Sunday, April 19, 2026

Iran vs US : व्हायरल ऑडिओवरून नवा वाद; इराणने ट्रम्प यांना ‘इडियट’ संबोधल्याचा दावा

Iran vs US : व्हायरल ऑडिओवरून नवा वाद; इराणने ट्रम्प यांना ‘इडियट’ संबोधल्याचा दावा

तेहरान : पश्चिम आशियात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेतील इराणी दूतावासाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सोशल मीडियाद्वारे जोरदार टीका केली आहे. एका व्हायरल समुद्री ऑडिओ क्लिपवरून दूतावासाने ट्रम्प यांच्यावर निशाणा साधत वाद निर्माण केला आहे. हा संपूर्ण वाद त्या कथित ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर सुरू झाला, ज्याला इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्स (आयआरजीसी) नौदलाचा रेडिओ संदेश असल्याचा दावा केला जात आहे. या ऑडिओमध्ये ‘इडियट’ हा शब्द ऐकू येतो, ज्यावरून सोशल मीडियावर विविध दावे करण्यात आले. काहींनी तो शब्द इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांसाठी वापरला असल्याचे म्हटले, मात्र इराणी दूतावासाने हे दावे फेटाळून लावले. प्रिटोरिया येथील इराणी मिशनने ट्रम्प यांनाच ‘इडियट’ संबोधले असल्याचा दावा केला आहे. दूतावासाच्या मते, व्हायरल संदेशातील हा शब्द ट्रम्प यांच्यासाठी वापरण्यात आला होता, इराणच्या कोणत्याही अधिकाऱ्यासाठी नव्हता. व्हायरल ऑडिओमध्ये आयआयजीसी नौदलाने जहाजांना इशारा दिला आहे की होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे इराणच्या नियंत्रणाखाली आहे. समुद्री चॅनेल 16 वर जारी करण्यात आलेल्या संदेशात म्हटले आहे की, हा महत्त्वाचा मार्ग खुला करण्याचा निर्णय केवळ इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाच्या आदेशानुसारच होईल, बाह्य दबावामुळे नाही. तसेच, या मार्गाने प्रवास करू इच्छिणाऱ्या जहाजांना इराणी नौदलाची परवानगी घ्यावी लागेल, असेही सांगण्यात आले आहे. आयआरजीसी ने स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की, कोणतेही जहाज परवानगीशिवाय सामुद्रधुनी पार करण्याचा प्रयत्न केल्यास त्यावर हल्ला केला जाऊ शकतो. विशेषतः इराणविरोधी देशांशी संबंधित जहाजांना हा इशारा देण्यात आला आहे. इराणने आरोप केला आहे की अमेरिकेने युद्धविरामाच्या अटींचे पालन केले नाही आणि इराणी जहाजे व बंदरांवरील निर्बंध हटवले नाहीत. याच प्रत्युत्तरात होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले आहे. यापूर्वी इराणने मर्यादित स्वरूपात गैर-लष्करी जहाजांना मार्ग देण्याची परवानगी दिली होती, मात्र आता ती व्यवस्थाही संपुष्टात आली आहे. सामुद्रधुनी बंद झाल्यानंतर आयआरजीसी ने परिसरातील सर्व जहाजांना हाय अलर्टवर राहण्याचा इशारा दिला आहे. फारसच्या आखातातून किंवा ओमान समुद्रातून पुढे जाण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा ते शत्रूला सहकार्य मानले जाईल, असे सांगण्यात आले आहे.इराणने पुन्हा एकदा स्पष्ट केले की या भागातील नियम ठरवण्याचा अधिकार फक्त त्यांच्या नौदलाकडे आहे. होर्मुझ सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाच्या तेलवाहतूक मार्गांपैकी एक आहे, जिथून जागतिक ऊर्जा पुरवठ्याचा मोठा हिस्सा जातो. त्यामुळे येथे वाढणारा तणाव आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आणि समुद्री व्यापारासाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >