नेपाळ एअरलाइन्सला सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका नकाशामुळे मोठ्या वादाला सामोरे जावे लागले असून, या प्रकरणाने आंतरराष्ट्रीय स्तरावरही चर्चा निर्माण केली आहे. एअरलाइन्सने त्यांच्या नेटवर्क मॅपमध्ये जम्मू आणि काश्मीर हा भाग चक्क पाकिस्तानचा भाग म्हणून दाखवल्यामुळे गंभीर कार्टोग्राफिक चूक समोर आली होती.
ही पोस्ट बुधवारी (२९ एप्रिल) एअरलाइन्सच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून शेअर करण्यात आली होती. मात्र, काही मिनिटांतच युजर्सनी या नकाशातील चुकीकडे लक्ष वेधले. भारतातील तसेच परदेशातील अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी यावर तीव्र आक्षेप नोंदवत ही माहिती तथ्यात्मकदृष्ट्या चुकीची आणि संवेदनशील असल्याचे सांगितले.
https://prahaar.in/2026/04/30/big-stir-in-pakistan-suspicious-accidental-death-of-top-jaish-e-mohammed-commander-maulana-salman-azhar/
यानंतर नेपाळ एअरलाइन्सने एक्स (ट्विटर) वर अधिकृत निवेदन जारी करत स्पष्ट केले की, “आमच्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या नेटवर्क मॅपमध्ये झालेल्या चुकीबद्दल आम्ही मनापासून माफी मागतो. या नकाशामध्ये आंतरराष्ट्रीय सीमांचे चुकीचे चित्रण करण्यात आले असून, हे आमच्या संस्थेची अधिकृत भूमिका किंवा धोरण दर्शवत नाही.”
संस्थेने आपल्या निवेदनात शेजारी देशांशी असलेल्या संबंधांबाबतही भूमिका स्पष्ट केली. “आम्ही या प्रदेशातील सर्व शेजारी देशांबरोबर सौहार्दपूर्ण आणि मजबूत संबंध राखण्यास कटिबद्ध आहोत. या घटनेमुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला मनापासून खेद आहे,” असे एअरलाइन्सने म्हटले आहे.
https://prahaar.in/2026/04/30/breaking-news-shocking-radioactive-threat-to-rss-headquarters-excitement-in-nagpur-security-forces-on-alert/
या प्रकरणानंतर नेपाळ एअरलाइन्सवर भविष्यात अधिक सावधगिरी बाळगण्याचा दबाव वाढला असून, सोशल मीडिया व्यवस्थापन आणि कंटेंट पडताळणी प्रक्रियेबाबत मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.