Friday, May 3, 2024
Homeदेशलोकसंख्या नीती नव्याने निर्धारित करा

लोकसंख्या नीती नव्याने निर्धारित करा

डॉ. मोहन भागवत यांची केंद्र सरकारला सूचना

अविनाश पाठक

नागपूर (प्रतिनिधी): भारतात लोकसंख्या नीती नव्याने ठरवली जावी अशी सूचना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज संघाच्या विजयादशमी शस्त्रपूजन महोत्सवात बोलताना केली. यावर केंद्र सरकारने तत्काळ विचार करण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादित केली. पुढील ५० वर्षांचा विचार करून नियोजन केले जावे असेही त्यांनी सुचवले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी निमित्त होणाऱ्या शस्त्रपूजन समारोहाचे आयोजन आज नागपुरातील रेशीमबाग मैदानावर करण्यात आले होते, त्यावेळी मोजक्या स्वयंसेवकांना संबोधित करताना डॉ. भागवत बोलत होते. यावेळी संघाचे विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरे आणि नागपूर महानगर संघचालक राजेश लोया व्यासपीठावर उपस्थित होते. रेशीमबाग संघस्थानावर जरी मोजके स्वयंसेवक उपस्थित असले तरी नागपुरात ४८ ठिकाणी एकत्रित येऊन शहरातील स्वयंसेवक आभासी पद्धतीने मोठ्या संख्येत समारंभात सहभागी झाले होते.

यावेळी बोलतांना डॉ. भागवत म्हणाले की आज जनसंख्येचे असंतुलन ही समस्या झाली आहे. या संदर्भात संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने २०१५च्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत ठराव पारित केला होता, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. सामान नियम नसल्यामुळे काही जमातींची संख्या वाढते आहे, तर काहींची घटते आहे. असे सांगून आजचे तरुण उद्या म्हातारे होतील त्यावेळी त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी नवी तरुणाई राहील काय? याचा विचार व्हायलाच हवा असे त्यांनी स्पष्ट केले.

आपल्या सुमारे ७० मिनिटांच्या भाषणात सरसंघचालकांनी देश आणि समाजासमोरील विविध मुद्द्यांचा परामर्श घेतला. देशातील ड्रग्जचं व्यसन आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरील चित्रपट, वेबसीरिजच्या माध्यमातून तरुणाईला बहकवण्याचा होत असलेला प्रयत्न यावर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. सरकारला ड्रग्ज व्यसनांचं पूर्ण निर्मूलन करावं लागेल, असे आग्रही प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. ओटीटी प्लॅटफॉर्मवरील निर्मितीवरही निशाणा साधत त्यावर नियंत्रणाची मागणी डॉ भागवत यांनी केली. तंत्रज्ञानाच्या आधारावर नवनव्या गोष्टी येत आहेत. या गोष्टी आगीत तेल ओतण्याचं काम करत आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर नियंत्रण नाही. तेथे कशाप्रकारचे चित्रपट येतात, काय काय येतं? आता करोना काळात तर लहान मुलांच्या हातात सुद्धा मोबाईल आलाय. ऑनलाईन काय पाहायचं, काय नाही याचं काहीच नियंत्रण नाही. ओटीटी प्लॅटफॉर्मवर काय दाखवायचं याचंही नियंत्रण नाही, असे भागवत म्हणाले.

आसाम आणि मिझोराममधील पोलिसांमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेवरून डॉ भागवत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “एकाच देशात आपल्याच दोन राज्यांचे पोलीस एकमेकांविरुद्ध युद्ध करतात. गोळीबारात लोक मारले जातात. आपण एकाच देशाचे नागरिक आहोत की काय आहोत?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. “दोन्ही भारताचेच राज्यं असूनही त्या दोन राज्यांचे पोलीस एकमेकांविरुद्ध युद्ध करतात. गोळीबारात लोक मारले जातात. आपण एकाच देशाचे नागरिक आहोत की काय आहोत? आपल्या राजकीय स्पर्धेतून आता सरकारांमध्येच विरोध होतोय. पक्षांचा विरोध असेल तर चालेल, पण सरकारी व्यवस्था तर एक आहे, संविधानानुसार ही व्यवस्था निर्माण झालीय. संविधानानुसार आपण संघराज्य आहोत.” याचे भान ठेवायला हवे असे त्यांनी ठणकावले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -