Home ब्रेकिंग न्यूज Arun Lakhani : खासदार सुप्रिया सुळे यांचे व्याही अरुण लखानी यांना भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Arun Lakhani : खासदार सुप्रिया सुळे यांचे व्याही अरुण लखानी यांना भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

0
Arun Lakhani : खासदार सुप्रिया सुळे यांचे व्याही अरुण लखानी यांना भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Arun Lakhani

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या नेत्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचे व्याही तसेच नागपूरातील प्रसिद्ध उद्योगपती अरुण लखानी (Arun Lakhani) यांना भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दिल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भाजपने जाहीर केलेल्या ११ उमेदवारांच्या यादीत वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून लखानी यांना संधी देण्यात आली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपशी जवळीक :

गेल्या काही दिवसांपासून अरुण लखानी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपशी असलेली त्यांची जवळीक, उद्योग क्षेत्रातील अनुभव आणि विदर्भातील सामाजिक क्षेत्रातील कार्य यामुळे त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. अखेर भाजपने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

https://prahaar.in/2026/06/01/not-angry-with-parth-pawar-sunil-tatkare/

अरुण लखानी यांनी मानले भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार :

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना अरुण लखानी यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानले. “मतदार योग्य उमेदवाराची निवड करतील, मी तातडीने प्रचाराला सुरुवात करणार आहे,” असे सांगत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन (Nitin Navin), मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे विशेष आभार मानले.

दरम्यान, ही निवडणूक मतदानापूर्वीच चर्चेचा विषय ठरत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील काही नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चांमुळे राजकीय समीकरणांबाबत उत्सुकता वाढली आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपची रणनीती काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विशेष म्हणजे, अरुण लखानी यांच्या कुटुंबासाठी हा काळ आनंदाचा ठरत आहे. त्यांचे सुपुत्र सारंग लखानी आणि खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे यांचा विवाह लवकरच होणार आहे. त्यामुळे एका बाजूला राजकीय क्षेत्रातील महत्त्वाची संधी आणि दुसऱ्या बाजूला कुटुंबातील मंगलकार्य अशा दुहेरी आनंदाचा क्षण लखानी कुटुंब अनुभवत आहे.

https://prahaar.in/2026/06/01/devendra-fadnavis-big-boost-to-maharashtras-digital-future-airtrunks-investment-of-%e2%82%b92-lakh-crore/

सुप्रिया सुळे यांच्याकडून अभिनंदन :

अरुण लखानी यांच्या उमेदवारीनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनीही त्यांचे अभिनंदन केले. अलीकडेच अरुण लखानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन सारंग आणि रेवती यांच्या विवाहाचे निमंत्रण दिले होते. यावेळी लखानी कुटुंबीयांसह रेवती सुळे आणि सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. या भेटीचे फोटो आणि चर्चा त्यावेळी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.

राजकीयदृष्ट्या वेगवेगळ्या विचारधारांशी संबंधित कुटुंबांमध्ये जुळलेले हे नाते आणि आता त्याच कुटुंबातील सदस्याला भाजपकडून मिळालेली उमेदवारी यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात या घडामोडींकडे विशेष लक्ष वेधले जात आहे. विशेषतः आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अरुण लखानी यांच्या उमेदवारीची चर्चा राज्यभर रंगली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here