Wednesday, February 18, 2026

दक्षिण आफ्रिकेचा युएईवर विजय, डेवाल्ड ब्रेविसची झंझावात खेळी

दक्षिण आफ्रिकेचा युएईवर विजय, डेवाल्ड ब्रेविसची झंझावात खेळी

अहमदाबाद  : टी-२० विश्वचषकातील महत्त्वाच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने संयुक्त अरब अमिरातीचा ६ गड्यांनी पराभव करत आपला दबदबा कायम राखला आहे. प्रथम फलंदाजी करताना युएईने दिलेल्या १२३ धावांच्या आव्हानाचा दक्षिण आफ्रिकेने केवळ १३.२ षटकांत पाठलाग पूर्ण केला.

प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या युएईची सुरुवात अडखळत झाली. कर्णधार मुहम्मद वसीमने १२ चेंडूत २२ धावा करून आक्रमक पवित्रा घेतला खरा, पण दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीसमोर युएईचा मध्यक्रम कोलमडला. अलिशान शराफूने सर्वाधिक ४५ धावा (३८ चेंडू) करून संघाला १२२ धावांपर्यंत पोहोचवले. दक्षिण आफ्रिकेकडून कॉर्बिन बॉशने केवळ १२ धावा देऊन ३ बळी टिपले, तर एनरिक नॉर्ट्जेने २ गडी बाद केले.

१२३ धावांचे छोटे आव्हान गाठताना दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी सुरुवातीपासूनच फटकेबाजी केली. कर्णधार एडन मार्करामने केवळ ११ चेंडूत २८ धावा (५ चौकार, १ षटकार) कुटून आक्रमक सुरुवात करून दिली. डेवाल्ड ब्रेविसने २५ चेंडूत ३६ धावांची खेळी केली, ज्यामध्ये ३ उत्तुंग षटकारांचा समावेश होता. रायन रिकेल्टनने सुद्धा १६ चेंडूत वेगवान ३० धावांचे योगदान दिले. युएईच्या गोलंदाजांनी पुनरागमनाचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत सामना आफ्रिकेच्या बाजूने झुकला होता. ट्रिस्टन स्टब्स आणि जेसन स्मिथ यांनी उर्वरित धावा पूर्ण करून विजयावर शिक्कामोर्तब केले.

थोडक्यात धावफलक: युएई : २० षटकांत १२२/६ (अलिशान शराफू ४५, मुहम्मद वसीम २२; कॉर्बिन बॉश ३/१२) दक्षिण आफ्रिका: १३.२ षटकांत १२३/४ (डेवाल्ड ब्रेविस ३६, रायन रिकेल्टन ३०; हैदर अली १/३३) निकाल: दक्षिण आफ्रिका ६ गड्यांनी विजयी.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा