Monday, May 20, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीशुद्ध वातावरण व पवित्र आचरण

शुद्ध वातावरण व पवित्र आचरण

अध्यात्म – ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज

आपल्या घरातले वातावरण शुद्ध, शांत आणि पवित्र असावे. आपल्याकडे येणाऱ्या माणसाला परत जाऊच नये असे वाटावे. अगदी भगवंताच्या इच्छेने प्रपंच चालला आहे असे समजून, त्या प्रपंचात विद्या, वैभव, घरदार इ. सर्व काही यश संपादन करा. अगदी एखाद्या राजयोग्याप्रमाणे प्रपंचात ऐषआरामात राहून ; पण हे करीत असताना, तुमचे अंत:करण मात्र भगवंताच्या प्रेमाने ओथंबलेले राहू द्या. कोणाशी वाद घालत बसू नका.

जगाचा मान फार घातक आहे, त्याची चटक लागली की, मनुष्य त्याच्यामागे लागतो, नंतर मान मिळविण्याची कृती थांबते आणि मानही नाहीसा होतो. जगातले अजिंक्य पुरूषसुद्धा कुठे तरी विषयात गुंतलेले असतात, तिथे त्यांचा घात होतो. जगाला ते भारी असतील; पण त्या विषयापुढे त्यांचे काहीच चालत नाही. प्रेमात गुंतू नका, तसे द्वेषमत्सरातही गुंतू नका, दोन्ही सारखेच घातक आहेत. आपला प्रिय नातेवाइक मेला आणि आपण ज्याच्यावर दावा लावला आहे, तो भाऊबंद मेला, दोघेही मेल्याचे सूतकसारखेच! त्याचप्रमाणे मनुष्य प्रेमाने गुंतला काय आणि द्वेषाने गुंतला काय, नुकसान सारखेच होते. भगवंताचा विसर हा कोणत्याही कारणाने झाला तरी बरा नाही. मग प्रपंचात सुखसोयी असल्याने तो होवो किंवा प्रपंचात दु:ख झाल्यामुळे होवो.

ढोंग, बुवाबाजी इ.च्या भानगडीत तुम्ही पडू नका. अगदी काहीही न केलेत तरी चालेल; पण ढोंग मुळीच करू नका आणि सर्वांनी माझ्यावर कृपा करा, अगदी अनुभवाने मी सांगतो की, बुवा होण्याच्या फंदात तुम्ही पडू नका. आपले कर्तव्य भगवंताच्या स्मरणात करून, त्याचे अनुसंधान अखंड टिकू द्या. आमची अशी वृत्ती बनण्यासाठी संतांच्या संगतीची आपल्याला जरुरी आहे. आपण सर्व जण सत्संगतीमध्ये आहोत असे म्हणतो. मग आमची वृत्ती का न सुधारावी? तर संतांना ज्याची आवड आहे, ते आम्ही धरले नाही म्हणून आमची वृत्ती सुधारत नाही.

श्रीकृष्णाने उद्धवाला ज्ञान देऊन, त्याला गोपींकडे पाठविले. भगवंताच्या नामामध्ये त्या रंगून गेल्या होत्या. गोपींचे नामावरचे प्रेम पाहून, उद्धवाला आश्चर्य वाटले. नामामध्ये त्यांना भगवंत दिसत असे; ते पाहून उद्धवाने देवाला सांगितले, “ देवा, तू मला ज्ञान दिलेस खरे, पण तुझ्या भक्तीचे प्रेम त्याहून श्रेष्ठ आहे, ते तू मला दे. ” खरोखर त्या नामाचे माहात्म्य देवाच्या वर्णनापेक्षाही कठीण आहे. तुम्ही सर्व जण इथे आला आहात. इथून रामाजवळून काही मागून न्यायचेच असेल, तर त्या नामाचे प्रेम तुम्ही सर्वांनी मागा. सर्वांनी नामस्मरण करा आणि आनंदात राहा. राम कृपा करील, हा भरवसा बाळगा.

तात्पर्य : आपल्या जीवनात सहजता हवी. सहजतेमध्ये समाधान आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -