Thursday, May 2, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सIPL Tickets : फेक वेबसाईटसवरून आयपीएलची तिकीट विक्री

IPL Tickets : फेक वेबसाईटसवरून आयपीएलची तिकीट विक्री

  • गोलमाल : महेश पांचाळ

सध्या आयपीएलचा हंगाम सुरू आहे. क्रिकेटप्रेमी हे सामने पाहण्यासाठी तिकीट खरेदी करतात. एवढेच नव्हे तर तिकिटे पदरात पडावी यासाठी ओळखीच्या माध्यमातून तर कधी ऑनलाइन तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र याचाच गैरफायदा घेऊन फेक वेबसाईट लिंक तयार करून, क्रिकेट प्रेमींकडून तिकिटाच्या नावावर फसवणूक केल्याचा प्रकार मुंबईत उघडकीस आला आहे.

आयपीएलच्या तिकीट विक्री ही बूकमाय शोसह आणखी तीन अधिकृत संकेत स्थळावरून विक्री होते. या प्रकारणी बूक माय शो डॉट कॉमच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने या प्रकरणी लेखी अर्ज सादर केला होता. त्यानुसार दक्षिण सायबर पोलीस ठाण्यात या प्रकरणी २९ मार्च रोजी भारतीय दंड संहितेच्या अनेक कलमांखाली फसवणूक आणि गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींनी आयपीएलच्या सामन्यांची बनावट तिकिटे बनवली आणि तिकिटे खरी असल्याचा दावा करून त्यांची ऑनलाइन विक्री केली होती. तसेच या तक्रारीत, एक अज्ञात व्यक्ती https://bookmyshow.cloud/sports/tata-ipl-2024 या नावाची बनावट वेब पेज लिंक तयार करून आयपीएल तिकिटे विकत आहे, असे त्यांनी नमूद केले होते.

दक्षिण क्षेत्र सायबर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल होताच, सायबर पोलीस आणि क्राइम इंटेलिजन्स युनिटने या प्रकरणाचा तपास सुरू केला. तपासादरम्यान असे आढळून आले की, आरोपींनी या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व १० फ्रँचायझी संघांच्या बनावट तिकिटांची विक्री सुरू केली होती. हे बनावट पोर्टल सौदी अरेबियातील एका आरोपीने डिझाइन केले होते आणि सर्व्हर हाँगकाँगमध्ये होता. त्यानंतर पोलिसांनी पेमेंट गेटवेचा तपास सुरू केला आणि त्यांना असे आढळून आले की, सुरतमधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कामरेज शाखेतील एका खात्यात पेमेंट जमा करण्यात आले. तसेच बनावट वेबपेजची लिंक सुरतमधून ऑपरेट केली जात असल्याचेही युनिटला आढळले. पोलिसांच्या पथकाला एके एंटरप्रायझेसच्या मालकाची ओळख पटवली. यानंतर या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांचे एक पथक सुरतला गेले. त्यानंतर पथकातील अधिकाऱ्यांनी पथकानी सुरत येथे जाऊन आरोपी खुशाल रमेशभाई डोगरिया (वय २४) याला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी भार्गव बोराड (२२), उत्तम भिमाणी (२१), जस्मिन पिठाणी (२२), हिम्मत अंतला (३५), निकुंज खिमानी (२७) आणि अरविंदभाई चोटालिया (२५) या सहा आरोपींना अटक केली. हे सर्व आरोपी सुरतचे रहिवासी आहेत. या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार खुशाल असल्याची माहिती पुढे आली. तो इतर आरोपींना अनेक कामे वाटून देत होता. त्याने त्याचे बँक खाते एका व्यक्तीला दिले. यासाठी आरोपींनी त्याला ५० हजार रुपये दिले होते. भार्गव बोराड याने खुशाल याला बँक खाते उघडण्यासाठी आणि त्या खात्याशी जोडण्यासाठी मोबाइल क्रमांक प्रोव्हाईड केला. तर उत्तम मनसुखभाई भिमानी यांनी वेबसाइट डेव्हलप केली. जास्मिन गिरधरभाई पिठाणी याने या प्रकरणातील मुख्य आरोपी खुशाल याकडून बँकेचे तपशील आणि मोबाइल क्रमांक घेतला आणि इतर आरोपींना तो दिला. सहआरोपी निकुंज भूपतभाई खिमानी आणि अरविंदभाई अमृतलाल चोटालिया यांच्यासह हिम्मत रमेशभाई अंतला यांनी बँक खात्यात जमा केलेली रक्कम एटीएममधून काढली होती. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

बनावट वेबसाइटद्वारे आयपीएलच्या तिकिटांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. आता या टोळीतील भामट्यांनी बनावट वेबपेज लिंकद्वारे किती प्रमाणात तिकिटे विकली याचा अधिकारी सध्या तपास करत आहेत.

maheshom108@ gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -