‘तिहेरी’ सुरक्षा व्यवस्था; मुख्य प्रवेशद्वारावर ‘एके-४७’सह कमांडो तैनात
मुंबई : राज्याचे मुख्य प्रशासकीय मुख्यालय असलेल्या मंत्रालयाच्या संरक्षणासाठी आता महाराष्ट्र पोलिसांच्या अत्यंत प्रशिक्षित अशा ‘एलिट गार्ड’ या विशेष कमांडो तुकडीचे संरक्षक कवच देण्यात आले आहे. हे कमांडो आधुनिक शस्त्रास्त्रांसह मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर तैनात केले जाणार आहेत.
https://prahaar.in/2026/04/15/massive-fire-in-mangrul-nirbhavane-familys-entire-household-burnt-to-ashes/
मुंबईतील महत्त्वाची शासकीय कार्यालये आणि संवेदनशील ठिकाणे दहशतवाद्यांच्या लक्ष्यस्थानी असल्याच्या गुप्तचर यंत्रणांच्या अहवालानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रालयात दररोज हजारो नागरिक आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची ये-जा असते, त्यामुळे येथील सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. आता मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि गार्डन गेटवर ‘एलिट गार्ड’चे कमांडो सदैव सज्ज असणार आहेत.
https://prahaar.in/2026/04/15/pm-modi-karnataka-visit-pm-narendra-modis-holy-visit-to-adichunchanagiri-had-darshan-at-shri-guru-bhairavakona-temple/
मंत्रालयाची सुरक्षा व्यवस्था यापूर्वीच कडक होती, मात्र आता एलिट गार्डच्या समावेशामुळे येथे तिहेरी सुरक्षा कवच निर्माण झाले आहे. स्थानिक पोलीस, राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ) आणि आता एलिट गार्ड अशा स्तरांवर मंत्रालयाची तपासणी आणि देखरेख केली जात आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ही विशेष फोर्स आता मंत्रालयात कायमस्वरूपी तैनात करण्यात आली असून, प्रवेशद्वारावरील प्रत्येक हालचालीची बारकाईने नोंद घेतली जात आहे.
काय आहे ‘एलिट गार्ड’?
एलिट गार्ड ही पोलीस दलातील एक विशेष निमलष्करी तुकडी आहे. दहशतवादी कारवाया मोडून काढणे, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना संरक्षण देणे आणि अत्यंत गोपनीय व कठीण मोहिमा फत्ते करण्याचे विशेष प्रशिक्षण या जवानांना दिले जाते. गनिमी काव्याने होणारे हल्ले परतवून लावण्यात हे कमांडो निष्णात मानले जातात.