Wednesday, August 26, 2026

Nashik : मालेगावमध्ये वाद चिघळणार ? टिपू सुलतानच्या प्रतिमेवरून वादाची ठिणगी ; भाजपचा कडक इशारा

Nashik : मालेगावमध्ये वाद चिघळणार ? टिपू सुलतानच्या प्रतिमेवरून वादाची ठिणगी ; भाजपचा कडक इशारा

Nashik : सहा महिन्यांपूर्वी मालेगावच्या उपमहापौर शान-ए-हिंद यांच्या दालनात टिपू सुलतानचे छायाचित्र लावण्यात आले होते. त्यावरून मोठे वादंग निर्माण झाले होते. प्रशासनातर्फे हे छायाचित्र हटविण्यात आल्यानंतर हा वाद तेव्हा शमला होता. आता याच उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतानचे छायाचित्र पुन्हा झळकल्याने हा जुना वाद नव्याने उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. समाजवादी पार्टीच्या नेत्या तथा उपमहापौर शानेहिंद निहाल अहमद हिंद यांच्या महानगरपालिकेतील दालनात महापुरुषांसोबत टिपू सुलतानची प्रतिमा पुन्हा लावण्यात आली आहे. यामुळे मालेगाव शहरात पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

टिपू सुलतानच्या प्रतिमेवरून वाद चिघळणार ?

उपमहापौरपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर शानेहिंद हिंद यांच्या कार्यालयात कार्यकर्त्यांकडून भेट देण्यात आलेली टिपू सुलतानची प्रतिमा लावण्यात आली होती. या प्रतिमेला हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र विरोध केला होता. यावेळी विविध संघटनांनी महापालिका आयुक्तांच्या दालनात हनुमान चालीसा पठण करून आंदोलनही केले होते. त्यानंतर टिपू सुलतान यांची प्रतिमा कार्यालयातून हटविण्याची मागणी विविध हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आली होती. या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर संबंधित प्रतिमा कार्यालयातून काढण्यात आली होती.

दरम्यान, उपमहापौर कार्यालयाच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर मंगळवारी महापौर नसरीन शेख यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यालयात महापुरुषांच्या प्रतिमांसोबत टिपू सुलतानची प्रतिमा पुन्हा लावण्यात आल्याचे समोर आले. याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता, शानेहिंद हिंद यांनी यापूर्वी टिपू सुलतानची प्रतिमा काढण्यात आली नव्हती, असा दावा केला. कार्यालयाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने प्रतिमा सुरक्षित ठिकाणी काढून ठेवण्यात आली होती. आता नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्याने ती पुन्हा लावण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भाजपकडून आंदोलनाचा इशारा

दरम्यान, या कृतीच्या विरोधात शहरातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. या संदर्भात भारतीय जनता पार्टीतर्फे अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले असून,हे छायाचित्र न हटविल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन प्रशासनाने तातडीने न हटविल्यास भाजप आणि शहरातील सर्व हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील,छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुरोगामी आणि स्वाभिमानी महाराष्ट्रात टिपू सुलतानचा उदोउदो अजिबात चालणार नाही, असा कडक इशारा देखील भाजपतर्फे देण्यात आला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >