Thursday, January 29, 2026

Ajit Pawar Passes Away : सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे यांना अश्रु अनावर

Ajit Pawar Passes Away : सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे यांना अश्रु अनावर
बारामती : बारामतीजवळ झालेल्या अत्यंत दुर्दैवी विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचे निधन झाल्याच्या वृत्ताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या बातमीमुळे राज्याच्या राजकीय पटलावर कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली असून संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. अजित दादांच्या निधनाची बातमी समजताच पत्नी सुनेत्रा पवार, जय पवार आणि खासदार सुप्रिया सुळे दिल्लीहून बारामतीत दाखल झाले. विमानतळावर पोहोचल्यावर सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे यांना अश्रू अनावर झाले. सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार बारामती विमानतळावर दाखल झाले तेव्हा वातावरण भावुक झालं होतं.
विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्या ठिकाणी शरद पवार यांचे जुणे सहकारी मित्र विठ्ठल शेठ मणियार उभे होते त्यांना पाहून सुळे आणि सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर झाले. विठ्ठल शेठ मणियार यांना सुप्रिया सुळे म्हणाल्या 'तुमचा लाडला होता' असं म्हणत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनाही अश्रू अनावर झाले. पवार कुटुंबांना पाहून यावेळी उपस्थितीत लोकांच्याही डोळ्यात पाणी आलं.
उपस्थितांचे आभार मानताना जय पवारांना अश्रू अनावर
अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीमध्ये अत्यंत शोकाकुल वातावरण पाहायला मिळत आहे. विद्या प्रतिष्ठानमधील अंत्यदर्शन आटोपल्यानंतर दादांचे पार्थिव पुन्हा रुग्णालयात नेण्यात येणार असल्याची माहिती त्यांचे पुत्र जय पवार आणि पार्थ पवार यांनी दिली. यावेळी जमलेल्या जनसागराशी संवाद साधताना जय पवार यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. जय पवार यावेळी अत्यंत भावूक झाले होते. उपस्थितांशी बोलताना ते म्हणाले, "तुम्ही सर्वांनी दादांवर जे अफाट प्रेम केले, ते आज या गर्दीच्या रूपाने मला दिसत आहे. मी तुम्हा सर्वांचा मनापासून आभारी आहे. दादा आज आपल्यात नसले, तरी ते आपल्या सर्वांच्या मनात आणि हृदयामध्ये कायम जिवंत राहतील." "दादांनी आजपर्यंत आपल्या सर्वांसाठी ज्या जिद्दीने लढा दिला, तसाच लढा आपल्याला भविष्यातही द्यायचा आहे," असा निर्धार जय पवार यांनी व्यक्त केला. उद्या सकाळी ११ वाजता अंतिम संस्कारांसाठी पुन्हा एकत्र येण्याचे आवाहन करताना जय पवारांचा कंठ दाटून आला आणि त्यांच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागले. हे हृदयद्रावक दृश्य पाहून उपस्थित प्रत्येक कार्यकर्त्याचे डोळे पाणावले होते.
"सहकार्य करा, संयम राखा"; पार्थ पवार
दादांचे पार्थिव पुन्हा रुग्णालयात नेण्याची वेळ आली असता, पार्थ पवार यांनी जमलेल्या जनसागराला भावूक साद घालत शांतता राखण्याचे आवाहन केले. वाढती गर्दी आणि चेंगराचेंगरीची शक्यता लक्षात घेऊन पार्थ पवार म्हणाले, "आम्हाला तुमच्या सहकार्याची गरज आहे. येथून बाहेर पडताना सर्वांनी शिस्त पाळावी. कोणालाही धक्का लागणार नाही, विशेषतः महिलांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या." उपस्थित कार्यकर्त्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे, जेणेकरून पुढची प्रक्रिया सुरळीत पार पडेल, अशी कळकळ त्यांनी व्यक्त केली. पार्थ पवारांनी माहिती दिली की, उद्या सकाळी १० वाजता पुन्हा सर्वजण याच ठिकाणी जमणार आहोत. "आम्ही सर्वजण इथे पुन्हा येणार आहोत, तोपर्यंत सर्वांनी शांततेत आपापल्या घरी जावे," असे आवाहन त्यांनी केले. शोकाकुल वातावरणातही पार्थ पवारांनी दाखवलेल्या या संयमी नेतृत्वामुळे गर्दीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >