Thursday, March 26, 2026

धक्कादायक! हॉस्पिटलच्या टीमनेच केला नवजात बाळाचा ३ महिन्यापेक्षा अधिक सांभाळ

धक्कादायक! हॉस्पिटलच्या टीमनेच केला नवजात बाळाचा ३ महिन्यापेक्षा अधिक सांभाळ

सांगली : सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या हॉस्पिटलमध्ये २६ नोव्हेंबर २०२५ रोजी एका बाळाचा जन्म झाला. बाळाच्या जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी त्या बाळाची आई बाळाला सोडून पळून गेली. आईचा शोध घेण्यात आला मात्र ती कुठेच सापडली नाही.

हे बाळ शारीरिक दृष्ट्या नाजूक असल्यानं त्या बाळाचा सांभाळ तेथील स्टाफनेच करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान बाळाला हर्निया झाल्याचेही समोर आले. त्यावर ऑपरेशन सुद्धा करण्यात आलं.

या आईने एका मुलाला जन्म दिला आणि त्यानंतर ती हॉस्पिटलमधून चक्क पळून गेली त्यानंतर सिव्हिल स्टाफने तब्बल महिन्यापेक्षा अधिक काळ या बाळाचा सांभाळ केला. आज म्हणजेच गुरुवारी (२६ मार्च) हे बाळ पुण्याला पाठवण्याची वेळ आली त्यावेळी सिव्हिलच्या स्टाफने बाळाचे नामकरण केलं आहे.

यावेळी आईविना असलेल्या या बाळाचं नाव वीरप्रताप असं ठेवण्यात आलं आहे. शासनाच्या आदेशाने हा तीन महिन्याचा वीरप्रताप पुण्याकडे रवाना झाला असून वीरप्रतापला निरोप देताना त्याचा सांभाळ करणाऱ्या स्टाफला रडू कोसळले.

हे बाळ सांगली सिव्हिल हॉस्पिटलच्या विशेष नवजात शिशु दक्षता केंद्रातील स्टाफ सांभाळत होते. तब्बल तीन महिने या बाळाचा सांभाळ केल्यानंतर कोर्टाच्या आदेशाने आज बाळाला पुण्याला पाठवण्यात आलं. याबाबतचे कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून या बाळाला पुण्याला पाठवण्यात आलं आहे.

सांगली सिव्हिलच्या नर्सिंग स्टाफकडून बाळाच्या नामकरणासाठी पाळणा सजवण्यात आला. रांगोळ्या काढण्यात आल्या. फुग्यानी सजावट करण्यात आली. यावेळी या अनाथ बाळासाठी पाळना सुद्धा म्हणण्यात आला.

शासनाच्या आदेशाने हा तीन महिन्याचा वीर प्रताप आज पुण्याकडे रवाना होणार होता. त्यामुळे त्याला निरोप देण्यासाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटलमधील सर्व स्टाफ एकत्र आला असून यावेळी तीन महिने सांभाळ केलेल्या बाळाला पाठवताना येथील स्टाफ भावूक झाले.

Comments
Add Comment