मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्पाच्या टप्पा १ आणि टप्पा २ अंतर्गत दिनांक १३ एप्रिल २०२६ अखेर एकूण १,७३६ रस्त्यांचे मिळून ४९६.८३ किलोमीटर लांबीचे काँक्रिटीकरण पूर्ण करण्यात आले आहे. या अंतर्गत शहर विभागातील शीव येथील रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण कामांची पाहणी भिडे यांनी केली. ३० एप्रिल २०२६ नंतर कोणतेही खोदकाम हाती घेऊ नये. काँक्रिट ओतण्याची कामे १५ मे २०२६ पर्यंत पूर्ण करावी. तसेच, रस्त्यांची सर्व कामे पूर्ण करून ३१ मे २०२६ पर्यंत रस्ते वाहतुकीस खुले करावेत, असे निर्देश भिडे यांनी दिले.
महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी गुरुवार १६ एप्रिल २०२६ शहर विभागातील विविध विकास कामांची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. त्यात धारावी येथील ४१८ दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेचे मलजल प्रक्रिया केंद्र, शीव (सायन) येथील रेल्वेमार्गावरील उड्डाणपूल, शीव येथील रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण कामे, चुनाभट्टी रेल्वे स्थानक परिसरात पावसाचे पाणी साचू नये म्हणून पर्जन्य जलवाहिन्या विभागाने केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आदींचा समावेश आहे. या पाहणीवेळी त्यांनी विविध निर्देश दिले. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यावेळी उपस्थित होते. या पाहणी दौ-यास महानगरपालिकेचे उपायुक्त (आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड, उपायुक्त (विशेष) विनायक विसपुते, उपायुक्त (पायाभूत सुविधा) गिरीश निकम, प्रमुख अभियंता (पूल) राजेश मुळे, प्रमुख अभियंता (रस्ते) मंतय्या स्वामी, प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) कल्पना राऊळ यांच्यासह संबंधित अधिकारी तसेच अभियंते उपस्थित होते.
चुनाभट्टी रेल्वे स्थानक : चुनाभट्टी रेल्वे स्थानक परिसरात सन २०२४ मध्ये पावसाचे पाणी साचले होते. सन २०२५ मध्ये पावसाळी पाणी साचू नये म्हणून महानगरपालिकेच्या वतीने काही उपाययोजना करण्यात आल्या. त्यामुळे दिनांक १९ ऑगस्ट २०२५ वगळता संपूर्ण पावसाळ्यात एकही दिवस पाणी साचले नाही. या सर्व उपाययोजनांची पाहणी भिडे यांनी केली. हायवे सोसायटीच्या सखल भागात साचणारे पावसाचे पाणी उपसा करून सोमय्या नाल्यात सोडले जाते.तर, रेल्वे हद्दीत उभारलेल्या जल साठवण टाकीमध्ये गोळा झालेले पावसाळी पाणी रहेजा भूखंडाच्या बाजुला असणा-या पर्जन्य जलवाहिनीत सोडले जाते. तेथून हे पाणी डंकन नाल्यास येऊन मिळते. ही संपूर्ण व्यवस्था अधिक कार्यक्षमतेने कार्यान्वित करावी, असे निर्देश भिडे यांनी दिले. रेल्वे हद्दीतील टाकीपासून महानगरपालिकेने पाईपलाईन टाकावी, तसेच जल साठवण टाकीतील पाणी उपशाद्वारे सोमय्या नाल्यात सोडावे. त्यामुळे अतिरिक्त फायदा होईल, अशी सूचना रेल्वे अधिका-यांनी केली. रेल्वे आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांनी या प्रस्तावाची शक्यता पडताळावी, असे निर्देश भिडे यांनी दिले.
लघू उपसा केंद्र : चुनाभट्टी रेल्वे स्थानकाबाहेर द्रुतगती मार्गालगत लघू उपसा केंद्र कार्यरत असून त्याची पाहणी महानगरपालिका आयुक्त भिडे यांनी केली. डंकन नाल्यातून येणारा सर्व प्रवाह येथे उपसा केला जातो. ७०० मीटर अंतरापर्यंत रायझिंग मेन टाकून हा प्रवाह राहुलनगर नाल्यापर्यंत नेण्याचे नियोजन आहे. त्यामुळे चुनाभट्टी रेल्वे स्थानक परिसरात येणारा पाण्याचा भार कमी होण्यास मदत मिळणार आहे. त्याची व्यवहार्यता तपासावी. नाल्यातून गाळ काढण्याच्या कामात गुणवत्ता व पारदर्शकता राहावी यासाठी अधिकारी तथा अभियंत्यांनी आग्रही भूमिका घ्यावी, असे निर्देश भिडे यांनी दिले.






