मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान शुक्रवारी मंत्र्यांच्या अनुपस्थिवरून विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांत प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. मुंबईच्या महत्त्वाच्या प्रस्तावावर चर्चा सुरू असताना संबंधित खात्याचे मंत्री सभागृहात उपस्थित नसल्याने विधानसभेचे कामकाज दोनवेळा तहकूब करावे लागले. तर दुसरीकडे, विधान परिषदेतही मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे सरकारमधीलच वरिष्ठ मंत्री उदय सामंत यांनी नाराजी व्यक्त केली. “काही कार्यक्षम मंत्र्यांना अकार्यक्षम बनवण्याचा हा प्रयत्न सुरू आहे का?”, असे सामंत म्हणाले.
अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील पाचव्या दिवशी दोन्ही सभागृहांत मुंबई आणि राज्याशी निगडित महत्त्वाच्या विषयांवर चर्चा सुरू होती. मात्र, सकाळच्या सत्रात मंत्र्यांच्या गैरहजेरीमुळे विरोधकांसह सत्ताधारी पक्षाच्याच आमदारांनी सरकारला धारेवर धरले. विधानसभेत मुंबईच्या प्रस्तावावर अत्यंत महत्त्वाची चर्चा सुरू असताना सत्ताधारी बाकांवर एकही मंत्री उपस्थित नव्हता. यावर भाजपचे आमदार योगेश सागर आणि अतुल भातखळकर यांनी तीव्र आक्षेप घेतला. “मुंबईत मुसळधार पाऊस असताना उपनगरांतून दोन-दोन तास प्रवास करून सर्व आमदार वेळेत सभागृहात पोहोचले आहेत. असे असताना संबंधित खात्याचे मंत्री मात्र गायब आहेत. मंत्र्यांना गांभीर्य नसेल, तर कामकाज कसे चालणार?” असा सवाल करत भाजप आमदारांनीच सभागृह तहकूब करण्याची मागणी केली. वाढता गदारोळ पाहून तालिका अध्यक्षांनी सुरुवातीला ५ मिनिटांसाठी आणि त्यानंतर पुन्हा १० मिनिटांसाठी विधानसभेचे कामकाज तहकूब केले.
https://prahaar.in/2026/07/03/atul-bhatkhalkar-those-who-stayed-indoors-during-the-pandemic-should-not-speak-about-the-ram-mandir-mla-atul-bhatkhalkar-takes-a-sarcastic-dig-at-uddhav-thackeray/
तर बाकीच्या मंत्र्यांनी करायचं काय? – उदय सामंत
विधान परिषदेत शुक्रवारी सकाळी विरोधी पक्षाच्या नियम २६० अन्वये आणलेल्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी विशेष बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, इथेही मंत्र्यांची वानवाच होती. यावर नाराजी व्यक्त करत मंत्री उदय सामंत म्हणाले, “रात्री १० वाजेपर्यंत सभागृह चालते, अधिकारी रात्री २ वाजता घरी जाऊन पुन्हा सकाळी ६ वाजता कामावर येतात. आज सकाळी ९ वाजता मला फोन येतो की सभागृह चालवण्यासाठी तुम्ही उपस्थित राहा. मग बाकीच्या मंत्र्यांची काही जबाबदारी नाही का? मंत्र्यांची उपस्थिती अनिवार्य करताना फक्त दोन-चार मंत्र्यांनाच लक्ष्य केले जाऊ नये. पावसाचे कारण आम्हीही देऊ शकतो. काही मंत्र्यांनी आपण येऊ शकत नसल्याचे निरोप पाठवले, मग बाकीच्यांनी काय करायचे? यामध्ये सुसूत्रता आली नाही, तर रोज १०-१५ मिनिटे सभागृह बंद पडेल.” यावेळी तालिका सभापती प्रमोद जठार यांनी ‘तुम्ही सभागृहाचे लाडके मंत्री आहात’ असे म्हणताच, सामंत यांनी “कार्यक्षम मंत्र्याला अकार्यक्षम बनवण्याचा हा प्रयत्न असेल, पण हे योग्य नाही,” असा टोला लगावला.
चेतन तुपे यांचा भाषण न करण्याचा निर्णय
मंत्र्यांच्या अनुपस्थितीसोबतच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उदासीनतेचा फटकाही सभागृहाला बसला. मुंबईच्या अत्यंत संवेदनशील मुद्द्यावर चर्चा सुरू असताना संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी गॅलरीत उपस्थित नव्हते. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार चेतन तुपे यांनी आक्षेप घेतला. “चर्चा ऐकायला आणि नोंद घ्यायला जर अधिकारीच नसतील, तर बोलण्यात काय अर्थ?” असा सवाल करत अधिकाऱ्यांच्या या मुजोर कारभाराचा निषेध म्हणून तुपे यांनी सभागृहात भाषण न करण्याचा निर्णय घेतला.