Tuesday, August 4, 2026

Pune Crime : पुण्यात ९ महिन्यांच्या बाळाच्या तोंडात फेव्हीक्विक ओतल्याची खळबळजनक घटना!

Pune Crime : पुण्यात ९ महिन्यांच्या बाळाच्या तोंडात फेव्हीक्विक ओतल्याची खळबळजनक घटना!

पुणे : कौटुंबिक वादातून चिडलेल्या एका महिलेने स्वतःच्याच ९ महिन्यांच्या निष्पाप पुतण्याच्या तोंडात अत्यंत घातक असे 'फेव्हीक्विक' ओतून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची अत्यंत संतापजनक आणि सुन्न करणारी घटना पुण्यात उघडकीस आली आहे. या प्राणघातक कृत्यामुळे गंभीर जखमी झालेल्या चिमुकल्याला तातडीने ससून रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी लोहगाव पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी महिलेसह तिच्या दोन नातेवाईकांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद केली असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

घरगुती वादातून निष्पाप बालकाला बनवले लक्ष्य

लोहगाव येथील कलवड वस्ती परिसरात घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. पीडित बाळाचे वडील अल्ताप नबी शेख (वय ३९) आणि त्यांचा भाऊ एकाच घरात एकत्र कुटुंबात राहतात. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात किरकोळ घरगुती कारणांवरून सातत्याने वाद होत होते. याच जुन्या भांडणाचा आणि रागाचा बदला घेण्यासाठी भाऊजींची पत्नी सानिया शेख हिने ३१ जुलै २०२६ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास संधी साधली. घरातील सगळे व्यस्त असताना तिने अल्ताप यांच्या अवघ्या ९ महिन्यांच्या 'अली' नावाच्या निष्पाप बाळाच्या तोंडात फेव्हीक्विक ओतले.

रसायनामुळे तोंडात गंभीर जखमा

फेव्हीक्विकमध्ये 'सायनोएक्रिलेट' आणि 'एथिल सायनोएक्रिलेट' सारखी अत्यंत तीव्र रसायने असतात, जी हवेच्या संपर्कात येताच काही सेकंदात घट्ट होतात. हे तीव्र रसायन तोंडात गेल्यामुळे चिमुकल्या अलीचे ओठ एकमेकांना घट्ट चिकटले आणि त्याला तीव्र वेदना होऊन उलट्या सुरू झाल्या. बाळाची प्रकृती बिघडल्याचे पाहताच त्याची आई जैनाब शेख यांच्या हा प्रकार लक्षात आला. बाळाचे ओठ चिकटलेले पाहून घाबरलेल्या आईने तात्काळ पतीला फोन करून बोलावून घेतले. विनाविलंब बाळाला पुण्यातील ससून रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्याला आयसीयूमध्ये ठेवून त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले. सध्या बाळाच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी

बाळाची अशी अवस्था पाहून आई जैनाब यांनी जेव्हा सानियाकडे जाब विचारला, तेव्हा सानियाने त्यांना या घटनेबाबत कोणाला काही सांगितल्यास गंभीर परिणाम भोगण्याची थेट धमकी दिली. एवढेच नव्हे, तर घटनेनंतर सानियाचे नातेवाईक रियाज इमाम हाल्याळ (वय ४८) आणि हाजी मलंग शेख (दोघे रा. कांदिवली, मुंबई) हे रुग्णालयात पोहोचले. त्यांनीही तक्रारदार कुटुंबाला धमकावले की, "मुलगा व्यवस्थित आहे; जर आमच्या मुलीविरुद्ध पोलीस तक्रार केली, तर तुम्हाला बघून घेऊ."

लोहगाव पोलिसांकडून तिघांविरोधात गुन्हा दाखल

या प्रकरणी अल्ताप नबी शेख यांच्या तक्रारीवरून लोहगाव पोलीस ठाण्यात मुख्य आरोपी सानिया शेख तसेच तिला साथ देणारे तिचे नातेवाईक रियाज हाल्याळ आणि हाजी मलंग शेख या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कौटुंबिक रागातून चिमुकल्यावर अशा प्रकारे अमानुष हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. पोलीस उपनिरीक्षक पदमराज गंपले या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >