नवी मुंबई(प्रतिनिधी) -हिंदू नववर्ष स्वागत निमित्ताने सार्वत्रिक निवडणुकीत नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क आवर्जून बजावावा यासाठी ‘रांगोळी’च्या माध्यमातून जनजागृती करण्याचे काम भूमिपुत्र माथाडी कामगार आणि जनरल कामगार युनियन व मैत्री परिवार (फँटासिया पार्क) यांच्या वतीने करण्यात आले.
गुढीपाडव्याच्या निमित्ताने नवी मुंबईतील वाशी सेक्टर ३० येथील वाशी रेल्वे स्टेशन जवळील फँटासिया बिझिनेस पार्क मध्ये भूमिपुत्र माथाडी कामगार आणि जनरल कामगार यूनियन व मैत्री परिवार (फँटासिया पार्क) यांच्या विद्यमाने येत्या २० मे रोजी होऊ घातलेल्या देशाच्या लोकशाहीच्या महोत्सवात म्हणजेच सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत सुजाण नवी मुंबईकर नागरिकांनी मतदानाचा हक्क आवर्जून बाजावावा यासाठी मोठ्या आकाराची संदेशात्मक रांगोळी रेखाटण्यात आली होती.
सुप्रसिद्ध रांगोळीकार श्रीहरी पवळे यांच्या कल्पकतेतून हि रांगोळी साकारण्यात आली. नागरिकांनी आपल्याला घटनेने दिलेला मतदानाचा हक्क आवर्जून बजावावा असे आवाहन माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी केले आहे.