Nashik : नाशिक शहरात अवैध देशी दारू विक्री करणाऱ्यांविरोधात गुन्हेशाखा युनिट-२ ने (Crime Branch Unit-2) विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तीन आरोपींना ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातील एकूण ११ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. ४ जून रोजी शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत अवैध देशी दारूची विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती.
https://prahaar.in/2026/06/05/mp-narayan-rane-bal-mane-is-an-original-bjp-member-he-does-it-in-the-pond-when-elections-are-held/
पहिल्या कारवाईत नाशिकरोड (Nashik Road) परिसरातील बागुलनगर येथील साईकृपा भंगार दुकानासमोर देशी दारू विक्रीसाठी थांबलेल्या शुभम राजाराम गांगुर्डे (वय २६, रा. विहीतगाव) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून १ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या कारवाईत सातपूरमधील महिंद्रा कंपनीसमोरील परिसरातून गौतम सुरेश ठाकरे (वय २८, रा. प्रबुद्धनगर, सातपूर) याला पकडण्यात आले. त्याच्याकडून २ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सातपूर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
https://prahaar.in/2026/06/05/ind-vs-afg-test-even-if-we-win-over-afghanistan-we-will-not-get-points-in-the-wtc-test-is-just-a-practice-for-team-india/
तिसऱ्या कारवाईत देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतील रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावरून संजय नथ्थू आडके (वय ५२, रा. नाणेगाव) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या तिन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी अवैध देशी दारू विक्री करणाऱ्या तिघांना जेरबंद करत एकूण ११ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गुन्हेशाखा युनिट-२ चे प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर यांच्यासह पथकातील अधिकाऱ्यांनी ही कारवाई यशस्वी केली.