Sunday, April 5, 2026

Nanded Crime : टोळीयुद्धाने नांदेड शहर हादरले; एकाचा थेट रुग्णालयात घुसून खून

Nanded Crime : टोळीयुद्धाने नांदेड शहर हादरले; एकाचा थेट रुग्णालयात घुसून खून

नांदेड शहरात शनिवारी (४ एप्रिल) मध्यरात्री पुन्हा एकदा टोळीयुद्धाचा भडका उडाला. येथील कुख्यात साईलाला आणि सदा गैंगमध्ये वर्चस्वाच्या वादातून मध्यरात्री झालेल्या संघर्षात तीन जणांची हत्या झाली. धक्कादायक बाब म्हणजे एकाची तर चक्क शासकीय रुग्णालयात घुसून हत्या करण्यात आली.

अरिजितसिंग गजानन चव्हाण (२५, रा. बालाजीनगर, नांदेड) तर दुसऱ्या टोळीतील सय्यद आवेज सय्यद खलील (२७) आणि मोहम्मद अरबाज मोहम्मद फारुख (२३, रा. देगलूर नाका, नांदेड) यांचा मृतांमध्ये समावेश आहे. नांदेड शहर या टोळीयुद्धाने हादरले असून शहराच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे.

घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड शहरातील साईलाला आणि सदा टोळीत गेल्या अनेक महिन्यांपासून वर्चस्ववादाची लढाई सुरू आहे. या दोन्ही टोळ्यांमध्ये यापूर्वीही अनेकवेळा संघर्ष उडालेला आहे. दरम्यान सदा टोळीचा अरिजितसिंग चव्हाण हा शुक्रवारी रात्री कॅनाल रोडावील ई-स्क्वेअर परिसरात आपल्या दोन साथीदारांसह धुरंदर हा चित्रपट पाहण्यासाठी गेला होता. रात्री दीड वाजता चित्रपट संपल्यानंतर तो साथीदारांसह घराकडे निघताच आधीपासून तेथेच दबा धरून बसलेल्या साईलाला टोळीच्या आरोपींनी आवेज आणि अरचाजने अरिजितसिंगला आडविले आणि अचानक त्याच्यावर खंजरने हल्ला चढविला. काही क्षणातच अरिजितसिंग रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याचवेळी अरिजितच्या साथीदारांनीही धारदार शस्त्राने हल्ले केले.

रुग्णालयात बेडवरच केली हत्या :

अरिजितसिंगवर हल्या झाल्याची माहिती मिळताच त्याचा भाऊ राजेश चव्हाण हा टोळीतील काही साथीदारांसह रुग्णालयात दाखल झाला. आपल्या भावाचा मृत्यू झाल्याचे त्याला कळताच त्याच्या बाजूच्याच बेडवर उपचारासाठी ठेवलेला आवेज जिवंत असल्याचे कळताच चाकू काडून आवेजवर रुग्णालयातच सपासप वार केले. या हल्ल्यात आवेजचाही मृत्यू झाला.

आधी रस्त्यावर आणि नंतर रुग्णालयातच घडलेल्या या हत्याकांडाने एकच खळबळ उडाली. रुग्णालयात एकच धावपळ उडाली. परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर तेथे उपस्थित पोलिसांनी हल्लेखोरांना पकडले. नंतर रुग्णालयात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

Comments
Add Comment