Saturday, May 30, 2026

Vidhan Parishad : विधानपरिषदेत आकड्यांचा खेळ; कोण 'चित' कोण 'पट'?

Vidhan Parishad : विधानपरिषदेत आकड्यांचा खेळ; कोण 'चित' कोण 'पट'?

मुंबई (सुहास शेलार) : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विधानपरिषद निवडणुकीचा संग्राम ऐन रंगात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधानपरिषदेवर निवडून जाणाऱ्या १७ जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपायला अवघे २४ तास उरले आहेत. आतापर्यंत ही निवडणूक बिनविरोध होईल अशी चर्चा होती; मात्र मविआने सर्वच्या सर्व जागा लढवण्याचा पवित्रा घेतल्याने रंगत वाढली आहे.मविआकडे स्वबळावर एकही जागा जिंकण्याचे संख्याबळ नसले, तरी त्यांनी राजकीय अस्तित्व दाखवण्यासाठी या रणसंग्रामात उडी घेतली आहे. जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेस ८, उबाठा ६, तर राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) ३ जागांवर निवडणूक लढवणार आहे. दुसरीकडे, सत्ताधारी महायुतीत मात्र जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. भाजपने १०, शिवसेनेने ४ आणि राष्ट्रवादीने २ जागा लढवण्याचे संकेत दिले असले, तरी छत्रपती संभाजीनगर-जालना या एका जागेवरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत अजूनही पडद्याआड रस्सीखेच सुरू आहे.

कोकणातील रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागेवरूनही दोन्ही सत्ताधारी पक्ष आमनेसामने आले आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे सुपुत्र अनिकेत तटकरे यांच्यासाठी आग्रही आहेत, तर शिवसेनेनेही या जागेवर दावा ठोकला आहे. हा वाद इतका विकोपाला गेला आहे की, शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी थेट उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. असाच काहीसा ‘गृहकलह’ नाशिकमध्येही पाहायला मिळत आहे. नाशिकच्या जागेसाठी भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांचेच दोन खंदे समर्थक आमनेसामने ठाकले आहेत. भाजपचे शहर उपाध्यक्ष निलेश बोरा आणि माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते या दोघांनीही उमेदवारी अर्ज खरेदी केल्यामुळे नाशिक भाजपची डोकेदुखी वाढली आहे.

पक्षांतराचा मविआला फटका

निवडणुकीच्या तोंडावर अहिल्यानगर जिल्ह्यात मविआला मोठा सुरुंग लागला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खंदे शिलेदार आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेतल्याचे बक्षीस म्हणून भाजप त्यांना अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून थेट विधानपरिषदेची उमेदवारी देण्याची शक्यता आहे.

आकड्यांचा खेळ कोणाच्या बाजूने?

संख्याबळाचा विचार केला तर अनेक मतदारसंघांत भाजपचे पारडे प्रचंड जड आहे. नागपूर पोटनिवडणुकीत एकूण ७९४ मतांपैकी एकट्या भाजपकडे ५०१ मतांचे एकतर्फी संख्याबळ आहे. तसेच सोलापूर (३०४ मते), सांगली-सातारा (३७१ मते), आणि धाराशिव-लातूर-बीड (३७९ मते) या ठिकाणी भाजप मजबूत स्थितीत आहे. पुण्यात राष्ट्रवादीकडे सर्वाधिक ३७५ मते आहेत, तर ठाण्यात एकूण ९९७ मतांपैकी भाजपकडे ४३१ आणि शिवसेनेकडे ३०९ मते आहेत. परंतु, कागदावर महायुतीचे संख्याबळ भक्कम दिसत असले, तरी स्थानिक पातळीवरील अंतर्गत नाराजी, नाराजांची छुपी बंडखोरी आणि ऐनवेळी होणारी क्रॉस व्होटिंग यामुळे या गुप्त मतदानात कोण 'चित' होणार आणि कोण 'पट', हे पाहणे रंजक ठरेल.
Comments
Add Comment