Saturday, April 18, 2026

शुभकार्याची करा सुरुवात

शुभकार्याची करा सुरुवात

मनस्विनी : पूर्णिमा शिंदे

वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय्य तृतीया. हा साडेतीन मुहूर्तांपैकी पूर्ण मुहूर्त असणारा सण. मुळात अक्षय्य या शब्दाचा अर्थच आहे क्षय न पावणारे. खंडन न होणारे, नाश न पावणारे. या दिवशी पितृ पूजन देखील केली जाते. अत्यंत पूजनीय धार्मिक उत्सव आणि जल्लोषाचा हा दिवस चैत्रात बसवलेल्या चैत्रागौरीचे विसर्जन या दिवशी केले जाते उन्हापासून रक्षण करणाऱ्या छत्री, जोडा, दान करावा किंवा स्त्रिया हळदीकुंकूमध्ये हळदीकुंकू आणि काही वाण दान करण्याची प्रथा पूर्वापार आहे. अक्षय्य तृतीयेला विशेष अशी खरेदी केली जाते. सोनं-नाणं, मोहरा, सिक्के चांदी किंवा घर खरेदी आणि वाहन खरेदीसुद्धा आवर्जून याच दिवशी केली जाते. शुभशकून मानला जातो. नव्या घराची वास्तुशांती असेल गृहप्रवेश असेल याच दिवशी शुभ मानला जातो. कोणताही मुहूर्त न काढता साडेतीन मुहूर्तांपैकी अखंड मुहूर्त म्हणून या दिवशी पूजा होते.

या दिवशी मातीचे माठ रांजण गोरगरिबांना दान करावे. त्याने पुण्याचं संचय वाढतो. त्या दिवशी गोरगरिबांना आंबे दान करावेत. कारण आंबे खाण्याची सुरुवात ही या दिवसापासून होऊन आरोग्य उत्तम राहतं. मिठाई, गोड पदार्थ व स्त्री कापड, झाडांची रोपे त्याचप्रमाणे मानव उपयोगी धनधान्य या दिवशी दिल्याने उत्तरोत्तर भाग्य सुधारते. प्रगती होते. आपल्या धान्यात वाढ होते असे या दानामागील खरे पुण्य आहे. या सणानिमित्त मंत्र पठण, हवन पूजा, जप, अनुष्ठान, नामस्मरण इत्यादी देखील करणे अत्यंत महत्त्वाचे असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पितृ पूर्वजांचे स्मरण करणे. पितृश्राद्ध घालावे. त्यानंतर यथाशक्ती ब्राह्मण भोजन घालावे आणि पितृ तर्पण करावे. या दिवशी आपण पूर्वजांचे पूजन करावे. नैवेद्य दाखवावा. यथोपचार त्यांची पूजा करावी. शुभाशीर्वाद घ्यावेत असाही नेम आहे. थोडक्यात काय तर कोणतेही शुभकार्य या दिवशी सुरू केल्यास कायमस्वरूपी ते टिकून राहते. त्यात खंड पडत नाही हेच ते अक्षय्य. या दिवशी शस्त्रांची पूजा देखील केली जाते. दागदागिने, नवीन वस्त्र, वस्तू यांची पूजा करून त्या परिधान केल्या जातात. मंडळ, कार्यालय, घरे, गाड्या, मोठमोठ्या वास्तू यांचे उद्घाटनही या दिवशी खरेदीसह केले जाते. नवीन व्यवसायाची सुरुवात केली जाते. कारण शुभमुहूर्तावर केल्यास आपल्याला आयुष्यभर काहीच कमी पडत नाही. सुदाम्याने श्रीकृष्णाला मूठभर पोह्याची परचुंडी दिली. मित्रप्रेम, मित्र धर्म यांना जागणारे. मित्र प्रेमासाठी अनन्यसाधारण हा दिवस. श्रीकृष्णांनी सुद्धा सुदाम्याला त्याच्या नकळत अपार धनसंपत्ती प्रदान केली. देवीअन्नपूर्णेचा जन्म ही अक्षय्य तृतीयेचाच. अक्षय्य तृतीयेला श्रीकृष्णाला अक्षय पात्र दिले होते. द्रौपदीच्या वस्त्रहरणावेळी श्रीकृष्णाने अक्षय्य वस्त्र, वस्त्रदान केले होते अशी आख्यायिका आहे. खरे तर अक्षय्य म्हणजे अविनाशी.

कधीच विनाश न पावणारे आणि म्हणून इथे पुण्य करावं. त्या पुण्याचा विनाश होत नाही. या दिवशी मातीचं भरलेले माठ गरिबांना दान केले पाहिजे. ते पाण्याने भरलेले असेल तर त्या माठातील थंड पाणी पिण्यास सुरुवात केल्याने आरोग्य सुधारते. कारण हे उन्हाळ्याचे दिवस असतात. या ऋतूत आंबे खाल्लेले आरोग्यास चांगले. या दिवशी आंब्याचे दान द्या. या दिवशी पहाटे स्नान करून नरनारायणासाठी भाजलेले जव, अगर गव्हाचे पीठ परशुरामासाठी कोवळी वाळके आणि हयग्रीवासाठी भिजवलेली हरभऱ्याची डाळ घालून नैवेद अर्पण करावा. शक्य असल्यास उपवास करावा. गंगास्नान करावे. त्याचप्रमाणे सातू, दहीभात, उसाचा रस, खवा, मिठाई, जलपूर्ण माठ, धान्य, सर्व प्रकारचे रस, फळे यांचेही दान करावे.

बद्रीनारायण मंदिराचे दरवाजे या दिवशीच उघडले जातात. अक्षय्य तृतीया ही अक्षय्य सुखाची कारक आहे. या दिवशी केलेले जप, तप, दान, पुण्य यांचा कधीही क्षय किंवा नाश होत नाही. श्री विष्णूच्या २४ अवतारांपैकी भगवान परशुराम, नरनारायण व हयग्रीव हे अवतार पृथ्वीतलावर अक्षय्य तृतीयेच्या दिवशी प्रकट झाले. याच दिवशी श्री वेद व्यासांनी महाभारत लेखनास प्रारंभ केला. म्हणूनच अक्षय्य तृतीयेचा हा दिवस अत्यंत धार्मिक आणि महत्त्वाचा उत्सव मानला जातो. हा अक्षय्य तृतीयेचा सण आपल्या जीवनात सुख-समृद्धी, यश, आरोग्य, स्वास्थ्य घेऊन येवो, आपल्या आयुष्यात अक्षय्य सुख, धनसंपदा, मैत्री लाभण्यासाठी सर्वांना अक्षय्य तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा!

Comments
Add Comment