नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा दहशतवादी कारवायांच्या सावटाखाली आल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआय (ISI) समर्थित असल्याचा संशय असलेल्या एका मोठ्या नेटवर्कचा दिल्ली पोलिसांनी पर्दाफाश केला असून शस्त्रास्त्रे आणि अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या ईस्टर्न रेंज पथकाने ही मोठी कारवाई करत संभाव्य दहशतवादी कट हाणून पाडला. (Delhi Police)
प्राथमिक तपासात अटक करण्यात आलेल्या आरोपींचे संबंध पाकिस्तानातील कुख्यात गँगस्टर ते दहशतवादी बनलेल्या शहजाद भट्टी आणि त्याचा सहकारी अजमल गुजर यांच्या नेटवर्कशी असल्याचे उघड झाले आहे. हे नेटवर्क केवळ अमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रांची तस्करी करत नव्हते, तर दिल्ली-एनसीआर परिसरात दहशतवादी कारवायांसाठी आवश्यक माहिती गोळा करणे आणि संभाव्य लक्ष्यांवर पाळत ठेवण्याचे कामही करत असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. (Delhi Police)
https://prahaar.in/2026/06/17/sharad-pawar-ncp-sharad-pawar-initiates-contact-with-his-partys-mps-vigilance-prompted-by-the-split-in-the-ubt-faction/
तपासादरम्यान धक्कादायक बाब समोर आली असून पाकिस्तानातून पंजाब सीमेमार्गे भारतात हेरॉईनसह इतर अमली पदार्थ आणि अत्याधुनिक शस्त्रे पाठवली जात होती. त्यानंतर ही सामग्री दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, गुरुग्रामसह एनसीआर परिसरात पुरवली जात होती. या रॅकेटमधून मिळणारा पैसा दहशतवादी कारवायांसाठी वापरला जात असल्याचाही संशय आहे. (Delhi Police)
दिल्ली पोलिसांनी आरोपींकडून महत्त्वाचे पुरावे, डिजिटल उपकरणे आणि काही संशयास्पद कागदपत्रे जप्त केली आहेत. या माध्यमातून आयएसआयशी संबंधित संपर्क, आर्थिक व्यवहार आणि नेटवर्कमधील इतर सदस्यांची माहिती मिळण्याची शक्यता आहे. तपास यंत्रणा आता या प्रकरणातील आंतरराष्ट्रीय दुवे शोधत असून देशातील इतर राज्यांमध्येही या टोळीचे जाळे पसरले आहे का, याचाही तपास सुरू आहे. (Delhi Police)
https://prahaar.in/2026/06/17/diamond-merchant-fakes-death-to-escape-%e2%82%b916-crore-debt-two-slippers-expose-the-ruse/
सुरक्षा यंत्रणांच्या मते, भारतातील तरुणांना ड्रग्जच्या जाळ्यात अडकवणे, तस्करीच्या माध्यमातून निधी उभारणे आणि त्याचा वापर दहशतवादी कारवायांसाठी करणे, ही पाकिस्तानस्थित नेटवर्कची जुनी रणनीती आहे. त्यामुळे या कारवाईला राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी सुरू असून आगामी काळात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. राजधानी दिल्लीत मोठा दहशतवादी कट रचला जात होता का, याचा शोध घेण्यासाठी विविध केंद्रीय सुरक्षा यंत्रणाही तपासात सहभागी झाल्या आहेत. (Delhi Police)