Tuesday, February 3, 2026

मेट्रो-२ बी वरील मंडाले-चेंबूर टप्पा एप्रिलपासून सुरू

मेट्रो-२ बी वरील मंडाले-चेंबूर टप्पा एप्रिलपासून सुरू

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) जाहीर केले आहे की, मेट्रो लाईन २ बी वरील मंडाले-चेंबूर या मार्गावर मेट्रो सेवा एप्रिलपासून सुरू होण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबईतील पूर्व-पश्चिम मेट्रो कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले जाणार आहे.

सध्या मेट्रो लाईन २ बी वरील सेवा मांडळे-डायमंड गार्डन या टप्प्यापुरती मर्यादित आहे. चेंबूर मेट्रो स्थानकाचा समावेश झाल्यानंतर हा मार्ग वाढवण्यात येणार आहे. मंडाले (मानखुर्द) ते चेंबूर दरम्यान थेट मेट्रो धावणार आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या टप्प्यासोबतच चेंबूर स्थानक सुरू करता यावे यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, चेंबूर स्थानकाचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित बांधकाम, चाचण्या आणि आवश्यक सुरक्षा प्रमाणपत्र प्रक्रिया एप्रिलपूर्वी पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. सर्व मंजुरी मिळाल्यानंतर या मार्गावर प्रवासी सेवा सुरू केली जाईल.

प्रवाशांना लवकरात लवकर दिलासा मिळावा यासाठी मेट्रो लाईन २ बी टप्प्याटप्प्याने सुरू केली जात आहे. तर उर्वरित मार्गांवरील काम सुरूच राहणार आहे. ही मेट्रो लाईन मुंबईच्या पूर्व उपनगरांतील प्रमुख निवासी आणि व्यावसायिक भागांमधील कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात सुधारेल. तसेच रस्ते वाहतूक आणि उपनगरी रेल्वेवरील ताणही कमी करेल. अधिकाऱ्यांच्या मते, टप्प्याटप्प्याने मेट्रो सुरू करण्याच्या धोरणामुळे, उर्वरित काम सुरू असतानाच नागरिकांना मेट्रो नेटवर्कचा लाभ मिळू शकणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >