Home एक्सक्ल्युजिव्ह Nashik Kumbhmela : नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभपर्वाचा ऐतिहासिक शंखनाद : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण संपन्न

Nashik Kumbhmela : नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभपर्वाचा ऐतिहासिक शंखनाद : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण संपन्न

0
Nashik Kumbhmela : नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभपर्वाचा ऐतिहासिक शंखनाद : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण संपन्न

नाशिक : प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकच्या गोदातीरावर आज सिंहस्थ कुंभपर्व २०२६-२०२८ चा अधिकृत आणि मंगलमय शुभारंभ झाला. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते मंत्रोच्चार आणि लाखो भाविकांच्या जयघोषात नाशिकच्या पवित्र रामकुंडावर हा भव्य धर्मध्वजारोहण सोहळा दुपारी १२ वाजून २ मिनिटांच्या मुहूर्तावर अत्यंत उत्साहात संपन्न झाला. शनिवार, ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी उभारण्यात आलेल्या या धर्मध्वजाने कुंभपर्वाचा आरंभ झाला असून, २४ जुलै २०२८ पर्यंत हा आध्यात्मिक महासोहळा चालणार आहे. या पर्वातील पहिले अमृतस्नान २ ऑगस्ट २०२७ रोजी होणार आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते रामकुंडावर धार्मिक विधींना प्रारंभ!

सकाळी राष्ट्रपतींचे गोदातीरावर आगमन झाल्यानंतर त्यांनी पवित्र रामकुंडावर विधिवत गंगापूजन आणि अर्घ्यदान करून धार्मिक विधींना प्रारंभ केला. यावेळी वेदमंत्रांच्या जयघोषात त्यांनी धर्मध्वजाची शास्त्रोक्त पूजा केली. त्यानंतर दुपारी ठरलेल्या शुभमुहूर्तावर नाशिकच्या रामकुंडावर राष्ट्रपतींच्या हस्ते धर्मध्वजारोहण सोहळा पार पडला.

या ऐतिहासिक सोहळ्याला राज्यपाल जिष्णू देव वर्मा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार, केंद्रीय आयुष तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, पालकमंत्री गिरीश महाजन, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, अन्न व औषध प्रशासन तथा विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, महापौर हिमगौरी आडके-आहेर, विभागीय आयुक्त शेखर सिंह, जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज आणि १३ आखाड्यांचे प्रमुख साधू-महंत व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://www.prahaar.in/2026/10/31/flag-hoisting-ceremony-performed-by-the-chief-minister-at-trimbakeshwar-marks-the-commencement-of-the-religious-proceedings-of-the-simhastha-kumbh-mela/

विविध उपक्रमांचे लोकार्पण आणि आज संध्याकाळचे कार्यक्रम :

मुख्य सोहळ्यात २५१ वादकांच्या शंखनादाने अवघा परिसर दुमदुमणार आहे, तर २५ ऑक्टोबरच्या ५०१ शंखवादकांच्या विश्वविक्रमाचे अधिकृत ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ प्रमाणपत्र याच मंचावर सुपूर्द केले जाईल. यासोबतच कुंभ गान, विशेष टपाल तिकीट, कॉफी टेबल बुक आणि कुंभमेळा प्राधिकरणाच्या अधिकृत पोर्टलचे लोकार्पण आज राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे.

दरम्यान, सर्वांचे लक्ष लागले आहे ते आज संध्याकाळी याच रामकुंडावर होणाऱ्या भव्य गंगा-गोदावरी महाआरतीकडे. हजारो आदिवासी बांधवांच्या सहभागाने ही महाआरती सायंकाळी ६:३० ते ७ च्या दरम्यान संपन्न होणार असून, तब्बल एक लाख भाविक गोदातीरावर दाखल होण्याचा अंदाज आहे. सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने दुपारी ४:३० पूर्वीच भाविकांना जागा घेण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here