दी लेडी बॉस: अर्चना सोंडे
तिने अमेरिकेतली गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडली. भारतातल्या ग्रामीण भागातील लोकांसाठी, पर्यावरणासाठी काहीतरी करायचे हा उद्देश होता. तिने प्लास्टिकचा पुनर्वापर करून बॅग्स तयार करण्यास सुरुवात केली. अवघ्या एक लाख रुपयांनी सुरुवात झालेली तिची कंपनी आज कोटी रुपयांची उलाढाल करत आहे. ही गोष्ट आहे रिचरखा ब्रँडसच्या अमिता देशपांडे यांची.
अमिताचा प्रवास वळणांनी भरलेला आहे. महाराष्ट्रातील लोणावळ्याजवळील एका गावात अजित आणि अरुंधती देशपांडे यांच्या पोटी अमिता जन्मली. अमिताच्या बाबांचा मासेमारीची जाळी तयार करण्याचा व्यवसाय होता, तर आई गृहिणी होती. बाबांच्या व्यवसायामुळे अमिता आणि तिच्या धाकट्या बहिणीचे बहुतांश बालपण पुणे, लोणावळा आणि सिल्वासा येथे गेले. शिक्षणासोबतच या दोन्ही बहिणींना देशपांडे दाम्पत्यांनी अध्यात्मिक शास्त्र, संस्कृत श्लोक आणि योगासने यांचे धडे दिले. अमिता अगदी बारा-तेरा वर्षांची असताना आदिवासी मुलांना इंग्रजी शिकवत असे. यावरून तिची चुणूक लक्षात येते.
दहावीनंतर अमिता फर्ग्युसन कॉलेजमध्ये जाण्यासाठी पुण्याला परतली. त्यानंतर तिने पुण्यातील कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग फॉर वुमन येथे २००१ ते २००५ या कालावधीत आयटी विषयात विशेष शिक्षण घेतले. खरंतर अभियांत्रिकी ही तिची पहिली पसंती नव्हती. तिला भूगोल किंवा भूगर्भशास्त्र यांसारख्या विषयांचा अभ्यास करायचा होता. पण तिच्या पालकांनी तिला आधी व्यावसायिक पदवी घेण्याचा सल्ला दिला. महाविद्यालयात असताना अमिता वृक्षारोपण आणि स्वच्छता मोहिमेसह विविध स्वयंसेवी उपक्रमांमध्ये सहभागी व्हायची. तिने पुण्याच्या आजूबाजूचे विविध किल्ले आणि हिमालयात अनेक ट्रेक केले. या ट्रेक दरम्यान, विशेषत: जंगलात प्लास्टिकचा कचरा पाहून मन खिन्न होई, अमिताला समजले की, यातील बहुतेक कचरा पर्यटक आणि ट्रेकर्सकडून आला होता. कचरा निर्मिती कमी करण्यासाठी उपाय शोधण्याची तिची इच्छा तीव्र झाली.
पदवी प्राप्त केल्यानंतर, अमिता पुण्यातील केपीआयटीमध्ये सामील झाली. तिथे तिने २००५ ते २००९ पर्यंत आयटी व्यावसायिक म्हणून काम केले. तिच्या मुख्य कामाच्या व्यतिरिक्त, तिने कंपनीच्या सीएसआर टीममध्ये भाग घेऊन अनेक पर्यावरणीय आणि सामाजिक कारणांसाठी स्वयंसेवा करणे सुरू ठेवले. पण तिला लवकरच उमजले की आयटी तिचे स्वप्न नाही. याच काळात २००९ मध्ये तिने अमेरिकेतील पर्ड्यू युनिव्हर्सिटीमध्ये शाश्वत विकास आणि सीएसआरवर लक्ष केंद्रित करत मॅनेजमेंटमध्ये मास्टर्स केले. पदव्युत्तर पदवीनंतर तिने शिकागोमध्ये कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये विशेष असलेल्या बहुराष्ट्रीय कंपनीसाठी तीन वर्षे काम केले. अकाऊंट मॅनेजर म्हणून, तिने स्टारबक्स, मॅकडोनाल्ड्स, स्टेपल्स यांसारख्या फॉर्च्युन ५०० कंपन्यांना सल्ला दिला.
२०१३ पर्यंत, अमिताने भारतात परत येण्याचा निर्णय घेतला. संहिता सोशल व्हेंचर्स या स्टार्ट-अप कंपनीमध्ये सामील होऊन, सीएसआर आणि सस्टेनेबिलिटी कन्सल्टिंग क्षेत्रात काम केले. मात्र, हिमालयातील ट्रेकिंगच्या प्रवासादरम्यान घडलेली एक दुर्दैवी घटना याला कलाटणी देणारी ठरली. मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे या गावातील अनेकांनी उदरनिर्वाहासह सर्वकाही गमावले. परत आल्यावर, तिला ग्रामीण समुदायांसोबत तळागाळात अधिक काम करण्याची तीव्र इच्छा जाणवली. तिने तिची नोकरी सोडली, एक सल्लागार म्हणून फ्रीलान्स काम सुरू केले आणि भारतातील दुर्गम ग्रामीण भागांमध्ये प्रवास सुरू केला. गावकऱ्यांच्या उपजीविकेच्या पद्धती आणि समस्यांचा अभ्यास केला. शेवटी २०१४ मध्ये चरख्याची कल्पना आकाराला आली. अमिताने फक्त एका हातमागापासून सुरुवात केली. पुण्यातील एका अंध शाळेने आयोजित केलेल्या कोर्समधून ती कताई आणि वारपिंग शिकली. तिने सिल्वासा जवळच्या गावातून कुंबाला आणि किरण नावाच्या एका अकुशल ग्रामीण तरुणाला कामावर घेतले. या दोघांना तिने नंतर प्रशिक्षित केले.
पुढे १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून अमिताने सिल्वासाजवळील एका गावात तिचे पहिले उत्पादन युनिट स्थापन केले. तिच्या वडिलांची तिथे एक छोटी बाग होती. त्यांनी अमिताला तिच्या कारखान्यासाठी जमिनीचा काही भाग वापरण्याची परवानगी दिली. सुरुवातीला, ऑपरेशनमध्ये अमितासहित एक लहान टीम सामील होती, ज्यांनी कच्च्या मालाची वर्गवारी आणि प्रक्रिया करण्यापासून फॅब्रिक उत्पादनापर्यंत सर्व काही हाताळले. लवकरच, स्थानिक महिला तिच्या कामात सामील होऊ लागल्या. अमिताच्या कुटुंबाच्या स्थानिक आणि आदिवासी समुदायांसोबतच्या दीर्घकालीन संबंधांमुळे त्यांना मदत झाली. आज सिल्वासा युनिटमध्ये पाच हातमाग आहेत आणि १५ लोक काम करतात. यामध्ये बहुतेक महिला आणि काही मूकबधिर असलेले पुरुषही आहेत. दर महिन्याला, रिचरखा सुमारे ५० हजार प्लास्टिक कचऱ्याचा पुनर्वापर करते. पर्यावरणपूरक डिटर्जंट वापरून प्लास्टिक धुऊन स्वच्छ केले जाते, उन्हात वाळवले जाते आणि नंतर हाताने पट्ट्या कापतात. या पट्ट्या चरख्याचा वापर करून सूत कातल्या जातात आणि नंतर हातमागावर कापडात विणल्या जातात. हे कापड कापडावर किंवा कॅनव्हासवर टेलरद्वारे शिवले जातात, तर इतर भाग जसे की झिप, स्लिंग्ज, बटणे आणि हँडल्स त्यांच्या सल्लागारांनी दिलेल्या डिझाइननुसार एकत्र केले जातात.
आता, रिचरखाकडे ६१ सदस्यांची एक टीम आहे, ज्यात त्यांच्या दोन उत्पादन युनिटमध्ये काम करणाऱ्या ५५ कारागीरांचा समावेश आहे. पहिले युनिट महाराष्ट्राजवळील केंद्रशासित प्रदेश दादरा-हवेली नगरमधील सिल्वासा येथे आहे, तर दुसरे युनिट पुण्यापासून ६० किमी अंतरावर असलेल्या भोर तालुक्यात आहे. कंपनीद्वारे वापरण्यात येणारा सुमारे ९० टक्के कच्चा माल घरे आणि सोसायटीमधून येतो. लोक त्यांचे स्वच्छ प्लास्टिक पुणे किंवा मुंबईतील या दुकानांना देऊ शकतात किंवा ते कुरियर देखील करू शकतात. रिचरखाला मोठी विक्री एका प्रदर्शनात झाली होती, ज्याची किंमत ३०,००० रुपये होती. तेव्हापासून रिचरखा स्वतःची कमाई वापरून व्यवसाय वाढवत आहोत. उत्पादनातून मिळालेला नफा आणि काही सीएसआर अनुदान व्यवसायाच्या विस्तारासाठी पुन्हा गुंतवले जातात. अमिताच्या प्रयत्नांना वर्षानुवर्षे फळ मिळाले आहे. रिचरख्याची उलाढाल सातत्याने वाढली आहे. पर्यावरणाच्या संवर्धनातून रोजगाराचा पर्याय निर्माण करणाऱ्या अमिता देशपांडे सामाजिक उद्योजिका आहेत. आपले शिक्षण, त्यासोबत आपल्याला वारशाने मिळालेले संस्कार यामधून त्यांनी प्लास्टिकचा पुनर्वापर करणारा उपक्रम उभारला आहे. उद्योग क्षेत्रात अशा लेडी बॉस निर्माण होणे काळाची गरज आहे. theladybosspower@gmail.com

    




