Thursday, October 30, 2025
Happy Diwali

रेल्वे जमिनीवरचे ३०६ पैकी १०३ होर्डिंग्ज कोणी बसविले?

रेल्वे जमिनीवरचे ३०६ पैकी १०३ होर्डिंग्ज कोणी बसविले?

मुंबई महानगरपालिकेने केले हात वर

मुंबई : घाटकोपर येथील भलेमोठे होर्डिंग्ज कोसळुन गेल्या वर्षी अनेकांचा मृत्यू झाला होता. तरीही होर्डिग्जबाबत शासनाच्या दोन संस्थामध्ये समन्वय नसल्याचे उघड झाले आहे. मुंबईत मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मालकीच्या जमिनींवर ३०६ होर्डिंग्ज उभारण्यात आले आहेत. मात्र त्यातील १०३ होर्डिंग्ज कोणी बसविले याची माहीती आपल्याकडे नसल्याचे उत्तर मुंबई महापालिकेने माहीतीच्या अधिकारात दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

घाटकोपर प्रकरणानंतरही ‘या’ होर्डिंग्जला कशी काय मंजूरी मिळाली? यावरुन महापालिका आणि रेल्वे तसेच जीआरपी या यंत्रणांमध्ये जुंपली होती. त्यानंतर या रेल्वेच्या मालकीच्या जमिनीवरील होर्डिंग्जचा विषय त्यामुळे ऐरणीवर आला होता.

परेच्या ३५ तर मरेच्या ६८ होर्डिंग्जबाबत गोंधळ

मुंबईत मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मालकीच्या जमिनींवर ३०६ होर्डिंग्ज उभारले गेले आहेत. यात मध्य रेल्वेच्या जमिनीवर १७९ तर पश्चिम रेल्वेच्या जमिनीवर १२७ होर्डिंग्ज आहेत. यापैकी मध्य रेल्वेच्या १७९ होर्डिंग्जपैकी ६८ आणि पश्चिम रेल्वेच्या १२७ होर्डिंग्जपैकी ३५ होर्डिंग्ज कोणी बसवले आहेत याची माहिती महापालिकेकडे उपलब्ध नाही.

याची कोणतीही माहीती पालिकेकडे नाही

मुंबई महापालिकेच्या लायसन्स अधीक्षक कार्यालयाकडे शहरातील होर्डिंग्ज संदर्भातील विविध माहिती विचारली होती. त्यानुसार, लायसन्स अधीक्षक कार्यालयाने मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेच्या जमिनीवरील होर्डिंग्जची आकडेवारी उपलब्ध करून दिली. पश्चिम रेल्वेच्या जमिनीवरील १२७ होर्डिंग्ज आहेत. यात ए वॉर्डात ३, डी वार्डात १, जी दक्षिण २, जी उत्तर १२, के पूर्व २, के पश्चिम १, पी दक्षिण १० तर आर दक्षिण ४ असे ३५ होर्डिंग्ज पश्चिम रेल्वेच्या जमिनीवर आहे. ज्याचा कोणी मालक नाही तर मध्य रेल्वेच्या जमिनीवरील १७९ होर्डिंग्ज आहेत. यात ई वॉर्डात ५, एफ दक्षिण वॉर्डात १०, जी उत्तर वॉर्डात २, एल वॉर्डात ९ आणि टी वॉर्डात ४२ असे ६८ होर्डिंग्ज मध्य रेल्वेच्या जमिनीवर आहे. ज्याचा कोण मालक आहे, याचा कोणतीही माहीती मुंबई महापालिकेकडे नाही, असे माहीतीच्या अधिकारात उत्तर मिळाल्याचे अनिल गलगली यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा