Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणNarayan Rane : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचा महायुतीचा उमेदवार दोन लाखापेक्षा जास्त मताधिक्याने...

Narayan Rane : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचा महायुतीचा उमेदवार दोन लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आणा

भाजप नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले कार्यकर्त्यांना आवाहन

कुडाळ : निवडणूक हे युद्ध आहे. मन, बुध्दी शांत ठेवून जनतेत जा, प्रत्येकाला मोदी सरकारचे विधायक काम सांगा. मोदीजी ही देशाची गरज आहे. ते कर्तृत्वाने देश विकसित करत आहेत. देशाला जगात सर्वोत्तम करण्यासाठी ‘अबकी बार चारशे पार’ खासदार निवडून देण्याचा संकल्प करा आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचा महायुतीचा उमेदवार दोन लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आणा. माझा कार्यकर्ता हा माझ्यासाठी श्रेष्ठ आहे. तुम्ही माझा अभिमान आहात. तो विश्वास आणि अभिमान सार्थकी लावा, असे आवाहन भाजप नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केले.

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कुडाळ येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत संघटनात्मक आढावा बैठक सभेच्या रूपाने संपन्न झाली. कार्यकर्त्यांचा अपूर्व उत्साहात पाहावयास मिळाला. यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, कोकण संघटन मंत्री शैलेंद्र दळवी, लोकसभा निवडणुक प्रमुख प्रमोद जठार यांसह प्रमुख बाळ माने, सावंतवाडी विधानसभा प्रमुख राजन तेली, माजी आमदार अजित गोगटे आदी सह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विरोधकांचा समाचार घेताना म्हणाले की, नारायण राणे आजारी पडला आणि आराम करतो, असा एक दिवस दाखवा. १५/१६ तास काम करतो. माझ्या आजारपणाची काळजी करू नका. मी तंदुरुस्त आहे. अजून उमेदवारी जाहीर झाली नाही तर मला घाबरले आणि म्हणून मी आजारी आहे, अशा अफवा पसरवत आहेत. हिम्मत असेल तर मर्दासारखे निवडणुकीला सामोरे जा, असे आव्हान यावेळी त्यांनी दिले.

काय काम तुम्ही केलात, ते जनतेला सांगा. लोकसभेत काय काम केले. त्याचा हिशेब द्या. मी चीपी विमानतळ आणले, तेव्हा १५ लोक घेवून याच उबाठा खासदाराने विरोध केला. काम पूर्ण झाले, तेव्हा उद्घाटन करायला हाच पुढे धावला. याने आणि त्याच्या आमदारांनी काय आणले जिल्ह्यात. ठाकरेंनी काय दिले येथील जनतेला. मी मंत्री असताना नोकऱ्या दिल्या. रस्ते, वीज, पाणी असे प्रश्न सोडविले. डॉक्टर, इंजिनियर होतील अशी कॉलेज आणली. तुम्ही काय आणले? कौतुक करता येत नसेल तर निदान बौद्धिक तरी बोला. नुसती घाणेरडी टीका करू नका, असे राणे यांनी यावेळी सांगितले.

दोडामार्ग मध्ये ५०० कारखाने आणायचे आहेत. त्यासाठी ओरोसमध्ये ट्रेनिंग सेंटर उभे राहत आहे. सर्व प्रकारचे उद्योग प्रशिक्षण तेथे मिळणार आहे. मात्र त्याचे कौतुक कोणाला वाटत नाही. येथील जनता नोकऱ्यावर न राहता लाखो रुपये मिळतील असे उद्योग उभारावेत, अशी माझी इच्छा आहे आणि त्यासाठी मी काम करत आहे. या उबाठा सेनेचे नेते काय करू शकले ते सांगा? मी नवउद्योजक उभे करतो आणि उबाठा खासदार, आमदार रस्त्यांचे ठेके घेतात. मी एका वेळेला २८ ब्रीज आणले. धरणे बांधली. ६०० डॉक्टर, इंजिनिअर तयार होत आहेत अशी कॉलेज उभी केली. माझ्या विरोधकांनी काय केले याचे उत्तर द्या. यांनी सी वर्ल्डला विरोध केला. सिंगापूर, मलेशिया, अहमदाबाद, गुजरातला जावून पहा. सी वर्ल्डला विरोध करून जनतेचे नुकसान केले. तुम्ही कोणाला निवडून देणार, विकासाला विरोध करणाऱ्या या लोकांना कायमचे घरी बसविण्याची वेळ आली असल्याचे नारायण राणे यांनी यावेळी सांगितले.

यापुढे काही झाले तरी भाजपाचाच खासदार निवडून आणायचा आणि काही झाले तरी या उबाठा खासदाराला पुन्हा संधी द्यायची नाही. घरी बसविल्याशिवाय शांत थांबायचे नाही. तुम्ही माझे सहकारी आहात. मी साहेब नाही. तुमच्यातील एक कार्यकर्ता आहे. भाजपाचे विचार प्रत्येक माणसापर्यंत घेवून जा. ८० कोटी लोकांना मोदी सरकारने मोफत धान्य दिले. शेतकरी जनतेला आर्थिक लाभ देवून सन्मान केला, कोरोनात मोफत लस दिली. मात्र ठाकरे बाप बेट्यांनी कोराना काळात भ्रष्टाचार केला. आता ते प्रकरण चौकशीमध्ये आले असल्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितले.

आपणच उमेदवार आहोत ही भावना मनात ठेवून कार्यकर्त्यांनी काम करावे : पालकमंत्री रवींद्र चव्हाण

लोकसभा मतदानासाठी आता फक्त ३४ दिवस शिल्लक राहिलेले आहे. या काळात भाजप कार्यकर्त्यांनी अधिक सतर्क राहिले पाहिजे. नियोजनबद्ध काम केले पाहिजे. बूथ निहाय काम करताना, मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी वाड्या, वस्त्या आणि घरे यांची प्रत्येकी जबाबदारी वाटून घ्या आणि त्या पद्धतीने मतदारांपर्यंत पोहोचा. मी नरेंद्र मोदी आहे. आणि मीच या ठिकाणचा उमेदवार आहे. ही भावना मनात बाळगा आणि काम करा. एनडीएचा प्रत्येक खासदार निवडून गेला पाहिजे आणि म्हणूनच रत्नागिरी सिंधुदुर्गचा खासदार निवडून गेला पाहिजे. मोठे मताधिक्य येथे मिळाले पाहिजे. पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले पाहिजेत, यासाठी कामाला लागा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दीड ते दोन लाखाचे मताधिक्य आपल्याला हवे आहे, त्या दृष्टीने काम करा असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.

देशात पहिल्या पाच क्रमांकात रत्नागिरी सिंधुदुर्ग चे मताधिक्य देवून खासदार निवडून आणूया -आमदार नितेश राणे यांचे आवाहन

देशात पहिल्या पाच क्रमांकात रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातून निवडून गेलेल्या खासदारांचे मताधिक्य असले पाहिजे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब जेव्हा हे मताधिक्य पाहतील, तेव्हा तुमचा अभिमान त्यांना वाटेल. असे काम करूया, असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले.

प्रत्येक मतदान बूथवर ५१ पेक्षा जास्त मतदान मिळवायचे आहे. त्यासाठी कामाला लागा. सुपर ओरियर्स आणि बूथच्या प्रत्येक कार्यकर्त्याला नियोजन माहीत आहे. आता आपले उद्दिष्ठ साध्य करण्यासाठी काय रणनीती केली पाहिजे, याची संपूर्ण माहिती आपल्याला आपण अनुभवी कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहात. आपल्याला या निवडणुकीत गालबोट लागता नये. आपण मैदानात उतरलो की विरोधक समोर टिकू शकत नाही. त्यामुळे वाद ,भांडणे करून तुम्हाला डीस्टब करतील. मात्र विचलित होवू नका. मतदारांशी संपर्क ठेवा, असे त्यांनी यावेळी सांगितले.

लोकसभेत प्रभुत्व असलेला खासदार आपण निवडून देवूया : निलेश राणे

आता जो उबाठा खासदार इथून गेली दहा वर्षे खासदार आहे. त्याला दिल्लीत कोण विचारतही नाही. साधा वॉचमनही विचारत नाही. या मतदारसंघातून फार मोठी माणसे निवडून गेली. मात्र आज केंद्राला आठवत नाही की या दोन जिल्ह्यातून एक खासदार आहे. तो कोण आहे? उबाठाचा हा खासदार कोणालाच माहीत नाही. त्यामुळेच दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये प्रभुत्व असलेला खासदार आपण पाठवूया. दिल्लीत नाव घेतले तरी कळले पाहिजे की रत्नागिरी सिंधुदुर्गचा आपला हा खासदार आहे. असा दरारा आणि विकासाचे व्हिजन असलेले व्यक्तिमत्त्व निवडून देवूया, असे आवाहन भाजप नेते आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी केले. ५४३ खासदार जातात, त्यात उबाठाच्या खासदाराने काय काम केले, याचा लेखा जोखा द्या. या खासदारामुळे आमची जनतेची दहा वर्षे फुकट गेली. उबाठा खासदार रेल्वेचे प्रश्न सोडवू शकले नाहीत, विमानतळ आम्ही केला, तेव्हा हे खासदार विमानतळ नको म्हणून विरोध करत होते, असे निलेश राणे यावेळी म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -