Thursday, May 2, 2024
Homeमहामुंबईऑनलाईन जेवण पुरविणाऱ्या कंपन्यांमुळे डबेवाल्यांवर संक्रांत

ऑनलाईन जेवण पुरविणाऱ्या कंपन्यांमुळे डबेवाल्यांवर संक्रांत

मुंबई : कामातील शिस्तशीरपणा आणि वेळेशी घालण्यात आलेली सांगड यामुळे वर्षानुवर्षे नोकरदारांना कार्यालयात डब्बे वेळेवर पोहोचविणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांचा लौकिक जगभर पसरलेला आहे. पण मुंबईची ऐतिहासिक अशी ओळख सांगणाऱ्या व्यवसायात येत असलेल्या मंदीमुळे मुंबईच्या डबेवाल्यांवर व त्यांच्या व्यवसायावर सध्या संक्रात आली आहे. ऑनलाईन जेवण पुरविणाऱ्या कंपन्यांनी मुंबईसारख्या व्यावसायिक शहरात आपल्या कामाचा वाढविलेला पसारा व मुंबईकरांकडून वाढत चाललेला प्रतिसाद यामुळे डब्बेवाल्यांवर आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे.

ब्रिटनचे राजपुत्र प्रिन्स चार्ल्स यांच्या भेटीमुळे तसेच डबेवाल्यांच्या ब्रिटन दौऱ्यामुळे मुंबईच्या डबेवाल्यांची कामगिरी तर जगभर प्रसिध्द आहे. मुंबई आणि भारत नाही तर ब्रिटनसारख्या देशांनी डबेबाल्यांच्या वक्तशीरपणाचे कौतुक केले आहे. पण ऑनलाईन जेवण देणाऱ्या कंपन्यांमुळे मुंबईची ओळख असणाऱ्या आज या डबेवाल्यांची परिस्थिती खालावली आहे. गेले दोन वर्षे कोरोना महामारीमुळे डबेवाल्यांचा व्यवसाय पूर्णपणे बंद होता. नेमके याच काळात ऑनलाईन जेवण पुरविणाऱ्या कंपन्यांनी संधीचा फायदा उचलत व्यवसायात आपली पाळेमुळे रुजविली. दोन वर्ष व्यवसाय बंद असल्याने डबेवाल्यांची आर्थिक परिस्थिती ढासाळली आहे. आता कुठे कोरोना आटोक्यात आल्यामुळे राज्य सरकारने प्रत्येक ठिकाणचे निर्बंध शिथील केले आहेत. अनेक उद्योग चालु झाले असले तरी डबेवाल्यांचा व्यवसाय मात्र अजूनही पूर्वपदावर आलेला नाही. त्यातच ऑनलाईन भोजन पुरविणाऱ्यांमुळे व्यवसायावर संकट निर्माण झाले आहे.

कोरोना काळात ‘वर्क फॉर्म होम’ मोठ्या प्रमाणात चालु होते आणि आजही काही ठिकाणी सुरुच आहे. काही मोजकेच डबेवाले मुंबईत काम करत आहेत. आता अशा परिस्थितीत डब्बेवाल्यांना झोमॉटो, स्विगी यासारख्या अनेक ऑनलाईन कंपन्यांच्या स्पर्धेला तोंड देण्याची वेळ आलेली आहे. ऑनलाईन नोंदणी केल्यावर पंधरा मिनिटात घरपोच जेवण पोहोचविण्याच्या सेवा कंपन्या कोरोना काळ सुरू झाल्यापासून देत आहेत. तशा स्वरूपाची जाहिरातही व्यापक प्रमाणावर करत या कंपन्यांनी डबेवाल्यांचा व्यवसाय स्वत:कडे खेचला. मुंबईमध्ये एक व्हिडीओ ‘व्हायरल’ झाला होता. ऑनलाईन भोजन पुरविणाऱ्या कंपनीचा कर्मचारी अन्नाची ऑर्डर पोहच करताना त्या पार्सलमधील अन्न तो कर्मचारी खात होता व त्यातील काही अन्न खाऊन परत त्याने ते पार्सल बंद केले व पुढे ते ग्राहकाला दिले. त्या ग्राहकाची फसवणुक या कर्मचाऱ्यानी केली असेल. अशा किती तरी अनेक घटना मुंबई व मुंबईबाहेरही घडल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मुंबईत एकशे तीस वर्षांपेक्षा अधिक वर्ष काम करणाऱ्या डबेवाल्यांकडून कधी घडली नाही आणि घडणार पण नाही. कारण डबेवाला आपल्या व्यवसायातील ग्राहकांना दैवत मानतो. आता ग्राहकांना जर दैवत मानले तर त्याची तो फसवणूक कधीही करत नाही. जर ग्राहक जेवला नाही तर तो जेवणाचा डबा तसाच्या तसा भरलेला पुन्हा घरी जातो. वेळेवर जेवणाचे डबे पोहचवणे, हे डबेवाल्याचे काम आहे ते काम ईमाने ईतबारे करत रहायचे. डबेवाला ग्राहकांशी नेहमी सौजन्याने वागतो. काही डबेवाल्यांच्या तीन तीन पिढ्या या व्यवसायात काम करत आहेत तसेच काही तीन तीन पिढ्या डबे खाणारे ग्राहकही आहेत. डबेवाला फक्त जेवणाचा डबाच पोहच करत नाही तर त्या डब्यासोबत पत्नीचे, बहीणीचे, आईचे प्रेम ही डब्या मार्फत पोहचवत असतो. असे प्रेम ऑनलाईन जेवण पुरवणाऱ्या कंपन्या पोहचवू शकत नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -