मांड यांची चर्चा करताना कावळ्याचं महत्त्व सांगतोच आहे. पण बरोबर चिमणी काय घेऊन जाते? आणि तिची गरज काय असते? बगळा समुद्र किनाऱ्यावरून त्या पिंडाच्या लावलेल्या तीन गोळ्यांकडे बघून काय म्हणतो? याचा उल्लेख सुद्धा तो करतो. आणि म्हणून हे पुस्तक केवळ ललितबंधाचं असं मला वाटत नाही. याची व्याप्ती त्या ठिकाणी मोठी झालेली दिसते आणि म्हणून या पुस्तकात अद्भुत अशा पद्धतीचा वाङ्यीन व आध्यात्मिक प्रवास सुद्धा आपल्याला दिसतो.
निसर्गाचं वर्णन करताना निसर्ग म्हणजे स्त्रीच आहे असं करतो. तो पुरुष आहे की स्त्री हा वादाचा मुद्दा नाहीये. पण मला असं वाटलं की त्याने केलेलं वर्णन त्याच्या शब्दात सांगायचं झालं तर अमावस्येच्या रात्रीला ज्यावेळी अंधार दाटून येतो त्यावेळेस आकाश साध्या डोळ्यांनी दिसत नाही आणि मग तिचं रूपक करतो तो स्त्रीच्या एका विशिष्ट अवस्थेची आठवण करून देतो. ज्यावेळी ग्रहण लागते चंद्राला त्यावेळेचे आकाश हे गर्भवतीच्या उजळणाऱ्या चेहऱ्याप्रमाणे भासू लागते. निसर्गातल्या सर्व गोष्टींना स्त्रीची उपमा देतोय अशी असंख्य उदाहरणे आहेत. तशाच प्रकारे यात गझलेचा दर्द ही ठासून भरलेला आहे. हा लेखक लिहितोय की, “प्रेम कधी केलं होतंस तिच्यावर? व्यवहार दळला होतास जात्यावर!” पुढे तो म्हणतोय... “मला पिंडदान करतानाही तू हसत होतीस मला आज तू जास्त आनंदी दिसत होतीस!” त्यामुळे या पद्धतीचा लेखन करणारा हा लेखक आणि त्याचा हा आध्यात्मिक प्रवास आणि तो देहिक माध्यमातून पंचमहाभूतत्वाच्या धांडोळ्यातून असला तरी, हे लेखन म्हणजे केवळ राधा शोधण्याचा धांडोळा नाही, त्या शक्ती शोधण्याचा धांडोळा नाही, काहीतरी मिळावं म्हणून केलेली धावपळ पण नाही, ती धावही नाही, पण तो जे शोधतोय ते रूप दिसण्यासाठीचा त्याचा “धावा” असे माझं मत आहे. तो धावा परमपूज्य पंत महाराज बाळेकुंद्री यांनी त्यांच्या पदात “दत्त प्रेमलहरीमध्ये म्हटलंय त्यातल्या ओळींमध्ये मला दिसतो. धाव पाव रे अवधुता माय बाप तू बंधू सोयरा... या संपूर्ण पदाचे निरूपण केले तर या शोधाचे सगळे धागेदोरे आपल्याला सापडतात. अशा या अति गर्भित आणि मराठी साहित्यातल्या वेगळ्या छटा निर्माण करणाऱ्या पुस्तकाला आणि त्या लेखकाला माझ्या
मनापासून शुभेच्छा!






