मुंबई : पश्चिम आशियामध्ये वाढलेल्या भू-राजकीय तणावाचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला असून शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात मुंबई शेअर बाजार (बीएसई) आणि राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) या दोन्ही निर्देशांकांमध्ये मोठी घसरण नोंदवली गेली. वाढत्या कच्च्या तेलाच्या किमती, परदेशी गुंतवणूकदारांकडून होत असलेली सततची विक्री आणि जागतिक बाजारांतील नकारात्मक वातावरण यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास डळमळीत झाला आहे. त्यामुळे बाजारात सावध आणि दबावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
https://prahaar.in/2026/05/08/what-is-the-rank-of-nashik-division-in-the-10th-result/
दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. जागतिक तेल निर्देशांक ब्रेंट क्रूडचा भाव १.१९ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल १०१.३ अमेरिकन डॉलरवर पोहोचला आहे. पश्चिम आशियातील तणावामुळे तेल पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात असून त्यामुळे तेलाच्या किमतींमध्ये चढ-उतार सुरू आहेत.
चलन बाजारातही भारतीय रुपयावर दबाव दिसून आला. शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ४५ पैशांनी घसरून ९४.६७ या पातळीवर पोहोचला. आंतरबँक विदेशी चलन विनिमय बाजारात रुपया ९४.५८ प्रति डॉलरवर खुला झाला होता, मात्र नंतर त्यात आणखी कमजोरी आली. गुरुवारी रुपया सुरुवातीच्या तोट्यातून सावरत २७ पैशांच्या वाढीसह ९४.२२ प्रति डॉलरवर बंद झाला होता.
https://prahaar.in/2026/05/08/pune-crime-news-six-minor-girls-missing-in-two-days-police-investigation/
विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गुरुवारी भारतीय बाजारातून ३४०.८९ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. सततच्या परदेशी निधी बाहेर जाण्यामुळे भारतीय बाजारावरील दबाव अधिक वाढताना दिसत आहे. गुरुवारीच्या व्यवहारात मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ११४ अंकांनी म्हणजेच ०.१५ टक्क्यांनी घसरून ७७,८४४.५२ अंकांवर बंद झाला होता. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ४.३० अंकांच्या किरकोळ घसरणीसह २४,३२६.६५ अंकांवर बंद झाला होता.