मुंबई : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार, दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. १० एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी पोर्टलवर निवड यादी व प्रतीक्षायादी घोषित करण्यात आली. त्यानुसार राज्यभरातून आलेल्या २ लाख ८९ हजार २८६ अर्जांमधून १ लाख ५ हजार ८११ विद्यार्थ्यांची निवड झाली. तर ८६ हजार ३४ विद्यार्थी प्रतीक्षायादीत आहेत. या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या भ्रमणध्वनीवर लघू संदेश (एसएमएस) पाठविण्यात आले आहेत.
आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रक्रियेअंतर्गत पात्र शाळांची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रकिया १७ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२६ दरम्यान राबविण्यात आली होती. राज्यभरातील ८ हजार ७०१ शाळांमधील १ लाख १४ हजार ८२६ जागांसाठी २ लाख ८९ हजार २८६ अर्ज आले होते. प्रवेशासाठी आलेल्या अर्जाची सोडत ६ एप्रिल रोजी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत काढण्यात आली. ७ ते १० एप्रिलपर्यंत ऑनलाईन तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केली. पोर्टलवर १० एप्रिल रोजी सायंकाळी निवडयादी व प्रतीक्षायादी घोषित करण्यात आली.
पुण्यातून सर्वांधिक विद्यार्थ्यांची निवड : विद्या प्राधिकरणाकडे आलेल्या अर्जांमधून काढण्यात आलेल्या सोडतीद्वारे १ लाख ५ हजार ८११ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली. यामध्ये पुण्यातून सर्वाधिक १७ हजार ७२८ विद्यार्थ्यांची निवड झाली. त्याखालोखाल ठाण्यातून १० हजार ५७८, नागपूर ६ हजार ९२२, नाशिक ५ हजार ३२६, मुंबई ४ हजार ९४१ आणि छत्रपती संभाजी नगरमधून ४ हजार ८६६ विद्यार्थ्यांची निवड झाली. तर ८६ हजार ३४ विद्यार्थी प्रतीक्षायादीत आहेत. निवडयादी जाहीर झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच ३० पालकांनी प्रवेश निश्चित केले.
मुंबईतील ३ हजार ९४१ विद्यार्थ्यांची निवड : बृहन्मुंबई परिक्षेत्रातील महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळासाठी २५२ शाळांमध्ये ४५५८ जागा आहेत आणि इतर मंडळासाठी ७३ शाळांमध्ये १४६५ जागा आहेत. अशा एकूण ३२५ शाळांमधील ६०२३ राखीव जागांसाठी एकूण १०,३८३ ऑनलाईन पात्र अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी ४ हजार ९४१ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली आहे.
२० एप्रिलपर्यंत प्रक्रिया पूर्ण करा : सोडतीत निवड झालेल्या विद्यार्थ्याच्या पालकांनी मंजुरी व वाटप पत्रची प्रिंट काढावी, सदर पत्र व प्रवेशासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची तपासणी पडताळणी समिती केंद्रावर जाऊन करून बालकाचा ऑनलाईन प्रवेश निश्चित करावा. प्रवेश निश्चित झाल्याच्या प्रवेश पत्राची शाळेसाठीची प्रत घ्यावी आणि शाळेमध्ये जाऊन शाळास्तरावर प्रवेशाबाबतची कार्यवाही पूर्ण करावी. ही प्रक्रिया २० एप्रिलपर्यंत पूर्ण करावी.
प्रवेश न घेतल्यास अर्ज होणार बाद : निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी पाल्याच्या प्रवेशासाठी २० एप्रिलपर्यंत पडताळणी समिती व शाळेशी संपर्क साधून ऑनलाईन प्रवेश निश्चित केला नाही तर बालकाचे नाव निवडयादीतून बाद करण्यात येणार आहे. त्याऐवजी प्रतीक्षायादीतील बालकाला प्रवेशाची संधी दिली जाणार आहे.






