नागपूरच्या १०९ वर्षांच्या ऐतिहासिक विमानतळाच्या विकासाला आता नवे पंख लाभणार आहेत. ‘जीएमआर एअरपोर्ट्स’कडे विस्तारीकरणाची जबाबदारी सोपविल्याने २०२९ पर्यंत ते देशातील महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक आणि कार्गो हब म्हणून उदयास येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तारीकरण कार्यक्रम हाती घेण्यासाठी विमानतळ जीएमआर एअरपोर्ट्स या हवाई व्यवसायातील पायाभूत सुविधा उभारणाऱ्या कंपनीकडे सोपवण्यात आले आहे. त्यामुळे पुढील तीन वर्षांत हे विमानतळ आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीचे एक केंद्र बनल्याशिवाय राहणार नाही. नुकत्याच झालेल्या एका समारोहात हे विमानतळ समूहाकडे हस्तांतरित करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,(Devandra fadnavis)) केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू, जीएमआर एअरपोर्ट्सचे अध्यक्ष जी. बी. एस. राजू, खा. प्रफुल्ल पटेल, खा. माया इवनाते, नागपूरच्या महापौर नीता ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
https://prahaar.in/2026/06/27/tet-paper-leak-major-action-taken-in-the-tet-paper-leak-case-three-arrested-outrage-among-lakhs-of-candidates-as-exams-are-postponed/
नागपूरचे विमानतळ जवळजवळ १०९ वर्षे जुने विमानतळ आहे. मिळालेल्या माहितीनुसार १९१७-१८ मध्ये तत्कालीन इंग्रज सरकारने लष्करी वाहतुकीसाठी रॉयल डिफेन्स सर्विस नावाची सेवा सुरू केली होती. त्यासाठी नागपूरजवळ असलेल्या सोनेगाव परिसरात हे विमानतळ उभारण्यात आले होते. सुरुवातीला या विमानतळाचा उपयोग फक्त लष्करी कामासाठीच केला जात होता. त्यावेळी नागपूर जवळच असलेल्या कामठीमध्ये लष्कराचा एक तळ होता. त्यासाठी हे विमानतळ वापरले जात होते. १९५३ पासून मात्र नागरी विमान वाहतूक या विमानतळावरून सुरू झाली होती. नागपूर हे देशाचे मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे सुरुवातीच्या काळात पोस्टाची डाक वाहून नेणारी विमाने नागपूरला थांबत असत आणि इथे बाकीची देवाणघेवाण केली जात असे. त्यामुळे त्या काळात नागपूर विमानतळावर सर्व विमाने मध्यरात्रीच यायची. १९६९ मध्ये नागपुरात नागपूर विरुद्ध न्यूझीलंड यांचा कसोटी क्रिकेट सामना झाला होता. त्यावेळी दोन्ही कसोटी संघाचे खेळाडू मध्यरात्रीच नागपूरच्या विमानतळावर उतरले होते. १९६३ मध्ये नागपूरला हवाई दलाचे एअर फोर्स मेंटेनन्स कमांड सुरू झाले. त्यामुळे नागपूरच्या सोनेगाव विमानतळाचे महत्त्व अधिकच वाढले.
https://prahaar.in/2026/06/27/mission-green-monsoon-launched-in-the-presence-of-minister-girish-mahajan/
त्याच काळात नागपूरजवळ भंडारा येथे ऑर्डनन्स फॅक्टरी सुरू झाली होती, तर वर्धा जिल्ह्यात पुलगाव येथे स्फोटकांचा डेपोही उभारण्यात आला होता. या सर्वच प्रकल्पांसाठी नागपूर विमानतळाचा उपयोग होऊ लागला होता. हळूहळू प्रवासी आणि मालवाहतूकही वाढू लागली. दिवसाला एक विमान मुंबईचे तर एक विमान दिल्लीचे असे जाऊ लागले. याशिवाय मान्यवरांची विशेष विमाने इथेच उतरवली जाऊ लागली. असे असले तरी नागपूरचे विमानतळ हे या काळात अगदी छोट्याशा इमारतीत बसलेले होते. मात्र १९९० नंतर विमानतळाचे विस्तारीकरण सुरू झाले. विमानतळ मोठ्या इमारतीत गेले. नागपुरातून मुंबई आणि दिल्लीसह इतरही मोठ्या शहरांमध्ये विमान वाहतूक सुरू झाली.
२००२ मध्ये नागपूरला आंतरराष्ट्रीय कार्गो हब सुरू करण्याचा निर्णय झाला. तिथून विमानतळाच्या विस्तारीकरणाला अधिकच वेग आला. २००५ मध्ये नागपूरहून दुबई आणि शारजा येथे आंतरराष्ट्रीय फेऱ्यासुद्धा सुरू झाल्या. हळूहळू नागपूरचे महत्त्व वाढत होते. २००८ मध्ये या विमानतळाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्यात आले. आज या विमानतळावरून दिवसाला जवळजवळ ३५ ते ४० विमानांचे उड्डाण होत असते आणि त्याचबरोबर लँडिंग देखील होते. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी ही परिस्थिती बदलायची ठरवली. त्यांनी कार्गो हबच्या पूर्ततेसाठी प्रयत्न सुरू केले आणि त्याचबरोबर ही सर्व विमाने इथे थांबून जर पुढे गेली तर विदर्भाच्या अर्थकारणाला नवी चालना मिळेल असा विचार त्यांनी केला आणि त्यादृष्टीने पावलेही उचलली. अर्थात त्यात अडथळे देखील प्रचंड आले. फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या भाषणात सांगितले की, नकटीच्या लग्नाला १७६० विघ्न येतच असतात. तशीच विघ्ने इथेही आली. मात्र फडणवीसांनी केलेला पाठपुरावा आणि गडकरींची त्यांना असलेली साथ यामुळे विमानतळाचे हस्तांतरण पार पडले असून नव्या पायाभूत सुविधा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
https://prahaar.in/2026/06/27/mission-green-monsoon-launched-in-the-presence-of-minister-girish-mahajan/
विमानतळाचे विस्तारीकरण २०२९ पर्यंतच पूर्ण करा असे निर्देश फडणवीस यांनी दिले आहेत. हे काम पूर्ण झाल्यावर नागपूरच्या आकाशातून जाणारी बहुतेक सर्व विमाने नागपूरला थांबतील. त्याचबरोबर इथून प्रवासी वाहतूक देखील करू शकतील. त्यासोबत इंटरनॅशनल कार्गोहब कार्यरत झालेले असल्यामुळे इथला शेतीमाल आणि इतर उत्पादन हे सहजगत्या परदेशात पाठवता येईल आणि परदेशातून देखील आपल्याला आयात करता येईल. या सर्वांमुळेच विदर्भाच्या विकासाला तर नवी चालना मिळेलच, पण त्याचबरोबर विदर्भाच्या जवळ असलेल्या छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि तेलंगणा या प्रदेशातून देखील मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक करता येऊ शकणार आहे. नागपूर विमानतळावर आतापर्यंत एकच धावपट्टी होती.
आता मात्र दोन धावपट्ट्या होणार आहेत. याशिवाय नवी प्रशस्त इमारत आणि इतर पायाभूत सुविधा देखील उभारल्या जाणार आहेत. सध्या या विमानतळाची दरवर्षाची प्रवासी संख्या ही दहा लाखांच्या आसपास आहे. २०२९ नंतर ती साठ लाखांपर्यंत पोहोचलेली असेल. भविष्यात नागपूर शहर हे एयरोट्रोपोलीस सिटी म्हणून ओळखले जाणार असल्याचा विश्वास केंद्रीय विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांनी व्यक्त केला, तर यावेळी नागपूर विमानतळावर अत्याधुनिक कार्गो केंद्र उभारणार असल्याची घोषणा जी. एम. आर. एअरपोर्टचे अध्यक्ष जीबीएस राजू यांनी केली आहे. नागपुरातून सध्या फक्त आखाती देशात विमाने जातात. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर जगात इतरत्र देखील विमाने जातील आणि इथली प्रवासी वाहतूक तर वाढेलच, पण जगभरातून प्रवासी थेट नागपुरात येऊ शकतील असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला आहे.