नवीन मुंबई बंगळुरू वंदे भारत स्लीपर ट्रेनमधून प्रवास करणाऱ्याप्रवाशांना लवकरच पुरणपोळी आणि झुणका भाकर यांसारख्या पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन १ नोव्हेंबर रोजी सुरू झालेल्या या ट्रेनच्या मेन्यूमध्ये या लोकप्रिय महाराष्ट्रीयन पदार्थांचा समावेश करणार आहे, असी अधिकाऱ्यांनी सांगितले. ही ट्रेन बंगळुरूहून निघत असल्याने तिच्या सध्याच्या मेन्यूमध्ये दक्षिण भारतीय पदार्थांना प्राधान्य दिले जाते. सध्या नाश्ताच्या पर्यायांमध्ये उपमा, मेदू वडा आणि चटणी व सांबारसोबत इडली यांचा समावेश आहे. मुंबईहून प्रवास करणाऱ्या मराठी भाषिक प्रवाशांसाठी प्रादेशिक पदाथांचे मर्यादित पर्याय उपलब्ध असल्याने आयआरसीटीसीने मेन्यूमध्ये महाराष्ट्रीयन पदार्थांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
“आम्ही मेनूमध्ये स्थानिक खाद्यपदार्थांचा समावेश करण्याचा प्रयत्न करत आहोत. ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेनमधील प्रवाशांना दिले जाणारे पदार्थ उच्च दर्जाचे असावेत, हे निकष पूर्ण करू शकतील अशा ‘क्लाउड किचन’ आणि रेस्टॉरंट्सचा शोध आम्ही घेत आहोत,” असे आयआरसीटीसीच्या (IRCTC) एका अधिकाऱ्याने सांगितले. मेनूमध्ये समाविष्ट केल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये ‘पुरणपोळी’ आणि त्यानंतर ‘झुणका-भाकर’ यांचा समावेश आहे. ‘फेडरेशन ऑफ सबर्बन रेल्वे पॅसेंजर्स असोसिएशन’चे अध्यक्ष नंदकुमार देशमुख म्हणाले, “वंदे भारत स्लीपर ट्रेन दोन मोठ्या शहरांना जोडते, त्यामुळे प्रवाशांना आवडतील असे खाद्यपदार्थ उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. आम्ही रेल्वे प्रशासनाला विनंती केली आहे की, त्यांनी दर्जेदार महाराष्ट्रीयन पदार्थ प्रवाशांना द्यावेत.”
https://www.prahaar.in/2026/11/19/maha-aarti-organized-at-banganga-tank-often-referred-to-as-the-mini-varanasi-of-mumbai-on-the-occasion-of-dev-diwali/
अधिकाऱ्यांनी सांगितले की, ट्रेनमध्ये पोहे देण्याचे आधीच निश्चित करण्यात आले आहे. मात्र, हे पदार्थ ताजे ठेवणे, त्यांचे पॅकेजिंग करणे, प्रवासादरम्यान योग्य तापमान राखणे आणि मोठ्या प्रमाणावर पुरवठा करणे यांसारख्या आव्हानांचा आढावा घेतला जात आहे. आयआरसीटीसी भविष्यात इतर पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थांचाही मेनूमध्ये समावेश करता येईल का, याची चाचपणी करत आहे. अंतिम मंजुरीसाठी ही संस्था रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव सादर करणार आहे.