Thursday, September 18, 2025

उद्धव ठाकरेंसारखा स्वार्थी नेता राज्यात झाला नाही

उद्धव ठाकरेंसारखा स्वार्थी नेता राज्यात झाला नाही

आमदार आशिष आशिष शेलारांनी साधला निशाणा

मुंबई : ‘उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासारखा अहंकारी नेता या राज्यांमध्ये कधी न झाला, ना कधी होईल, स्वतःच्या स्वार्थाशिवाय दुसरा कुठलाही विचार सुचत नाही’, असे म्हणत भाजपाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच ‘ज्यांना राजकीयदृष्ट्या हे राम म्हणण्याची वेळ आली आहे त्यांच्या आवाजात न बळ आहे ना त्यात तथ्य आहे’, असेही म्हटले आहे.

‘जो उद्धव ठाकरे यांच्याबरोबर गेला, त्यांची वाताहत करण्याचे काम उबाठा गटाने केले आहे. उद्धव ठाकरे यांना अगदी मित्र पक्षाचाही विचार सुचत नाही. याचा अनुभव आम्ही घेतला आहे. आता काँग्रेसला तो फटका बसत आहे. याबद्दल मिलिंद देवरा यांनी वाच्यता केली आहे. आता उरल्या-सुरल्या काँग्रेसची धूळधाण उद्धव ठाकरे करतील हे महाराष्ट्र बघेल,’ असा टोला आशिष शेलार यांनी उबाठा गटाला लगावला आहे.

भगवान रामाबद्दल जेवढा अपमान संजय राऊत यांनी केला, तेवढा अपमान आयएसआय संघटनेच्या लोकांनी केला की, नाही हा प्रश्न आहे. राम वर्गणीच्या बाबतीत संजय राऊत यांनी कुचेष्टा केली. राम मंदिराच्या जागेबाबत वाद निर्माण केला. रामसेतूवर प्रश्न करणाऱ्यांबरोबर सलगी केली. राम भक्तांवर गोळ्या मारणाऱ्याबरोबर हात मिळवणी केली. राम भक्तांच्या खुनाचे रक्त संजय राऊत यांच्या पक्षाच्या हाताला लागले आहे. आता भगवान रामाला एका पक्षामध्ये बांधण्याचे काम तेच करत आहेत. त्यामुळे राजकीयदृष्ट्या त्यांना हे राम म्हणण्याची वेळ आली आहे. संजय राऊत यांच्या पत्रकारितेची डिग्री तपासली पाहिजे, असे म्हणत आशिष शेलार यांनी हल्लाबोल केला आहे.

Comments
Add Comment