Thursday, March 5, 2026

राज्यसभेसाठी महाविकास आघाडीकडून शरद पवार रिंगणात

राज्यसभेसाठी महाविकास आघाडीकडून शरद पवार रिंगणात

मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर निश्चित झाला असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. काँग्रेसने या जागेवरील आपला दावा सोडून पवारांना पाठिंबा जाहीर केल्यामुळे ही निवडणूक आता बिनविरोध होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यसभेच्या या जागेवरून महाविकास आघाडीत खलबते सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नेत्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी सातत्याने संपर्क साधून ही जागा पवारांसाठी सोडण्याची विनंती केली होती. या पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार आणि आमदार सतेज पाटील यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भेट घेतली. या चर्चेनंतर काँग्रेसने शरद पवारांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखवला.

काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्याने राज्यसभेच्या या जागेवर त्यांचा 'नैसर्गिक दावा' मानला जात होता. मात्र, शरद पवार यांची संसदीय कारकीर्द आणि महाविकास आघाडीतील त्यांचे स्थान लक्षात घेता, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्वतः पुढाकार घेतला. खर्गे यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांना शरद पवारांच्या पाठिशी उभे राहण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतरच महाविकास आघाडीचा हा फॉर्म्युला निश्चित झाला.

या निर्णयाची घोषणा करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, "शरद पवार हे महाविकास आघाडीचे संयुक्त उमेदवार असतील. आघाडीतील सर्व घटक पक्ष त्यांना मतदान करतील." दरम्यान, शरद पवारांसारखा ज्येष्ठ नेता मैदानात असल्याने, सत्ताधाऱ्यांकडून अतिरिक्त उमेदवार उभा केला जाण्याची शक्यता कमी असून, ही निवड बिनविरोध होईल, असे बोलले जात आहे.

आजोबा - नातू राज्यसभेत

दुसरीकडे, शरद पवारांचे नातू आणि अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार देखील राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यामुळे आजोबा आणि नातू एकत्र राज्यसभेत दिसणार आहेत.

Comments
Add Comment