मुंबई : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. आशा भोसले यांना छातीत वेदना होऊ लागल्या म्हणून शनिवारी ११ एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि रविवारी १२ एप्रिल रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तब्बल २० भाषांतून १६ हजारांपेक्षा जास्त गाणी गायलेल्या आशा भोसलेंच्या निधनाचे वृत्त कळताच दिग्गजांचे शोक संदेश येऊ लागले. अनेकांनी श्रद्धांजली वाहिली. याच सुमारास आशा भोसले आणि त्यांची मोठी बहीण दिवंगत लता मंगेशकर यांच्या निधनाशी संबंधित योगायोग समोर आला आहे.
गानकोकिळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लता मंगेशकर यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ रोजी इंदूरमध्ये झाला आणि मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांनी ६ फेब्रुवारी २०२२ रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यावेळी लतादीदी ९२ वर्षांच्या होत्या. तर स्वरस्वामिनी आशा भोसले यांचा जन्म ८ सप्टेंबर १९३३ रोजी सांगलीत झाला आणि मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांनी १२ एप्रिल २०२६ रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यावेळी आशाताई ९२ वर्षांच्या होत्या.
लतादीदी आणि आशाताई दोघींच्या वयात साधारण चार वर्षांचं अंतर होतं. विशेष म्हणजे त्यांच्या चटका लावून गेलेल्या एक्झिटमध्येही साधारण चार वर्षांचंच अंतर आहे.
कधी होणार अंत्यसंस्कार ?
पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. आशा भोसले यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी सोमवारी १३ एप्रिल रोजी त्यांच्या मुंबईतील लोअर परेलच्या निवासस्थानी ठेवण्यात येईल. सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत अंत्यदर्शन घेता येईल. अंत्यसंस्कार संध्याकाळी चार वाजता शिवाजी पार्कच्या स्मशानभूमीत होणार आहेत.






