वॉशिंग्टन डीसी : कायम हिमाच्छादित असलेल्या ग्रीनलँड द्वीप समुहाला कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेचा भाग करण्यासाठी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता एक मोठी ऑफर जाहीर केली आहे. पैसे घ्या आणि ग्रीनलँड द्या; अशी ऑफर ट्रम्प यांनी जाहीर केली आहे. ग्रीनलँडमधील प्रत्येक नागरिकाला दहा हजार ते एक लाख डॉलर पर्यंतची रक्कम देण्याची तयारी ट्रम्प यांनी दाखवली आहे.
अमेरिकेचे अधिकारी ग्रीनलँडमधील नागरिकांसाठी एका खास आर्थिक पॅकेजवर विचार करत आहेत. या योजनेनुसार, ग्रीनलँड डेन्मार्कपासून वेगळे होऊन अमेरिकेत सामील झाले, तर तिथल्या प्रत्येक नागरिकाला भली मोठी रक्कम देण्याची तयारी ट्रम्प प्रशासनाने दाखवली आहे. भारतीय चलनात या रकमेचा विचार केला तर ग्रीनलँडमधील प्रत्येक नागरिकाला साधारणपणे दहा लाख ते एक कोटी रुपयांपर्यंत पैसे मिळण्याची शक्यता आहे. नेमकी किती रक्कम असेल याची अधिकृत आकडेवारी अद्याप जाहीर झालेली नाही. पण ट्रम्प प्रशासन ग्रीनलँडमधील प्रत्येक नागरिकाला पैसे देण्याची तयारी करत असल्याचे वृत्त आले आहे.
ग्रीनलँड हा असा प्रदेश आहे जिथे मे ते जुलै या काळात चोवीस तास सूर्यप्रकाश असतो आणि उर्वरित काळ फक्त बर्फ असतो. या भागातील जीवन अत्यंत कठीण असूनही ट्रम्प या भूभागासाठी आग्रही आहेत. ग्रीनलँडमध्ये सध्या ५७ हजार नागरिक वास्तव्यास आहेत. ट्रम्प प्रशासनाने अधिकृत आर्थिक ऑफर दिली तर ग्रीनलँड काय करणार यावरुन चर्चेला उधाण आले आहे.
ग्रीनलँडवर सध्या डेन्मार्कचे नियंत्रण आहे, तिथले दूरसंचार, संरक्षण आणि परराष्ट्र धोरण डेन्मार्क सरकार हाताळते तर उर्वरित कारभार स्थानिक यंत्रणा हाताळते. पण ग्रीनलँड अमेरिकेचा भाग झाल्यास या देशाचा पूर्ण कारभार अमेरिकेच्या नियंणात येईल. ट्रम्प यांच्या महत्त्वाकांक्षेला डेन्मार्क सरकार आणि ग्रीनलँडकडून सध्या विरोध सुरू आहे. पण आर्थिक ऑफर जाहीर झाल्यावर काय परिस्थिती असेल यावरुन तर्कवितर्क सुरू आहेत. डेन्मार्क हा नाटोमधील मित्र देश असूनही ट्रम्प ग्रीनलँडवर हक्क सांगत आहेत. यामुळे ट्रम्प यांच्या मनात नेमके काय आहे यावरुन उलटसुलट चर्चा सुरू आहे. दुसरीकडे युरोपमधील अनेक देशांनी तसेच नाटोतील अनेक सदस्य देशांनी ट्रम्प यांच्या ग्रीनलँडसाठीच्या आग्रहाला विरोध दर्शविला आहे. पण ट्रम्प त्यांच्या भूमिकेवर आजही ठाम दिसत आहेत.







