Sunday, February 15, 2026

वृक्षवल्ली आम्हां सोयरे...

वृक्षवल्ली आम्हां सोयरे...

मनस्वीनी : पूर्णिमा शिंदे

पर्यावरणाचा ध्यास, निसर्ग त्याचं एक सुंदर आनंददायी, स्फूर्तिदायी प्रतीक. मनाला ताजतवानं करणारा स्वर्गच म्हणावा लागेल. आत्मबळ वाढवून कार्यगती शक्तीला ऊर्जा देणारे. निसर्ग म्हणजे प्रकृती, प्रवृत्ती, पर्यावरण, हिरवळ, हिरवाई, ऋतू, अवतीभोवतीच्या परिस्थितीवर अधिराज्य करणारी दैवी योजना. दैवी शक्ती. पण हाच निसर्ग दैवी योजनेनुसार नाही, तर मानवाच्या हाताने उन्मळून पडत आहे. उपटून, मिटवून टाकला जात आहे. निसर्गतः उगवणारा स्वयंभू पिंपळ असेल, वड, आंबा, तुळस, औदुंबर, बेल, अशोक अशा अनेक उपयुक्त जडीबुटींचा आपण ऱ्हास करू लागलो आहोत. केवळ मानवी स्वार्थापोटी कुठे रस्ता हवा, वाट हवी तर कुठे बंगले, कुठे सिमेंटचे काँक्रिटीकरण, कुठे मोठमोठे मनोरे, टॉवर उभारले जात आहेत. त्यामुळे मानवी स्वार्थापोटी नदी-नाले, खाड्या, तलाव मिटवले जात आहेत. पाण्याचे स्त्रोत संपवले जात आहेत. जेव्हा जेव्हा असे होते तेव्हा पर्यावरणाचा ऱ्हास होतो. अधिकाधिक हानी होते. निसर्ग म्हणजे धन आहे. खनिज संपत्ती, लाकूड, रेती, वाळू, माती, चिरे, विटा, पाषाण सारे काही लुप्त होत चालले आहे. तसे पाहिले तर निसर्ग दातृत्वाने विशाल आहे. बघा ना. शहाळेचं पाणी मधुर. आंबा, काजू, फणस, संत्री, ऊस, केळी, पेरू, चिकू, सीताफळ, रामफळ प्रत्येक फळाची चवही अतिशय वेगळी, रसाळ, मधाळ आणि त्याचे वेगळेपण ही दैवी किमयाच नाही का?

चिंच, आवळा, बोरं, रातांबा अशी अनेक नावे काढताच आपल्या तोंडाला पाणी सुटते ना, त्याचा विचार, चव, आठवण जिभेवर रेंगाळून जाते. तशी सर्व फळे असतात वैविध्यपूर्ण. फुलांचेही तसेच आहे. गुलाब, जास्वंदी, जाई, जुई, मोगरा, चमेली, कमळ, चाफा, अबोली, नेवाळी, सोनचाफा, रजनीगंधा, गुलछडी, केतकी, बकुळ, पारिजात, लीली, अष्टर, झेंडू, शेवंती, केवडा अशा किती किती! फुलांच्या रंगसंगती आणि रंगीतता, विविधता त्याचा सुवासिक वेगळेपणा ही देखील निसर्गाची किमयाच म्हणावी लागेल. अद्वितीय निसर्गाचा अविभाज्य भाग बनलेली या फुलांच्या सजावटीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मानवी जीवनातील प्रत्येक धार्मिक विधी त्यात सांस्कृतिक सोहळे, सामाजिक संस्कार, मुंज, बारसे, डोहाळे जेवण, लग्न, वाढदिवस, मृत्यूपर्यंत. ही फुलांची उपयुक्तता रांगोळी, देवपूजा आणि मानवाची पूजा यासाठी अनन्यसाधारण आहे. तरीही आपण ही झाडे तोडतो, काय सांगायचं. ही निसर्गाची देणगी आहे, औषधी गुणवत्ता आहे. गुणकारी औषधी गुणधर्म आहेत, धन्वंतरी, संजीवनी बुटी, शतावरी अश्वगंधा, जटामासी ज्येष्ठमध, ओवा, सब्जा, तुळस, गोखरू, हिरडा, पानफुटी, दगडी पाला, आघाडा, दुर्वा, कोरफड, चंदन अशा अनेक विविध गुणधर्मीय वनस्पतींना आपण आजीबाईचा बटवा असे म्हणतो. पूर्वीच्या काळी जरा पोट दुखलं की आपण ओवा खायचो. लघवी साफ झाली नाही तर गोखरुचं पाणी प्यायचो. जुलाब होत असेल तर हिरडा. मुतखडा झाला असेल तर दगडी पाला. चेहऱ्यासाठी चंदन पावडर. काळे वांग असेल तर कोरफड. केसांसाठी मेहंदी आणि कढीपत्ता, जास्वंदाचे मिश्रण करून तेल बनवलं जातं. तेल, खनिज, संपत्ती या अशा अनेक उपयुक्तता या निसर्गाच्या संपत्तीत दडलेल्या आहेत. पण माणूस निव्वळ स्वार्थीपणाने निसर्गाचा ध्यास घेण्याऐवजी पर्यावरणाचा ऱ्हास करू लागला आहे. प्लास्टिकच्या पिशव्यांचा कचऱ्यासाठी वापर करून आज गाई-म्हशींच्या खाण्यातून पोटात जाऊन प्लास्टिकच्या पिशव्यातर येणारं दूध सुद्धा पौष्टिक मिळणार नाही आणि तिच्या पोटामध्ये तो प्लास्टिक कधीच नष्ट होणार नाही. जनावरांना हानिकारक आहे. ओल्या कचऱ्याचा वेगळा साठा करून खतासाठी जर त्याचा उपयोग केला, तर अधिकाधिक उत्तम पीक तयार होईल. शेणखता इतकीच त्याची उपयुक्तता आहे. काही सुवासिक फुलं, औषधी वनस्पतीमुळे होमिओपॅथीची औषधे तयार होतात. आयुर्वेदाचे औषधे तयार होतात, तर काही ठिकाणी सेंट किंवा तरी तयार होतात. सुवासिक परफ्युम तयार होतात.

निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यानंतर झाडे आपल्याशी बोलतात. झाडे, ते ऑक्सिजन पुरवठा करतात. आपली चिंता मिटते, प्रसन्न वाटू लागते. मन प्रसन्न झाले, तर शरीराला देखील ऊर्जा मिळते. निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यामुळे हिरव्यागार वनराईमध्ये आपण आपलं दुःख विसरून. एकांतात सहज स्वच्छंदी मनमुराद जगू शकतो. नवी नवी जगण्याची प्रेरणा आणि कारण मिळू शकते. पुन्हा उभारी मिळू शकते, मनाला आत्मबळ मिळू शकतं, हे सर्व निसर्गाच्या सान्निध्यात करायचे असेल, तर आपण लाकूडतोड बंद केली पाहिजे. प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी केला पाहिजे. पाण्याचे स्त्रोत बुजवणे कमी केले पाहिजे. पाण्याचा संचय केला पाहिजे. पाणी वाया जाऊ देता कामा नये. थेंबा थेंबाचा वापर चांगल्या पद्धतीने केला पाहिजे. ही संजीवनी बुटी असल्याने फुलं, फळं, झाडे, पाणी, खनिज संपत्ती साठा हे निसर्गधन बेताने वापरायला हवं. त्या निसर्गाचा आणि पर्यावरणाचा ऱ्हास होता कामा नये, तर पर्यावरणाचा ध्यास घ्या, रोज झाडांना पाणी द्या, वाढवा, संगोपन करा. वाढदिवसाला झाडे भेट द्या. सांस्कृतिक सोहळे, समारंभ, बैठका, मेळावे यामध्ये मोठे मोठे पुष्पगुच्छ न देता झाडांची भेट द्यावी. जेणेकरून अविस्मरणीय प्रसंग स्मरणात राहील आणि त्या झाडाबरोबर आपली माया वृद्धिंगत होत जाईल. झाडे लावा, झाडे जगवा. पाण्याच्या थेंबा थेंबाचा संचय करा. प्लास्टिकचा वापर टाळा. रोगराई टाळा. लाकूडतोड थांबवा. अशा पद्धतीने आपण आपल्या जवळच्या प्रत्येकाला, नागरिकाला जबाबदारीने कर्तव्याचे पालन करण्याची विनंती करू या. चला पर्यावरणाचा ध्यास घेऊ या.

पर्यावरण संतुलन, संवर्धन आणि जतन करणे हे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्यच आहे. यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा तरच ही सृष्टी, पृथ्वी वाचेल आणि आपणही वाचू शकतो किंवा आपल्या बचाव होईल.

Comments
Add Comment