ठाणे : ठाणे पश्चिम येथील Castle Mill परिसरातील आंबे-घोसाळे तलावात एका अंदाजे ५५ ते ६० वर्षे वयाच्या अनोळखी महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सोमवारी सकाळी ही धक्कादायक घटना उघडकीस आली असून, पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
सकाळी ९:२५ च्या सुमारास माहिती मिळाली
स्थानिक प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, Castle Mill सर्कल, प्रभाकर हेगडे मार्ग आणि दिवंगत मीनाताई ठाकरे चौकाजवळ असलेल्या आंबे-घोसाळे तलावात एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती सकाळी ९:२५ च्या सुमारास आपत्कालीन विभागाला मिळाली. माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनीही तिथे गर्दी केली होती.
https://prahaar.in/2026/08/03/devendra-fadnavis-citizen-facing-government-departments-to-move-to-the-air-india-building-chief-minister-directs-officials-to-ensure-the-general-public-faces-no-inconvenience/
बचाव पथकाने मृतदेह काढला बाहेर
घटनेचे गांभीर्य ओळखून आपत्कालीन यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यामध्ये, ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कक्ष (पिकअप वाहनासह), ठाणे अग्निशामक दल (फायर इंजिन आणि रेस्क्यू वाहनासह) या दोन्ही पथकांनी एकत्र येत तात्काळ बचाव मोहीम राबवली आणि तलावाच्या पाण्यातील महिलेचा मृतदेह सुरक्षितपणे बाहेर काढला.
राबोडी पोलिसांकडून तपास सुरू
अग्निशामक दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाने हा मृतदेह पुढील कायदेशीर कारवाईसाठी राबोडी पोलिसांकडे सुपूर्द केला आहे. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट व्हावे यासाठी मृतदेह ठाण्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) शवविच्छेदनासाठी (Post-Mortem) पाठवण्यात आला आहे. राबोडी पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून, मृत महिलेची ओळख पटवण्याचे आणि तिचा मृत्यू अपघाती होता की यामागे काही वेगळे कारण आहे, याचा शोध घेण्याचे काम सुरू केले आहे.